दर्पण दिन महाराष्ट्रात सर्वत्र साजरा होतो.त्यानिमित्त आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमावर हजारो रूपये खर्च होतात,मात्र हा कार्यक्रम साध्या पध्दतीन साजरा केला,किंवा कार्यक्रमच रद्द करून वाचलेल्या खर्चातून गरजू पत्रकारांना किंवा मृत पत्रकारांच्या नातेवाईकांना मदत केली तर ? नक्कीच मुद्दा विचार करायला लावणारा आहे.मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघानं यावर्षी हेच केलं.नाशिक जिल्हयात डिसेंबर 2016 मध्ये दोन पत्रकारांचे निधन झाले.निफाड तालुक्यातील लासलगाव येथील सकाळचे बातमीदार नानासाहेब सुरवाडे आणि इगतपुरी तालुक्यातील बेलगाव तर्हाळे येथील गावकरीचे वार्ताहर रामदास वारूंगसे अशी या दोन पत्रकारांची नावं.दोघांचंही अचानक निधन झाल्यानं स्वाभाविकपणे कुटुंबिय सैरभैर झालं.समाजानं आणि व्यवस्थापनानं हात झटकले.अशा स्थितीत नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघ पुढं आला.दोघेही संघाचे सदस्य.संघानं त्यांच्या कुटुंबियांसाठी प्रत्येकी पंधरा हजारांचा कृतज्ञता निधी दिलेला आहे.रक्कम नक्कीच किरकोळ आहे,त्यातून दिवंगत कुटुंबियांना फार काही मदत होणार ऩसली तरी संकट प्रसंगी आम्ही पत्रकार किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर आहोत हा संदेश यातून नक्कीच दिला गेला.मराठी पत्रकार परिषदेचे सरचिटणीस यशवंत पवार यांनी आपल्या सहकार्यांसह दोन्ही दिवंगत पत्रकारांच्या घरी जाऊन हा निधी दिला.नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाला मनापासून धन्यवाद.
काल सातारा येथील दिवंगत पत्रकार अ़रूण देशमुख यांच्या कुटुंबियांना सहा लाखांची मदत दिल्यानंतर आज नाशिक येथील पत्रकार संघानंही त्याचं अनुकरण करीत फुल नाही तर फुलाची पाकळी देऊन पत्रकारांमध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम केलं आहे.पत्रकार एकटा नाही आम्ही सारे प्रत्येक पत्रकारांबरोबर आहोत ही भावना राज्यभर बळावत चालली आहे हे आपल्या चळवळीचं यश आहे असं मला वाटतं.ही जाणीव सर्वत्र पसरत गेली तर सरकारसमोर आपल्याला हात पसराव लागणार नाहीत हे नक्की.-
(मराठी पत्रकार परिषदेचे बुलेटिन)