आजवर पंडित नेहरु, शास्त्री, इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी, सोनिया गांधी यासारख्या नेत्यांची संपूर्ण भाषणे मीडियाने कधी ‘लाईव्ह’ केल्याचे पाहण्यात नाही. पण एका राजकीय पक्षाचे भाषण संपूर्ण टीव्ही मीडिया पूर्ण वेळ ‘लाईव्ह’ करीत आहे. याचा अर्थ वेगळा आहे. यातून वृत्तवाहिन्यांतही थैलीशाहीची संस्कृती रुजत आहे, अशी टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस- कॉँग्रेस आघाडीतर्फे आयोजित मेळाव्यात पवार शनिवारी बोलत होते. ते म्हणाले, ”एखाद्या पक्षाने पंतप्रधानाचा उमेदवार निवडून पक्षाला नाही तर त्या उमेदवारासाठी मतदान करण्यास सांगितले जात आहे. देशाच्या निवडणुकीच्या इतिहासात असे प्रथमच घडत आहे. यातून देश लोकशाहीकडून हुकुमशाहीकडे जात आहे. ही एक फॅसिस्ट प्रवृत्ती आहे. लोकशाहीच्या मुलभूत अधिकारावर आघात झाला आहे. या प्रवृत्तीचा पराभव केला पाहिजे. ”