दिलिप कांबळे यांच्या पत्रकार परिषदेवर कोल्हापूरच्या पत्रकारांचा बहिष्कार
कोल्हापूर, दि. १२ : सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचा कोल्हापूरातील पत्रकारांनी सोमवारी निषेध केला. माहिती कार्यालयामार्फत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेवर पत्रकारांनी निषेध म्हणून बहिष्कार टाकला.
पत्रकार पैसे घेऊन कुणाबद्दलही काहीही लिहितात, अशा पत्रकारांना बुटांनी मारले पाहिजे, असे वक्तव्य कांबळे यांनी केले होते. त्याचा निषेध कोल्हापूरातील विविध पत्रकार संघटनांनी निषेध केला होता.
हिंगोली येथील शिवार संवाद यात्रेत कांबळे यांनी संबंधित वक्तव्य केले होते. त्याबद्दल पत्रकार संघटनांमध्ये अद्यापही संताप आहे. कांबळे यांनी असे विधान करून पत्रकारांना आपण जुमानत नाही, असा समज करुन घेतला असतानाही पुन्हा पत्रकार परिषद कशी काय आयोजित करु शकतात, त्यांना पत्रकारांची गरज कशी काय पडते, अशा प्रतिक्रिया कोल्हापूरातील पत्रकारांनी व्यक्त केल्या आहेत.
अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी दिलिप कांबळे यांच्या कोल्हापूरातील पत्रकार परिषदेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केल्यानंतर पत्रकारांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. यानंतर शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषदेसाठी आलेले मंत्री दिलिप कांबळे पत्रकार परिषद न घेताच तेथून निघून गेले.
दिलीप कांबळे यांनी यापूवीर्ही ब्राह्मण समाजाबद्दल अपमानास्पद जातीवाचक वक्तव्य केले होते. मंत्रीपदावरील व्यक्तीने असे विधान केल्याबद्दल समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर कांबळे यांनी जाहीर माफी मागितली होती. त्यानंतरही त्यांनी पुन्हा पत्रकारांबद्दल आक्षेपार्ह विधाने करून वाद निर्माण केला होता.