मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नाशिक महापालिकेतील सत्ता आता ओझे वाटायला लागली आहे काय?नाशिकचे ओझे डोक्यावरून उतरविण्याची तयारी त्यांनी चालू केलीय का ? – या प्रश्नाची उत्तर होकारार्थीच येतात.लोकसभा निवडणुका नजरेच्या टप्प्यात आलेल्या असताना राज ठाकरे यांनी नाशिकला जाणे. तेथील मनपाच्या कारभाराबद्दल सहकाऱ्यांना फैलावर घेणे,” मनपाच्या कारभारावर केवळ नाशिककर जनताच नव्हे तर स्वपक्षीय देखील नाराज असतील तर अशी सत्ता काय कामा” ? असा प्रश्न उपस्थित करून ठोस नि र्णय़ घेण्याबाबत आपल्या कारभाऱ्यांना दम देणे,नाशिक मनपात मनसेबरोबर भाजपही सत्तेत असताना भाजपकडे हेतुतः दुर्लक्ष कऱणे,विकास कामाची उद्घाघाटनं करतानाही भाजपला दुय्यम स्थान देणे आणि अंतिमतः नाशिकमध्ये जाऊन नरेंद्र मोदी यांच्यावरच तोफ डागणे या साऱ्या घटना योगायोगाने घडलेल्या नाहीत. हे सारे ठरवून ,घडवून आणलेले आहे.असे नसते तर नरेंद्र मोदींवर हल्ला कऱण्यासाठी त्यांना नाशिकचीच निवड करण्याचं कारण नव्हतं. ते मुंबईत पत्रकार परिषद बोलावून हा हल्ला करू शकले असते आणि त्याला नाशिकमधून जेवढी प्रसिध्दी मिळाली त्यापेक्षा कितीतरी जास्त प्रसिध्दी मुंबईतील पत्रकार परिषदेला मिळाली असती.ठाकरे यांना हे माहित असतानाही त्यांनी नाशिकची निवड केली.शिवाय नरेंद्र मोदींना भाजपने पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून दोन-तीन महिन्यापूर्वीच धोषित केलेले आहे.मग राज ठाकरे यांनी तेव्हाच नेरंद्र मोदींना राजीनामा देण्याचा सल्ला का दिला नाही ? .हा प्रश्न शिल्लक उरतोच.राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींचे तेव्हाचे संबंध लक्षात घेता कदाचित नरेंद्र मोदींनी राज ठाकरे यांचा सल्ला ऐकलाही असता . तसे झाल नाही.तेव्हा ते गप्प होतेे.आता तीन महिने झाल्यावर जर राज ठाकरे बोलले असतील तर त्यांच्या मनात वेगळेच राजकारण शिजतंय असं म्हणता येऊ शकेल.नरेंद्र मोदी सध्या भाजपवाल्यांच्या गळ्यातील ताईत आहे.नरेंद्र मोदींवरची कोणताही टीका भाजप नेते सहन करणार नाहीत याची पुरेशी जाणीव राज ठाकरे यांना नक्कीच आहे.तरीही ते बोलले असतील तर भाजपला डिवचण्याचा त्यांचा हेतु होता हे स्पष्ट आहे.नेरंद्र मोदीवर टीका करून राष्ट्रीय माध्यमांवर राज ठाकरे यांना झळकायचा एवढाच माफक हेतू राज ठाकरे यांच्या टिकेमागे नव्हता.नाही.केवळ प्रशिध्दी एवढाच हेतू असेल तर कोणताही भावनिक मद्दा उपस्थित करून राष्ट्रीय वाहिन्यावर ते दिवसभर झळकू शकतात. टिकेचं कारण तेवढंच नव्हतं टिकेमुळं भाजपनं नाराज व्हावं आणि नाशिक मनपातील पाठिंबा काढून घ्यावा हा देखील एक हेतू या टिकेमागं होता असं अनुमान काढता येऊ शकतं. हे अनुमान अनेकांना मान्य होणारं नाही.