पत्रकार संरक्षण कायदा करण्यास सरकार टाळाटाळ करीत
असल्याने पत्रकारांवरील हल्ले वाढले – एस.एम.देशमुख यांचा आरोप
महाराष्ट्रात पत्रकारांवर होत असलेले हल्ले थांबायचे नाव घेत नाहीत.आज नागपूरमध्ये पाच पत्रकार आणि कॅमेरामनला एका शिक्षण संस्थेत मारहाण केली गेली,तसेच पत्रकारांची गाडी जाळण्याचाही प्रयत्न झाला.अहिल्यादेवी होळकर आश्रम शाळा असे या शिक्षण संस्थेचे नाव आहे.या संस्थेत अनेक घोटाळे सुरू अस्लयाच्या तक्रारी होत्या.खोटी पट संख्या दाखवून अनुदान लाटले जात असल्याचेही सांगितले जात होते.या सर्व आरोपांची शहानिशा कऱण्यासाठी महाराष्ट्र वन चॅनलचे नागपूर ब्युरो चीफ गजानन उमाटे आणि कॅमेरामन सौरभ होले तसेच आयबीएन लोकमतच्या रिपोर्टर सुरभी शिरपूरकर,कॅमेरामन प्रशांत मोहिते आणि सुनील लोढेे संस्थेत गेले असता तेथे संस्थाचालक श्रीकृष्ण मते आणि त्यांच्या मुलांसह काही कर्मचार्यांनी पत्रकारांवर हल्ला करीत त्यांना मारहाण केली.महिला पत्रकारही या मारहाणीतून सुटल्या नाहीत.या घटनेमुळे माध्यमामध्ये संतापाची लाट उसळली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक तथा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष एस.एम.देशमुख यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला असून संबंधित संस्था चालकांवर कडक कारवाई करावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून केली आहे.राज्य सरकार पत्रकार संरक्षण कायदा करण्यास टाळाटाळ करीत असल्यानेच पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या असल्याचा आरोप देशमुख यांनी केला असून कायद्याच्या मागणीसाठी उग्र आंदोलन करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.सरकारने राज्यातील पत्रकारांचा आता जास्त अंत न बघता तातडीने याच अधिवेशनात कायदा करावा अशी मागणीही देशमुख यांनी केली आहे.