देवेंद्र भुजबळ यांना पुरस्कार

0
902

*माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांना बिझनेस एक्सप्रेस श्री पुरस्कार प्रदान*

सांगली, दि. 12 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती – वृत्त व जनसंपर्क) देवेंद्र भुजबळ यांना प्रशासकीय साहित्य सेवा प्रवर्गातील यंदाचा राज्यस्तरीय  बिझनेस एक्सप्रेस श्री पुरस्कार – 2016 प्रख्यात साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. माधवनगर रोडवरील डेक्कन मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन हॉल येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

यावेळी मुंबई विद्यापीठ लोककला ॲकॅडमीचे विभाग प्रमुख प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे, फॅमचे माजी उपाध्यक्ष सनतकुमार आरवाडे, उद्योजक पुष्पदंत दोड्डणवर, श्री फाऊंडेशनचे कार्यकारी विश्वस्त ए. आय. मुजावर आदि मान्यवर उपस्थित होते.

श्री. भुजबळ म्हणाले, बदलत्या परिस्थितीनुसार, मुलामुलींच्या आवडीनुसार त्यांना त्यांचे क्षेत्र निवडू द्या. आपल्या इच्छा आकांक्षा त्यांच्यावर लादू नका. त्यांच्यावर तणाव, दबाव निर्माण करू नका. पुढील जीवन आनंदाचे होण्यासाठी त्यानुसार करिअर निवडा. विद्यार्थ्यांनी महान्यूजवरील करिअरविषयी असणाऱ्या “करियरनामा” या सदरातील माहितीचा उपयोग करून स्वत:ची प्रगती साधावी. या सदरामध्ये नाविन्यपूर्ण क्षेत्रांतील संधींची माहिती दिली जाते. पारंपरिक अभ्यासक्रमाचा विचार करताना नवनवीन येऊ घातलेल्या अभ्यासक्रमांचाही मार्ग चोखाळावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सांगली येथील व्यापार उद्योग क्षेत्राला वाहिलेल्या साप्ताहिक बिझनेस एक्सप्रेस श्री फाऊंडेशन या विश्वस्त संस्थेच्या वतीने दरवर्षी श्री पुरस्कार देण्यात येतो. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक (माहिती- वृत्त व जनसंपर्क) देवेंद्र भुजबळ यांच्या प्रशासकीय साहित्य सेवेतील कार्याची दखल घेऊन या पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले आहे. पुरस्काराचे यंदाचे हे 21 वे वर्ष आहे. या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील लोककला, बँकिंग, उद्योग, शिक्षण, साहित्य क्षेत्रातील मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here