उदंड झाले राजकीय पक्ष

0
1368
जगातील सर्वांत मोठी लोकशाही असणाऱ्या भारतामध्ये त्याच प्रमाणामध्ये राजकीय पक्षांची नोंदणीही होत असते. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे १८६६ पक्षांची नोंदणी झाली असून, लोकसभा निवडणुकीनंतर २६९ नोंदणी झाल्याची माहिती समोर आली आहे.केंद्रीय कायदा मंत्रालयाच्या कायदेमंडळ विभागाकडून निवडणुकांवर लक्ष ठेवण्यात येते. या विभागासाठी तसेच, कायदे मंत्रालयाला संसदेतील कामकाजामध्ये उपयोगी पडावी, यासाठी निवडणूक आयोगाकडून ही माहिती संकलित करून सादर करण्यात आली आहे. त्यातील मुद्द्यांनुसार, राजकीय पक्षांच्या नोंदणीची संख्या वाढत असल्याचे दिसून आले आहे.
दर्जासाठी कामगिरी मोलाची
निवडणूक आयोगाकडे राजकीय पक्षांची नोंदणी होत असली, तरीही त्यांना प्रादेशिक किंवा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी अनेक निकषांची कसून तपासणी होत असते. हे निकष पूर्ण झाल्यानंतरच, त्यांना निवडणूक चिन्ह मिळते. राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी प्रादेशिक पक्षांच्या अन्य काही राज्यांमधील कामगिरीचाही कसून विचार करण्यात येतो.
मुक्त’ चिन्हांची रेलचेल
निवडणूक आयोगाकडून नोंदणी झालेल्या, मात्र अधिकृत पक्षाचा दर्जा न मिळालेल्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांना ‘मुक्त’ चिन्हांवरच निवडणूक लढवावी लागते. यासाठी निवडणूक आयोगाकडून ८४ चिन्हे उपलब्ध करून दिली आहेत, त्यातून उमेदवारांना निवडकरावी लागते. यामध्ये पाटी, नारळ, एअर कंडिशनर, फुगा, चप्पल, चटई, खिडकी, बाटली, ब्रेड अशी चिन्हे उपलब्ध आहेत.
निवडणूक आणि नोंदणी
कोणत्याही पक्षाची नोंदणी, निवडणुका डोळ्यासमोर ठेऊनच होत असते. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही हाच अनुभव आला. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, १० मार्च २०१४पर्यंत एक हजार ५९३ पक्षांची नोंदणी झाली होती. त्यानंतर ११ मार्च ते २१ मार्च या दहा दिवसांमध्ये २४ पक्षांची नोंदणी झाली. तर २६ मार्चपर्यंत आणखी दहा पक्षांनी नोंदणी केली. केंद्रीय निवडणूक आयोगाने ५ मार्च २०१४ रोजी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानंतरच्या नोंदणींमुळे एकूण राजकीय पक्षांची संख्या मार्च २०१४अखेर एक हजार ६२७ झाली.(महाराष्ट्र टाइम्सवरून साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here