काहींना ते अजब तर्कट वाटेल,आपल्या पक्षाला अन्य पक्षाने सत्तेसाठी दिलेला पाठिंबा काढून घेण्यासाठी स्वतःच कोणी अशी कट-कारस्थाने करील काय? असा सवालही काहींच्या मनात येईल,सामान्य परिस्थितीत अनुमानावर कोणी शंका घेतल्या असत्या तर त्या पटण्यासारख्याच होत्या. – पण आज नाशिक आणि एकूणच देशाची परिस्थिती विचारात घेता राज ठाकरे हे नाशिकच्या सत्तेवर पाणी सोडण्यासाठीच भाजपला अंगावर घेतात हे विधान चुकीचे ठरण्याची शक्यता नाही. कारण नाशिकची सत्ता हाती घेताना राज ठाकरे यांनी नाशिककरांना वारेमाप आश्वासनं दिली होती.उमेदवार निवडताना लेखी परिक्षा घेण्याचा प्रयोगही राज ठाकरे यानी केल्यानं राज ठाकरे नक्कीच नाशिकचं भलं करतील अशी नाशिककरांना अपेक्षा होती. दोन वर्षात या अपेक्षांचे तीन तेरा वाजले. नाशिककरांना दिलेल्या कोणत्याच आश्वासनांची पुर्तता मनसेला करता आली नाही.एकीकडे दिल्लीत सत्ता मिळताच दुसऱ्याच दिवशी अरविंद केजरीवाल यांनी वीज दर अर्ध्यावर आणले. पाणी देखील मोफत देण्याची व्यवस्था केली.दुसऱ्याच दिवशी केलेल्या आश्वासनपूर्तीची संपूर्ण देशाने द खल घेतली .या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना दोन दिवसात नव्हे तर दोन वर्षातही नाशिकचा कायापालट तर सोडाच पण नाशिकचे साधे-साधे प्रश्नही सोडविता आलेले नाहीत हे नाशिककर बोलताना दिसतात. “राज्याची सत्ता माझ्या हाती द्या,मग साऱ्यांना लगेच सुतासारखे सरळ करतो ” असे म्हणणाऱ्या राज ठाकरे यांना नाशिकमध्ये कोणालाच सरळ करता आले नाही किंवा बिघडलेली नाशिकची घडीही त्यांना नीट बसवता आलेली नाही.हे वास्तव केवळ नाशिककर जनताच बोलते आहे असं नाही तर मनसे कार्यकर्तेही असेच बोलताना दिसतात.स्वतः ठाकरे देखील नाशिकच्या कारभारावर समाधानी नाहीत हे त्यांनीच बोलून दाखविले आहे. – या वास्तवाच्या पार्श्वभूमीवर नाशिकची सत्ता कशी-बशी टिकविण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम राज्यभर होतील. ” नाशिकमध्ये आपण काय दिवे लावले” असा प्रश्न जनता आणि माध्यमं विचारल्याशिवाय राहणार नाहीत हे राज ठाकरे ओळखून असल्याने दीर्घकलिन फायद्यासाठी ते नाशिकच्या सत्तेवर पाणी सोडू शकतात .सत्तेवर पाणी सोडताना खापर भाजपच्या माथी फुटले पाहिजे अशी राज यांची योजना आहे.नरेंद्र मोदींवरील राज यांच्या टीकेकडे या अंगानं पाहिलं पाहिजे.नरेंद्र मोदींवर तोफ डागली की महाराष्ट्र भाजपमध्ये अस्वस्थतः निर्माण होईल,स्थानिक नेत्यांना डावलले की तेही पिसाळतील आणि मनसेचा पाठिंबा काढून घ्या म्हणून पक्ष नेतृत्वाकडं तगादा लावतील त्यातून जर सत्ता गेलीच तर आपणास हौतात्म्य मिळविता येईल ही राज यांची योजना होती आणि ती यशस्वी होताना दिसते आहे,स्थानिक भाजपने राज यांच्या दौऱ्यावर बहिष्कार टाकला.त्यानं काही होत नाही म्हटल्यावर थेट देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून नाशिक मनपातील मनसेचा पाठिंबा काढून घेण्याची मागणी केली आहे.