केवळ नावात ‘जय’ असल्यानं …

0
1272
राजकीय आखाडयात विसंगतीयुक्त अशा अनेक घटना,घडामोडी घडत असतात.त्या पाहिल्या म्हणजे जे कवी नाहीत त्यांनाही कविता किंवा चारोळी सूचत असतात.माझंही असंच आहे..माझा पिंड हा काही कविचा नाही..पण सभोवताली जे घडतं ते शब्दबध्द कऱण्याचा माझा प्रयत्न असतो.जी गोष्ट आपण पान भर लेख लिहून सांगू शकत नाही ती गोष्ट कवितेच्या किंवा चारोळीच्या माध्यमातून अगदी कमी शब्दात आपण सांगू शकतो.या सदराचा उद्देश हाच आहे.बघा हा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडेल.येथे क्लीक करून अगोदरच्या चारोळी आणि कविता आपणास वाचता येतील. ————————————————————————————
तेल गेले,तुपही गेले
हाती काहीच उरले नाही,
कंबरेपर्यंत वाकूनही
‘गाजराचा हलवा’ काही मिळतच नाही..
 
शंभर कोटींच्या ‘शहा’जोग धमक्यांनी
मिडियाचा आवाज बंद करता येत नसतो,
केवळ नावात ‘जय’ असल्यानं
कोणी ‘विजयी’ ही होत नसतो.


 
नागपूरच्या थंडीतही,
सत्तेची उब  मिळालीच नाही,
नुसतेच वादे ऐकून आता
उमेदच उरली नाही!
———————————————————
‘दिव्याखाली अंधार’ असला की,
असंच होत असतं..
हल्लाबोल,हल्लाबोल करणार्‍यांनाही 
‘नाक दाबलं’ की,गोड-गोड बोलावं लागतं..
—————————————————-
 
टीआरपी मिळवून देणारी
कोणतीही घटना
आजकाल #बातमी होत असते,
साखरपुडा असो, नाही तर डोहाळेजेवण
त्यालाही #ब्रेकिंग_न्यूजची_व्हॅल्यू असते!
——————————————————-
‘ते’ म्हणाले, घोटाळे काढू
‘हे’ म्हणाले, सरकार पाडू! 
आता जनताच म्हणतेय,
हा खेळ थांबवा…
नाही तर दोघांनाही कायमचे वनवासात धाडू!
——————————— ‘गुरूजी’ म्हणाले लोहियांना
 
अखेर विजय तर आमचाच झाला आहे,
तुमचा पट्ट चेलाही,
आता ‘आमचा’ झाला आहे
 
——————————————
गरजेनुसार विचार,भूमिका
बदलण्याचा ट्रेन्ड सध्या जोरात आहे, आज नितीशकुमार , उद्या माहित नाही, मोदींच्या गळाला कोण कोण लाग ————————————
जीन्स म्हणाली धोतराला
तुझं बाबा बरं आहे,
माझं तर अस्तित्वच
अनेकांना ,अजूनही खूपत आहे.
——————————————————–
रखरखत्या उन्हात
शेतकरी मरतो आहे,
त्यांच्यानावाचा संघर्ष मात्र
‘वातानुकुलीत’ होतो आहे.
 
महाराष्ट्र बदलला आहे ‘संघर्ष’ही बदलला आहे, रस्त्यावर दिसणार ‘एल्गार’ आता मर्सिडीज बेंझमध्ये रमला आहे.
————————————————————
सिंधुदुर्ग म्हणाले नांदेडला, आता ‘हे’ चालणार नाही,
भाऊ तुमचं आमचं जमलं तोवर जमलं, आता जमणार नाही सत्तेशिवाय राजकारण करवत नाही
मन आता ‘इथं’ रमत नाही
‘अच्छे दिन’चा मोह आवरत नाही
भाऊ तुमचं आमचं जमलं तोवर जमलं, आता जमणार नाही
संस्कृती ‘हाता’ची आम्हाला मानवत नाही,
होणारी उपेक्षाही सहन होत नाही
‘तिकडून’ होणार्‍या ‘खुणे’ला,नाही आता म्हणवत नाही
भाऊ
तुमचं आमचं जमलं तोवर जमलं, आता जमणार नाही
 
सत्तेशिवाय राजकारणाला काही अर्थ नाही
पक्ष आपला (?) आता सत्तेत काही येत नाही
पुढील दहा वर्षे सडत बसायला वेळ आमच्या कडे नाही
भाऊ
तुमचं आमचं जमलं तोवर जमलं, आता जमणार नाही
मौनी अध्यक्ष ‘बेपत्ता’ आहेत, ‘म्हातारी’ आपली कोमात आहे
निष्णात डॉक्टराचा इथं पत्ता  नाही
भाऊ
तुमचं आमचं जमलं तोवर जमलं, आता जमणार नाही
 
