उस्मानाबाद येथील पत्रकार सुनील ढेपे यांचा पूर्ण ‘बंदोबस्त’ केल्यानंतर आता पोलीस ते ज्या वर्तमानपत्रासाठी काम करीत होते त्या गावकरीच्या मागे लागलेत असे दिसते.उपविभागीय पोलीस अधिकारी उस्मानाबाद यांनी 14-09-2016 रोजी गावकरीच्या संपादकांना दोन स्वतंत्र पत्रे पाठविली आहेत.पहिल्या पत्रात सुनील ढेपे आणि सुधीर पवार यांच्यावर जे गुन्हे दाखल केले गेले आहेत त्याचा तपशील देऊन 04-09-2016,05-09-2016,आणि 06-09-2016 रोजी अनुक्रमे कारागृहात आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न,आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा,आणि मटका घेणार्या दोघांना पकडले या मथळ्याखाली प्रसिध्द झालेल्या बातम्यांचा संदर्भ देत खालील प्रश्न संपादकांना विचारले आहेत.
1) वरील बातम्या कोणी लिहिल्या ? सदर पत्रकाराचे नाव पत्ता द्यावा ?
2) वरील बातम्या कोणत्या कार्यालयातून पाठविण्यात आलेल्या आहेत ? आणि कोणाच्या परवानगीने पाठविण्यात आलेल्या आहेत ?
3)सदरच्या बातम्या प्राप्त झाल्यानंतर त्या प्रसिध्द कऱण्याची जबाबदारी कोणाची ?
4 ) आणि सदरच्या बातम्या कोणाच्या परवानगीने प्रसिध्ध केल्या.?
(आणीबाणीत बातम्या जिल्हा माहिती अधिकारी तपासून द्यायचे,बातम्यांवर तसा वॉचही असायचा सध्या आणीबाणी नाही आणि भारतीय घटनेनं वृत्तपत्र स्वातंत्र्य दिलेले आहे असे आम्हाला वाटते.कदाचित पोलिसांना हे ठाऊक नसावे त्यामुळेच बातम्या कोणाच्या परवानगीने छापल्या असा प्रश्न ते विचारत असावेत)
दुसर्या पत्रात सुनील ढेपेंवर दाखल गुन्हयांचा तपशील देऊन खालील प्रश्न विचारले आहेत.
1) आरोपी सुनील ढेपे आणि सुधीर पवार यांना गावकरी वृत्तपत्रात उस्मानाबाद जिल्हा कार्यालय येथे प्रतिनिधी किंवा पत्रकार म्हणून नियुक्त कऱण्यात आले आहे काय ? कधी पासून नियुक्त कऱण्यात आले ?त्याची तारीख ,? अनुक्रमांक ? आणि त्याची छायांकित प्रत
2) पत्रकार म्हणून देण्यात आलेले ओळखपत्र किती तारखेला देण्यात आले आहे? त्याची तारीख,अनुक्रमांक आणि छायांकित प्रत?
3) गुन्हयातील आरोपी सुनील ढेपे आणि सुधीर पवार हे डिग्री धारक पत्रकार आहेत काय ? ( पत्रकार होण्यासाठी डिग्री लागले हे पोलिसांना कोणी सांगितले ) त्याबाबत माहिती आणि छायांकित प्रत द्यावी
ही माहिती तपासकामासाठी आवश्यक असल्याने ती तातडीने पाठवावी असा आदेश पोलिसांनी गावकरीच्या संपादकांना केला आहे.
आम्हाला पडलेले प्रश्न
1) बातम्या कोणी लिहिल्या म्हणजे बातम्यांचा सोअर्स सांगण्याची जबरदस्ती संपादकांना करता येते काय ?
2) बातम्या दैनिकाकडे पाठविण्यासाठी कुणाची तरी परवानगी घ्यावी लागले काय ?
3) बातम्या प्रसिध्द कऱण्यासाठी संपादकांना कोणाची परवानगी घ्यावी लागले ?
4) पत्रकार होण्यासाठी डिग्री आवश्यक असल्याचा कोणता नियम किंवा कायदा आहे काय ?
या सर्व प्रश्नांची उत्तरं यंत्रणेकडून मिळाल्यास आपल्या ज्ञानात भर पडण्यास मदत होईल.