निवडणुका,पाणी टंचाई आणि आम्ही…
मराठवाडयात एकीकडं प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे तर दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी लोकांची पायपीट सुरू आहे.पिण्याचे पाणी,गुरांचा चार,रोजगार आदि प्रश्नांमुळं जनता त्रस्त असताना दुष्काळ हा मुद्दाच प्रचारातून गायब आहे.दुष्काळ ही कोणाची देण आहे, ? दुष्काळ निवारण्यासाठी काय प्रयत्न व्हायला हवेत,? दुष्काळात जनतेची होरपळ होऊ नये यासाठी काय उपाययोजना करणे अपेक्षित आहेत? हे सारे प्रश्न आहेत पण त्यावर कोणीच बोलत नाही.विरोधकही बोलत नाहीत,सत्ताधारीही मौन बाळगून आहेत.
राजकारण्यांनी काय करावे या जंजाळात अडकून न पडता किंवा निवडणुकांच्या भानगडीत स्वतःला गुंतवून न घेता दुष्काळ हा विषय हाती घेऊन आमच्या गावापुरतं का होईना काम करतो आहोत.गावच्या नदीवर सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून बंधारा बांधण्याचं काम आम्ही हाती घेतलं आहे.गाव दोन नद्यांच्या तिरावर वसलेलं आहे.गावाच्या उत्तरेला दोन नद्यांचा संगम जेथे होतो त्या भागात 60 लाख रूपये खर्चाचा एक बंधारा बांधत आहोत.त्यासाठी नदीचं खोलीकरण आणि रूंदीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे.मुख्य भिंतीचं कामही लवकरच सुरू करीत आहोत.त्यासाठी शासकीय परवानग्या वगैरे सोपस्कार सुरू आहेत.ते एकदा पूर्ण झाले की,मुख्य भिंतीचे काम सुरू होईल.तत्पुर्वी आज मुख्यभिंतीचे मार्गिंक करण्यात आलं.जवळपास 70 मिटर लांबीची ही भिंत आहे.नदीचं खोलीकरण आणि रूंदीकरण केल्यानं बंधार्यात मोठा जलसाठा होणार आहे.त्यातून गावाचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी दूर होणार असून देवडी गावाची दुष्काळाच्या फेर्यातूनही मुक्तता होणार आहे.आमच्या देशमुख कुुटुंबियांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.तो पूर्णत्वास जात आहे ही आमच्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी आहे असं आम्ही मानतो.बंधारा बांधून पूर्ण झाल्यानंतर या बंधार्याचा लोकार्पण सोहळा करण्यात येणार आहे.
मराठवाडयातील दुष्काळ दूर करायचा असेल तर प्रत्येक गावांनी पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणं आवश्यक आहे.तो दृष्टीकोण बाळगूणच आम्ही बंधार्याचं काम हाती घेतलेलं आहे.छोटासा प्रयत्न आहे,पण असे छोटे छोटे प्रयत्नच काही अंशी नैसर्गिक आणि बर्याच प्रमाणात लादल्या गेलेल्या दुष्काळाचं कायम स्वरूपी उच्चाटन करू शकतील असं वाटतं.