कुणाचा पायपोस कुणात नाही मालिका पराभवाची थांबता थांबत नाही इथंला मुक्काम वाढविण्यात आता अर्थ नाही भाऊ, तुमचं आमचं जमलं तोवर जमलं, आता जमणार नाही
 
 
 
 
 
————————————————————————-
 
निलेश राणे यांनी आज पुन्हा अशोक चव्हाण यांच्यावर टीका केली आहे.
होत्याचं नव्हतं झालं तरी शहानपण काही येत नाही, ‘ओसाडगाव’च्या पाटीलकीसाठीचा  आटापीटा  थांबता थांबत नाही
नांदेड म्हणते मी बलवान सिंधुदुर्ग म्हणते मीच पहेलवान दोघांना झुंजवत सवयीप्रमाणे दिल्ली गप्प आहे तोळा-मोळा झालेली कॉग्रेस हळू हळू कोमात जात आहे.
————————————-
 
तत्वांचा झाला खून
विचारांची झाली होळी,
दुःख,यातना,दारिद्रय
हेच आहे सामांन्यांच्या भाळी
—————————————-
सेनेला मिळाला कॉग्रेसचा हात
कमळालाही मिळाली मग राष्ट्रवादीची साथ
लाल बावटेही भलतीकडेच गेले
सार्‍यांचे खरे चेहरे जनतेसमोर आले!
————————————–
————————————————– ‘जातीयवादी’ पावन झाले,
‘डावे’ ही उजवे झाले,
सत्तेच्या तुकडयासाठी 
सारे कसे एक झाले
—————————————-
Offline love 
थोडं आपलं सांगा,
थोडं  आमचंही ऐका मॅडम,
whatsapp वर तरी नियमित
भेटत चला मॅडम !
 
HI,Hello  करून असं
गायब होऊ नका मॅडम
केवळ Good Morning, Good Night म्हणत
निरोप नका घेऊत मॅडम!
 
फटकन Offline  जाताना
Online  कधी येणार ते ही सांगात चला  मॅडम
तासं तास Waitingवर ठेऊन
आमची ‘गंमत’ पाहू नका मॅडम!
 
जाता ,जाता एकच  सांगतो
ध्यानातं  ठेवा  मॅडम
‘इथंही कोणी तरी आपली
वाट पहात आहे’ मॅडम!
 
कवी नेहमीचेच
आपल्या आवडीचे …
——————————————–
तो म्हणाला,
मला कळत नाही,
नातं जपायचं असतं कसं ?
ती म्हणाली,
त्यात कठीण काय असतं,?
दोघांनी वाटून वाटून खायचं असतं
————————————————–
तो म्हणाला,
मला कळत नाही,
नातं जपायचं  असतं कसं  ?
ती म्हणाली,
त्यात कठीण काय असतं,?
सकाळ-संध्याकाळ व्हॉटसअ‍ॅपवर
 
‘फक्त’ गुडमॉर्निंग-गुडनाईट म्हणायचं असतं
—————————————
नाही मला कळत
नातं जपायचं असतं कसं ?
नाही मला  कळत
मन सांभाळायचं असतं कसं?
मला एवढंच माहित आहे,
जिथं नातं असतं,
तिथं मनमोकळं करायचं असतं
 
पण मनमोकळं करायलाही 
नातं मात्र घट्ट हवं असतं 
 
————————————————
‘वर्षा’ म्हणाली ‘मातोश्री’ला
झालं गेलं विसरून जावू
सत्तेचा मलिदा
‘दोन्हीकडं’ वाटून वाटून खावू
————————————————-
रोहा म्हणाले अलिबागला
‘भाई’ असं कसं हो केलंत,
मित्र मित्र म्हणत
‘सारंच’ हिरावून नेलंत !
—————————————————————-
आपले जेव्हा परके होतात.
तेव्हा 21 चे ही 12 होतात
सोयीनुसार मित्र बदलले की,
केवळ हाल आणि हालच होतात 
————————————————————-
’शिस्तीला’ गेले तडे
पोलादी भिंतही तुटली
प्रसिध्द होण्यापूर्वीच
बघा,यादी  कशी  फुटली
—————————————————–
कुणी ‘टाळी’ देता का रे? ‘टाळी’?
एका ’तुफाना’ला कुणी ‘टाळी’ देता का?
एक तुफान सत्तेवाचून,कार्यकर्त्यांवाचून ,
माणसाच्या मायेवाचून ,देवाच्या दयेवाचून 
कुणाच्या साथीवाचून मुंबईभर ‘हिंडतं’ आहे 
स्वतः साठी  ‘खंबीर’ साथ ‘ढुंढत’ आहे
घोंघावणारं तुफान आता ओसरलं आहे,
‘नो टाळी’ म्हणणारं तुफान आता ‘दे टाळी’वर आलं आहे
तुफानाची घालमेल  कोणी लक्षात घेईल का रे ?
या तुफानाला कुणी ‘टाळी” देईल का रे ?
 
