‘शहा’जोगपणाला यशवंत सिन्हांचाही विरोध !
एखादया वृत्तपत्राने विरोधात बातमी छापल्यानंतर ती बातमी बदनामीकारक असल्याचे सांगत संबंधित माध्यमावर बदनामीचा दावा करण्याचा अधिकार प्रत्येक नागरिकाला आहे.या कायद्यान्वये देशातील अनेक संपादकांवर खटले दाखल झालेले आहेत.शिक्षाही झालेल्या आहेत.मात्र अशा प्रकरणातील बहुतेक तक्रारदारांचा उद्देश हा संबंधित वृत्तपत्रांला चुकीची जाणीव करून देण्याचा असतो.त्यामुळे अनेकदा तर अगदी एक रूपयांच्या नुकसानीचा दावा देखील केला गेलेला आहे.मात्र अमित शहा यांचे पूत्र जय शहा यांनी ‘द वायर’ या संकेतस्थळावर शंभर कोटीचा दावा दाखल केला आहे.अशा दावा करण्यासाठी मोठी रक्कम न्यायालयात भरावी लागते.ती भरली गेली असेल पण हा दावा करण्यामागे संबंधितांना तुम्ही चुकीची बातमी छापली याची जाणीव करून देण्याचा उद्देश नव्हता तर संपूर्ण मिडियावर दहशत बसविण्याचा उद्देश होता हे उघड आहे.यापुढे कोणी आमच्या विरोधात बातमी छापली तर आम्ही तुमच्यावरही 100 कोटींचा दावा दाखल करू शकतो अशी धमकीच अप्रत्यक्षपणे या दाव्याच्या निमित्तानं जय अमित शहा माध्यमांना देऊन गेले आहेत.या शहांच्या या भूमिकेला आम्ही तीव्र आक्षेप घेऊन हा माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रकार असल्याचे म्हटल्यानंतर अनेक भक्तांनी त्यावर चांगला थयथयाट केला.’तुम्ही काहीही छापायचं आणि आम्ही गप्प बसायचं काय’?,’माध्यमांना वाट्टेल ते छापण्याचा मुक्त परवाना दिला गेलाय का’? असे प्रश्न विचारले गेले.मात्र आता भाजपचे नेते यशवंत सिन्हा यांनीच ‘अशा पध्दतीचा दावा दाखल करणे हे देशातील मिडिया आणि लोकशाही तसेच देशहिताचं नाही’ असं म्हटल्यानं भक्तांची नक्कीच दातखिळी बसणार आहे.यशवंत सिन्हा म्हणजे राहूल गांधी नाहीत.ते सत्ताधारी पक्षाचे असूनही असा दावा दाखल करणे मिडियाच्या विरोधी असल्याची भूमिका घेत असतील तर शहांची भूमिका नक्कीच चुकीची आहे असा त्याचा अर्थ होतो.लोकशाही,देशातील मिडियाचे स्वातंत्र्य हवं असणार्या प्रत्येक नागरिकाने जय शहांच्या या मिडिया दमननीताचा विरोध केला पाहिजे असेच मराठी पत्रकार परिषदेला वाटते.–