यावर भाजपने आता काहीही नि र्णय घेतला तरी ते मनसेच्या पथ्यावर पडणार आहे.म्हणजे पाठिबा काढून घेतला तर ” आम्हाला नाशिकचा विकास करायचा होता पण भाजपला ते पाहवले नाही ” त्यामुळं त्यांनी पाठिंबा काढून घेतला म्हणायला राज ठाकरे मोकळे,समजा पाठिंबा काढला नाही तर भाजप आमच्याबरोबर असूनही त्या पक्षाने आम्हाला विकासाची कामं करू दिली नाहीत म्हणत खापर पुन्हा त्यांच्या माथीच फोडता येईल अशी राजनीती आहे. “संपूर्ण र् बहुमत न दिल्यानं मला नाशिकमध्ये अपेक्षित काम करता आलं नाही त्यामुळं मला एकहाती सत्ता द्या” म्हणत मतं मागताना मग कोणतीच अडचण येणार नाही. धक्का तंत्राचा अवलंब करण्याची ठाकरे कुटुंबाची पध्दत लक्षात घेता कदाचित राज ठाकरे स्वतःही नाशिक मनपाची सत्ता सोडतील आणि मला सत्तेत रस नाही मनासारखे काम झाले नाही तर मी सत्तेलाही लाथ मारतो असे म्हण राज ठाकरे महाराष्ट्रातील जनतेच्या भावनांना हात घालण्याचा प्रयत्न करतील.त्यामुळं येत्या काही दिवसात नाशिकबाबत राज ठाकरे काही धक्कादायक नि र्णय़ घेऊन आपल्या मार्गात येणारी नाशिकची खोड दूर करतील असे दिसते.नाशिकवर पाणी सोडून तात्पुरते नुकसान होऊ शकेल पण त्यातून दीर्घकालिन लाभच पदरात पडणार आहे असेच राज ठाकरे यांना वाटते.
– भाजपबरोबर पंगा घेतल्यानं आता मनसेचं फारसं नुकसान हो
ण्याचीही शक्यता नाही.कारण एक काळ असा होता की,नरेद्र मोदी आणि शिवसेनेचे संबंध चागले नव्हते.उध्दव असोत किंवा त्याअगोदर बाळासाहेब ठाकरे आणि मोदी यांच्या मनात परस्परांबद्दल अढी होती.याचा फायदा घेत राज ठाकरे यांनी मोदींशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला.मोदीस्तुती त्याच साठी होती.मोदीच्या माध्यमातून राज्य भाजपवर दबाब आणून शिवसेनेला एकटे पाडता येऊ शकते का? याचा कानोसा राज ठाकरे महाराष्ट्रात घेत होते.नाशिकमध्ये सेनेचा विरोध असतानाही भाजपने मनसेला पाठिंबा दिल्याने राज ठाकरे यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या.पण विशिष्ट भागातच प्रभाव असलेल्या मनसेबरोबर जाऊन आपला दीर्घकालिन लाभ होणार नाही हे राज्य भाजपचे कारभारी ओळखून असल्याने त्यांनी सेनेची साथ सोडली नाही.ती आगामी दोन्ही निवडणुकात सोडली जाणार नाही हे राज यांना दिसत असल्यानंच कोरडी दोस्ती काय कामाची ? असा व्यावहारिक विचार करीत त्यांनी मोदींच्या माध्यमातूनच भाजपशी काडीमोड घेतला आहे.ज्यांचा प्रत्यक्षात उपयोगच नाही त्याच्यापासून दूर गेल्याने मनसेला काही तोटा होणार नसला तरी एक सहानुभूतीदार मनसेने गमविला आहे हे नक्की.मनसेला आता कोणी मित्र नाही आणि नवा मित्र मिळण्याची शक्याताही नाही.तरीही आम्हीच बाप असे राज ठाकरे म्हणत असतील तर ते कोणाच्या भरोश्यावर ? – या प्रश्नाचं उत्तर येत्या लोकसभा निवडणूक निकालानंतर मिळणार आहे
– एस.एम.देशमुख