रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार जाहीर
मुंबई दिनांक 3 जानेवारी ( प्रतिनिधी ) मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने देण्यात येणार्या रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कारासाठी यंदा नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची निवड करण्यात आली आहे.उत्कृष्ट कार्य करणार्या जिल्हा संघांना दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.मानपत्र,स्मृतीचिन्ह,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येते.नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाने वर्षभरात विविध सामाजिक उपक्रम राबवून जनमानसात पत्रकारांबद्दलचा नकारात्मक दृष्टीकोन बदलण्यासाठी प्रयत्न केले.तसेच पत्रकारांसाठी देखील विविध उपक्रम राबवून नवा आदर्श राज्यातील अन्य पत्रकार संघांसाठी घालून दिला.मराठी पत्रकार परिषदेचे उपक्रम,आंदोलनं,लढे यातही नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघानं सक्रीय सहभाग नोंदवून पत्रकारांचे प्रश्न धसास लावण्यात महत्वाची भूमिका बजावली.आर्थिक व्यवहार,निवडणुका यासर्व गोष्टींचा नांदेड जिल्हयाची निवड करताना विचार केला गेला.मराठी पत्रकार परिषदेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रदीप नागपूरकर,त्यांचे सहकारी आणि जिल्हयातील सर्व सदस्यांचे अभिनंदन केले आहे.
वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघांची लवकरच घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा आणि सरचिटणीस अनिल महाजन यांनी एका पत्रकाव्दारे दिली आहे.