———————————————–
दिवस बदलले की ,
माणसंही बदलत असतात,
काल जे ‘नो टाळी’ म्हणत असतात
तेच आज ‘दे टाळी’ म्हणत ,
 हात पुढं करीत असतात
——————————-
महाराष्ट्र ‘घडतो’ आहे, पक्ष ‘बिघडतो’ आहे काल जो विश्‍वास होता, तो हळू हळू ‘उडतो’ आहे.
———————————-
तिसर्‍या आघाडीत बिघाडी
ठरलेलीच असते
काल ‘त्यांच्याशी’ तर
आज ‘यांच्याशी’ ,

‘गाठ’ मारलेली असते —————————————————————————————————– जनाधार संपला, बाजारही उठला, साहेब- भाईंच्या गतीला नियतीचाच  ब्रेक लागला ———————————-‘मती’ गुंग झाली, ‘मनी’ही निष्प्रभ झाले सत्तेचा महिमा संपल्यावर  चमचेही दिसेनाशे झाले ‘तू चाल गडया  तुला रं आता  भिती कुणाची’ अशी दर्पोक्ती  चालत नाही, पन्नास वर्षे ज्याना नडलो , त्यांच्याशिवाय गाडी आता हलत  नाही ———————————————— मन्या म्हणाला गन्याला, आता ’थांबण्यात’ अर्थ नाही, ’साहेब-भाईं’च्या युतीला  जनाधारच उरला नाही. ————————————— अलिबाग म्हणाले रोहयाला हे असे कसे झाले ? भगव्याच्या साथीला कॉग्रेस आले! ——————————————————————————– पालिकांच्या तोंडावर झाला ’तंटा’, झेडपीच्या तोंडावर ’मनोमीलन’ पस्तावलेले कार्यकर्ते म्हणू लागले चला,आता आपण करू ’सीमोल्लंघन’ ———————————————————————————— प़शांत नाईकांचा करिष्मा 
पुन्हा एकदा कामी आला 
एक “अखिल भारतीय” पक्ष
अलिबाग पुरता राहिला
——————————————————————————————— मुरूड गेले, माथेरान गेले, 
रोहयात बोटावर निभावले 
पेण ने ही “हात” दाखविला 
सारे होत्याचे नव्हते झाले
———————————————————————————————- राजकारण म्हणजे,राजकारण म्हणजे,राजकार असते ं, ‘त्यांचे’,’यांचे’ सेम असते —————————————————————————————————- काकाच कधीही बाप असतो असं म्हणणार्‍या चुलत्याला पुतण्यानं तेवढंच

 बेडरपणे उत्तर दिलं आहे.ते उत्तर असं आहे.काका आता सहन होणार नाही 
पुतण्या म्हणाला काकाला
आता आपलं ‘जमायचं’ नाही काल पय॓त सहन केलं, आता सहन होणार नाही
 
मोठं आम्हालाही व्हायचं आहे, मान-धन आम्हालाही हवं आहे आमचा मार्ग  तुम्ही अडवू नका, आम्हाला ‘नारायणराव’ तुम्ही समजू नका काका,फार सहन केलं आता सहन होणार नाही
 
सतरंजया उचलल्या आम्ही, माणसं जमविली आम्ही, लाल दिव्याचं सायरन वाजवत गावभर फिरतात तुम्ही ही गुलामगिरी आता चालणार नाही काका़, फार सहन केलं आता सहन होणार नाही
 
तुमच्याच तालमीत वाढलोत आम्ही, रघुनाथरावा़ना ही कोळून प्यालोत आम्ही, शनिवारवाड्यातलया किंकाळीचं भय तुम्ही आम्हाला आता  दाखवू नका काका, फार सहन केलं आता सहन होणार नाही
 
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काकांशी पंगा घेणार्‍या प्रत्येक पुतण्यासाठी इशारा
‘काका मला वाचवा’
चुलता म्हणाला पुतण्याला,
काकांशी पंगा घेऊ नकोस शनिवारवाड्यातील किंकाळी आयुष्यभर विसरू नकोस
 
