रायगड प्रेस क्लबचे पुरस्कार जाहीर
नरेंद्र वाबळे यांना आचार्य अत्रे संपादक पुरस्कार
अलिबागः रायगड प्रेस क्लबच्यावतीने देण्यात येणारा आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक पुरस्कार यंदा शिवनेर या दैनिकाचे संपादक नरेंद्र वाबळे यांना जाहीर करण्यात आला आहे.रोख रक्कम,स्मृतीचिन्ह,शाल,श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असून येत्या 23 मार्च रोजी म्हसळा येथे हा पुरस्कार वितरण समारंभ होणार असल्याची माहिती रायगड प्रेस क्लबच्या प्रसिध्दी पत्रकात देण्यात आली आहे.एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आणि रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस.एम.देशमुख यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितऱण सोहळा संपन्न होत आहे.23 मार्च रोजी रायगड प्रेस क्लबचा वर्धापन दिन असतो.त्यानिमित्त दरवर्षी या दिवशी पुरस्कारांचे वितरण केले जाते.
रायगड प्रेस क्लबच्यावतीने गेली पंधरा वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या पत्रकारांना राज्यस्तरीय आणि जिल्हस्तरीय पुरस्कार दिले जातात.यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार नरेंद्र वाबळे यांना जाहीर करण्यात आला आहे.याशिवाय जिल्हा स्तरावरील पुरस्कारही जाहीर केले गेले असून त्यामध्ये निशिकांत जोशी स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार विद्यानंद ओव्हाळ,युवा पत्रकार पुरस्कार कर्जतचे लोकमतचे कांता हाबळे,आणि म्हसळ्याचे सागरचे निकेश कोकचा यांना जाहीर केला गेला आहे.उत्कृष्ठ छायाचित्रकार पुरस्कार कृषीवलचे छायाचित्रकार समीर माळोदे यांना तर निर्भिड पत्रकार पुरस्कार पुढारीचे प्रदीप मोकल यांना जाहीर झाला आहे.महिला पत्रकारांसाठीचा सावित्रीबाई फुले पुरस्कार मयुरी खोपकर यांना जाहीर झाला आहे.सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार उल्का महाजन यांना देण्यात येणार आहे.
श्रमिक पत्रकार संघाचे पुरस्कारही घोषित केले गेले आहेत.त्यामध्ये पनवेल लाइव्हचे संपादक सुमंत नलावडे,श्रीवर्धन येथील सकाळचे संजय मांजरेकर,माणगाव येथील रत्नागिरी टाइम्सचे गौतम जाधव,महिला पत्रकार भारती आत्माराम घाडगे,यांना जाहीर करण्यात आला आहे.या कार्यक्रमात म्हसळा येथील ज्येष्ठ पत्रकार संजय खंबाटे,विलास मधुकर यादव,गोविंद पवार यांचे विशेष सत्कार कऱण्यात येणार आहेत.
रायगड प्रेस क्बच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत वरील पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष विजय मोकल यांनी दिली आहे.बैठकीस परिषदेचे विभागीय सचिव संतोष पेरणे,माजी अध्यक्ष संतोष पवार तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.