नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांचे समर्थक असलेले काही नेते व कार्यकर्ते सोशल मीडियावर पत्रकारांना धमक्या देत आहेत. तसेच, त्यांना बदनामीकारक शिवीगाळही केली जात आहे. या खालच्या पातळीवरील कृतीचा नागपूरच्या पत्रकारांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
पत्रकार सरिता कौशिक, रजत वशिष्ठ, रश्मी पुराणिक व राजीव खांडेकर यांना पटोले समर्थकांनी आतापर्यंत लक्ष्य केले. पटोले व त्यांच्या समर्थकांचे पत्रकारांसोबतचे हे वागणे धक्कादायक आहे. पत्रकार नागरिकांपुढे सत्य बाजू मांडत असल्यामुळे झालेला जळफळाट यातून दिसून येत आहे. पत्रकार अशा भ्याड कृतीला कधीच घाबरणार नाहीत. ते आपल्या कर्तव्यांना सतत न्याय देत राहतील. प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. त्याला नुकसान पोहचविण्याचे काम पटोले समर्थक करीत आहे. त्यांच्या या कृतीचे कधीच समर्थन केले जाऊ शकत नाही. त्यांची कृती फौजदारी गुन्हा आहे. त्यामुळे पटोले व त्यांच्या समर्थकांनी तात्काळ पत्रकारांची माफी मागावी. तसेच, पोलिसांनी दोषी समर्थकांचा शोध घेऊन त्यांना दंडित करावे व पत्रकारांची बदनामी करणारी खोटी छायाचित्रे प्रसारित करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्रकारांनी प्जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने या प्रकाराचा निषेध केला आहे.