‘काका मला वाचवा’ म्हणत पुतण्याच शरण येत असतो इतिहासाची पानं उलगडून बघ बेटा, काकाच नेहमी ‘बाप’ असतो
 
रघुनाथरावांचे कारस्थान कोणताच काका विसरत नसतो वेळ येताच पुतण्याला ‘काका मला वाचवा’म्हणायला लावत असतो
——————————————————————————————-
 
अलिबाग म्हणाले रोहयाला ,
झालं – गेलं विसरून जाऊ,
लोकांना बनवत-बनवत
दोघं, वाटून – वाटून खाऊ
——————————————————————-
 
साम्राज्याला “तडे” गेले घरातही “तट” पडले डगमगती नैया पाहून “साहेब”ही हडबडले
काय होते,? काय झाले? हा सारा काळाचा महिमा आहे दुःख विसरायला आता केवळ “अलिबागचाच” खांदा आहे —————————————————————————————————————————–

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार याचे जागोजागी सत्कार होत आहेत.राज्यातील मोठा भाग दुष्काळात होरपळतोय आणि हे सत्कारात मग्न आहेत.त्याबद्दल मराठवाड्यातील एका तरूणानं व्यक्त केलेल्या या भावना. .हा तरूण भलेही कवी नसेल पण काव्यात त्यानं मराठवाडी जनतेचं दुःख मोजक्या शब्दात मांडलं आहे.आणि आता सत्कार थांबवा अशी आर्त हाकही दिली आहे.

———————————————- कवतूक तर लई झालं , आता तरी थांबा साहेब! ———————————————- दिल्लीत झालं,अन गल्लीतही झालं कवतूक तर लई झालं, हे सारं आता थांबवा साहेब, अन आमच्या गळ्याभोवती आवळलेल्या फासाची गाठ जरा सोडवा साहेब!
सत्कार-बित्कार बस झाले, आता बात थोडी दुष्काळाची काढू शेतकरी पिचलाय साहेब, त्याला नका असं वार्‍यावर सोडू! सत्ता गेल्याचा राग आमच्यावर नका काढू साहेब कवतूक तर लई झालं, आता तरी थांबा साहेब
‘जाणते राजे’ आहात आपण असा ‘अजाणतेपणा’ करू नका दुष्काळग्रस्तांच्या दुःखावर मीठ असं चोळू नका, पंच्च्याहत्तरीचं काय ? ती तर आमच्या ‘बा’ नं बी गाठली आहे म्हातार्‍याची तडफड आता तरी समजून घ्या साहेब कवतूक तर लई झालं, आता तरी थांबा साहेब
सत्तेवर जरी नसाल आपण, पण सत्तेपासून दूर ही तर नाहीत, मोदी,फडणवीस आपल्यासाठी मित्रापेक्षा कमी ही नाहीत त्यांच्या कानात आमच्यासाठी चार शव्द सांगा साहेब, अन कवतूक तर लई झालं, आता तरी थांबा साहेब,
आयपीएलनं आपणास ‘खूप काही’ दिलंही असेल पण आम्हीही आपणासाठी कमी खपलो नाहीत साहेब त्या मिठाला तरी जागा साहेब, अन आमच्या जखमांवर थोडा मलम लावा साहेब कवतूक तर लई झालं, आता तरी थांबा साहेब आता तरी थांबा साहेब
एक मराठवाडी ——————————————————————————————————————

‘शेतकर्‍यांनो, भिऊ नका’
 
“शेतकर्‍यांनो, भिऊ नका” असे आवाहन केलंत तुम्ही, पण उसवलेलं आयुष्य सांधायचं कसं? हे नाही सांगितलंत तुम्ही!
 
धीर धरा,कळ काढा असा सल्ला दिलात तुम्ही, पण पीक गेलं.कर्ज वाढलं, सावकाराच्या फासातून सुटायचं कसं ? त्यावर बोलला नाहीत तुम्ही!
 
कापसाला ‘भाव’ येईल
ऊसही ‘गोड’ होईल,
बाजारही ‘गरम’ होईल
असं भाकित केलंत तुम्ही
पण
आत्महत्त्या थांबतील केव्हा ?

यावरचं मौन  सोडलं नाहीत तुम्ही!

शेती सोडा, धंदा काढा नोकरीसाठी नका झिजवू जोडा असा सल्ला दिलात तुम्ही, पण हे सारं करायला ‘उभं’ कसं राहायचं? हे नाही शिकविलत तुम्ही!
 
