अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविषयी बातम्यांसाठी
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबाबत शोधपत्रकारितेवर आधारित बातम्या देणाऱ्या दी न्यूयॉर्क टाइम्स व दी वॉल स्ट्रीट जर्नल यांनी पुलित्झर पुरस्कार पटकावले आहेत.
न्यूयॉर्कच्या कोलंबिया विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. ट्रम्प कुटुंबीयांनी त्यांच्या संपत्तीबाबत केलेले दावे खोटे असल्याचे दी न्यूयॉर्क टाइम्सने दाखवून दिले होते. त्यात ट्रम्प यांच्या उद्योगांचे विस्तारलेले साम्राज्य व त्यांनी केलेली करचुकवेगिरी यांचा पर्दाफाश करण्यात आला होता.
ट्रम्प यांनी २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीवेळी दोन महिलांना पैसे देऊन त्यांच्याशी असलेल्या संबंधाबाबत वाच्यता न करण्यास सांगितले होते. त्याबाबतच्या बातमीसाठी दी वॉल स्ट्रीट जर्नलला राष्ट्रीय वार्ताकनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दी साउथ फ्लोरिडा सन सेटिंनलला लोकसेवा प्रवर्गात हा पुरस्कार जाहीर झाला असून त्यांनी मारजोरी स्टोनमल डग्लस हायस्कूलमधील फेब्रुवारी २०१८ मधील हत्याकांड व त्यात शाळा व कायदा अंमलबजावणी अधिकाऱ्यांचे अपयश यावर प्रकाश टाकला होता. ऑक्टोबर २०१८ मध्ये अग्यारीतील गोळीबारात ११ जण ठार झाले होते त्याच्या वार्ताकनासाठी पिटसबर्ग पोस्ट गॅझेटला ब्रेकिंग न्यूज गटात गौरवण्यात आले आहे. असोसिएटेड प्रेसला येमेन युद्धाच्या वार्ताकनासाठी आंतरराष्ट्रीय वार्ताकन पुरस्कार मिळाला आहे. म्यानमारमधील रोहिंग्या मुस्लिमांवर झालेल्या अत्याचारप्रकरणी वार्ताकनासाठी रॉयटर्सला आंतरराष्ट्रीय वार्ताकन पुरस्कार जाहीर झाला आहे. ब्रेकिंग न्यूज फोटोग्राफी गटात मध्य अमेरिकेतून अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांच्या छायाचित्रांसाठी रॉयटर्सला पुरस्कार मिळाला आहे. कथा विभागात रिचर्ड पॉवर्स यांनी दी ओव्हरस्टोरी कथेसाठी तर नाटक गटात जॅकी सिब्लिस ड्ररी यांनी पुरस्कार पटकावले आहेत. इतिहासाचा पुलित्झर पुरस्कार फ्रेड्रिक डग्लस- प्रॉफेट ऑफ फ्रीडम या डेव्हीड ब्लाइट यांच्या पुस्तकास मिळाला आहे. तर जीवनचरित्र गटात तो जेफ्री स्टेवर्ट यांना दी न्यू नेग्रो- दी लाइफ ऑफ अलेन लॉकी या पुस्तकासाठी जीवनचरित्र पुरस्कार मिळाला आहे.
कवितेचा पुरस्कार फॉरेस्ट गँडर यांना बी विथ या काव्यसंग्रहासाठी मिळाला तर ललित लेखनासाठी एलिझा ग्रिसवोल्ड यांना अॅमिटी अँड प्रॉस्परिटी – वन फॅमिली अँड दी फ्रॅक्चरिंग ऑफ अमेरिका या पुस्तकासाठी मिळाला आहे, संगीतात एलेन रीड यांच्या ‘प्रिझ्म’ या रचनेस गौरवण्यात आले. अरेथा फ्रँकलिन यांना संगीतात विशेष मानपत्र देण्यात आले. मेरीलँड येथील २०१८ च्या गोळीबारात पाच कर्मचारी गमावलेल्या अॅनापोलिसच्या कॅपिटल गॅझेट न्यूजपेपरलाही गौरवण्यात आले आहे. त्यांच्याच वृत्तपत्रावर हल्ला होऊनही त्यांनी दुसऱ्या दिवशीचा अंक बाजारात आणला होता (लोकसत्त वृत्त)