सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी आज अखेर आपला माफीनामा सादर केला आहे.मी संपूर्ण पत्रकारितेला किंवा या क्षेत्राला उद्देशून वक्तव्य केले नव्हते तर पत्रकारितेतील गैरप्रवृत्तीबद्दल बोललो होतो.माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.तरीही माझ्या वक्तव्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे ज्यांची मने दुखावली त्यांच्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो असे त्यानी माफीनामा पत्रात म्हटले आहे.त्यामुळे हा विषय आता येथेच थांबविण्याचा निर्णय पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेने घेतला आहे.
हिंगोली येथील एका शिवार संवाद यात्रेत बोलताना दिलीप कांबळे यांनी पत्रकारांना जोडयानं मारण्याची भाषा केली होती.तसेच पत्रकार पाकिटं घेऊन बातम्या देतात असा बिनबुडाचा आरोपही त्यांनी केला होता.त्यांच्या या वक्तव्याची संतप्त प्रतिक्रिया मिडियात उमटली होती.एका बाजुला राज्याचे मुख्यमंत्री पत्रकार संरक्षण कायदा करतात आणि दुसर्या बाजुला त्यांच्याच मंत्रिमंडळातील एक मंत्री पत्रकारांना बुटानं मारण्याची भाषा करीत कायद्यालाच आव्हान देतात हा विरोधाभास संतापजनक होता.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने हा विषय गंभीरपणे घेत एसएमएस पाठवून आपला संताप व्यक्त करण्याचे आवाहन पत्रकारांना केले होते.त्यानुसार सात हजारच्यावर निषेधाचे एसएमएस दिलीप कांबळे यांना गेले होते.त्यामुळं यासंदर्भात पत्रकारांच्या भावना किती संतप्त आहेत याचा अंदाज त्याना आला होता.याशिवाय अनेक ठिकाणी तालुका आणि जिल्हा पातळीवर तहसिलदारांना आणि जिल्हाधिकार्यांना निवेदने देण्यात आली होती.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने मुख्यमंत्र्यांच्या कानी हा विषय घालत दिलीप कांबळे यांनी पत्रकारांची माफी मागावी अशी मागणी केली होती.दिलीप कांबळे हिंगोलीचे पालकमंत्री आहेत.तेथील पत्रकारांनी शासकीय कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता.या सर्वाचा परिणाम अशा झाला की,कांबळे यांनी राज्यातील पत्रकारांची माफी मागितली आहे.आपल्याच वक्तव्याबद्दल दिलगीरी व्यक्त करण्याची गेल्या दोन महिन्यातीली ही दुसरी वेळ आहे.राज्यातील पत्रकारांनी भक्कम एकजूट दाखवत दबाव वाढविला त्यामुळेच दिलीप कांबळे यांना माफीनामा सादर करावा लागला.त्याबद्दल एस.एम.देशमुख यांनी राज्यातील पत्रकारांना धन्यवाद दिले आहे.भविष्यात देखील अशीच एकजूट कायम ठेवावी असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.–