दुःख सरंल, सुख येईल दिसं जातील,दिसं येतील अशी आशा दाखवलीत तुम्ही, पण शेतकर्‍यांना ‘नागवलं’ कुणी? शेतकर्‍यांना ‘लुबाडलं’ कुणी? शेतकर्‍यांना ‘वापरलं’ कुणी? हे मात्र नाही सांगितलंत तुम्ही!
 
‘भिऊ नकोस ,मी तुझ्या पाठिशी आहे’! असा मंत्र ‘पुन्हा एकदा’ दिलात तुम्ही पण मिठू मिठू बोलून शेतकर्‍यांना झुलवत ठेवणं थांबणार कधी? हे ही नाही सांगितलं तुम्ही! हे ही नाही सांगितलं तुम्ही!
सूर्या देवडीकर ————————————————————————————————————————— “चौथा स्तंभ” आहोत आम्ही..

मासा मारायला किमान पाण्यात जावं लागतं,
वाघ मारायला थेट जंगलात जावं लागतं या शिकारी पेक्षा फारच सोपं असतं भरदिवसा आम्हाला  रस्त्यावर मारणं,बदडणं…
 आम्हाला बदडणं फारच सोपं असतं
कारण..
 आम्हाला नसते झेड सेक्युरिटी, आम्हाला  नसते कायद्याचं किंवा मालकांचंही संरक्षण, शिवाय आम्ही असतो नेहमीच उपलब्ध , रस्त्यावर,नाक्यावर… कधीही…केव्हाही…अगदी रात्री-बेरात्रीही..
 आम्हाला बदडणं यासाठी सोपं असतं की, आम्ही असतो एकटेच नसत कुणी साथीला.. ‘हम सब एक है’ , ‘पत्रकार एकजुटीचा विजय असो’ चे नारे जरूर देेतो आम्ही पण हे सारे एक नाहीत, हे असतं गुंडांना,पुंडांना आणि सत्ताधाऱ्यंानाही नक्की माहीत…
 
पत्रकारावर हल्ला झाला की आम्ही म्हणतो, निषेध ,निषेध , निषेध.. फार तर करतो  निदर्शने, नाही तर  काढतो एखादा थोरला मोर्चा.. निषेध हा असतो आमचा ठेवणीतला शब्द, तो ही आता एवढा गुळगुळीत झालाय की,त्याचंही तेज गेलंय हरपून तरीही आम्ही  न विसरता तो वापरत असतो तो वापरून झाला की, सुटकेचे सुस्कारे सोडत असतो…
 
या साऱ्यानं मुर्दाड सरकारचं काहीच बिघडत नाही.. शेअरबाजारही गडगडत नाही..
गावातही काही  घडत  नाही.. साधा हल्लेखोरही डरत  नाही… तरीही हे सार करत असतो आम्ही..वारंवार करत असतो आम्ही..
कारण लोकशाही मानत असतो आम्ही…
गांधीवादी असतो  आम्ही..
 
धर्मान्ध शक्तीचे बुरखे फाडतो आम्ही, राजकारण्यांना नागडे कऱतो आम्ही, भ्रष्टाचाऱ्यांचे भांडे फोडतो आम्ही, आणि अनेकदा सरकारही पाडतो आम्ही.. म्हणूनच अनेकांना त्यांच्या मार्गातले काटे वाटतो आम्ही …
मग खेळले जातात “काट्यानं काटा” काढण्याचे जिवघेणे खेळ.. मात्र असे खेळ खेळणारे, कुणाच्या तरी बोटावर नाचणारे मारेकरी,हल्लेकरी आणि सरकारही हे विसरत असतं की, आम्हाला मारणं,बदडणं ,आमच्यावर हल्ले करणं भलंही सोपं असेल पण आम्हाला गप्प करणं,आमचा आवाज बंद कऱणं कुणाच्या बापालाही शक्य नसेल …
काऱण समाजाचे “वॉच डोॅग” आहोत आम्ही “चौथा स्तंभ” आहोत आम्ही..
 
एस.एम.देशमुख
 
(दाभोळकर आणि पानसरे यांची हत्या झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते व्यथित झाले.त्यांच्या भावनांना वाट करून देणारी श्री.हेरंब कुळकर्णी यांची एक कविता साधनाच्या ताज्या अंकात प्रसिध्द झाली आहे. “कार्यकर्ता मारणं सर्वात सोपं असतं”  असं या कवितेच शिर्षक आहे.कार्यकर्ता आणि पत्रकारांची अवस्था जवळपास सारखीच असल्यानं हेरंब कुळकर्णी यांच्या कवितेत थोडा बदल करून पत्रकारांच्या भावना व्यक्त करण्याचा केलेला एक प्रयत्न.. SMDeshmukh ) ———————————————————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here