एक वर्षाच्या सक्तीच्या विश्रांतीनंतर रविवार आणि सोमवार असे दोन दिवस पश्चिम महाराष्ट्रात प्रवास केला.सोबत परिषदेचे पदाधिकारी शरद पाबळे,बापुसाहेब गोरे,सुनील वाळुंज आदि होते.विटा,जत,आटपाडी हा सारा दुष्काळी पट्टा..ते सारं पुस्तकात वाचलेलं..मात्र इकडं येण्याचा कधी योग नव्हता आला.अग्रणी नदीच्या खोलीकरणाचं काम सुरू होत असताना एका बैठकीसाठी जलबिरादरीच्या पदाधिकार्यांबरोबर आटपाडीला जरूर गेलो होतो..तेव्हा संपतराव पवार यांचं काम पाहता आलं..पण तेव्हाचा दौरा मर्यादित असल्यान परिसर पाहता आला नव्हता.रविवारी उमरज ते जत असा प्रवास केल्यानं विकास अजून या पट्ट्यापर्यंत पोहोचलाच नाही हे दिसत होतं.. .. पुराणात हा भाग दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा.. आज अरण्य राहिलं नाही त्याचं वाळवंट झालंय ….. येथून जाताना मराठवाडयाच्या वैराण भागातूनच आपण प्रवास करीत आहोत की काय असा भास होत होता.. ..विटा येथील पत्रकार मित्र सांगत होते,”कुंभे धरणाचं पाणी काही भागात जरूर आलंय पण अजूनही 75 टक्के भाग कोरडाठाक आहे” ..पश्चिम महाराष्ट्राचा विकास हेवा वाटावा असा झाला असताना विकासाची गंगा या पट्ट्यात का आली नाही? असा प्रश्न मनाला सतावत होता..एका पत्रकार मित्राला हा प्रश्न विचारला तर त्यानं “विकासाच्या बाबतीत उदासिन राजकीय नेतृत्व” असं उत्तर दिलं.पुढं जतच्या कार्यक्रमात याची प्रचिती आली.मराठी पत्रकार परिषद जतच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम केलेल्या मान्यवरांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता.. कार्यक़म राजकीय नव्हता.. पत्रकारांचा होता.. तरीही 700-800 लोक उपस्थित होते.हे सारं दृश्य पाहून मी अचंबित झालो होतो.. सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी देखील व्यासपीठावर होते.मला असं वाटत होतं की,कार्यक्रमाचं स्वरूप आणि लोकांची उपस्थिती बघता जत आणि परिसरातील विकासाच्या प्रश्नांवर व्यापक चर्चा होईल.जतच्या विकासाचे नवे मार्ग सापडतील.. असं झालं नाही.कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार जगताप यांनी विकास का झाला नाही यावर भाष्य केल नाही..ते बोलले “अरूणा आणि करूणा” या विषयावर..शर्मा या नावाची फोड ही त्यांनी आपल्या पध्दतीनं करून सांगितली.. त्यावर त्यांना टाळ्या जरूर मिळाल्या.. पण मला कळत नव्हतं या विषयाला हे महोदय फोडणी का देत आहेत..? अरूणा करूणाच्या विषयाचं खापर पत्रकारांच्या माथी फोडायलाही जगताप विसरले नाहीत.. .” एका नेत्याला माध्यमांनी नाहक बदनाम केलं” असा आरोप त्यांनी केला .हे महोदय भाजपचे ..त्याना राष्ट्रवादीचा पुळका का आला? असा मला प्रश्न पडणं स्वाभाविक होतं.. तो मी शेजारी बसलेल्या एका नेत्याला विचारला.. त्यांनी सांगितले की,”हे माजी आमदार आता राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्यानं ते आपला मार्ग सुकर करीत आहेत” .. पत्रकारांमधील गट-तटांबाबत देखील ते टिंगलीच्या स्वरूपात बोलले..”या संघटनेनं तुमचा सत्कार केला, पण ज्यांचा सत्कार झाला नाही त्यांनी काळजी करू नये दुसरी पत्रकार संघटना त्यांचा सत्कार करेल” वगैरे.. खरं तर समाजातील गुणवंतांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याचं काम राजकीय लोकांचं.. पण त्यांना आता अशा उपक़मांसाठी सवड मिळत नसल्यानं हे काम पत्रकार करीत आहेत.. अशा स्थितीत त्यांना पत्रकारांचं कौतूक करता येत नसेल तर त्यांनी ते करू नये पण त्यांची टिंगल तरी करू नये ना..अनुभव असा आहे की, काही पुढारयांना पत्रकारांना शिव्या धालणयात त्यांचा उपहास आ़़णि उपमर्द करण्यात मोठा आनंद मिळत असतो.. सगळ्या वाईटांना पत्रकारच जबाबदार आहेत असा ग़ह देखील अनेकांनी सोईसकररितया करून घेतलेला असतो.. आपण एखाद्या घटकावर टीका टिप्पणी केल्यानंतर समोरच्याच एेकून घेण्याची सभ्यता देखील अनेकदा दाखविली जात नाही.. श्री. जगताप हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असताना त्यांनी माझ्या अगोदर भाषण केलं आणि ते माझं भाषण व्हायच्या अगोदरच निघूनही गेले.मी त्यांच्या प्रत्येक मुद्यांचा माझ्या भाषणात, माझ्या स्वभावाप्रमाणे खरपूस समाचार घेतला पण ऐकायला ते नव्हते.कदाचित आपल्या भाषणाला देशमुख उत्तर देतील याची त्यांना कल्पना असावी.. राजकारण्यांचा हा चांगला फंडा आहे..पत्रकारांच्या कार्यक्रमात यायचं,त्यांचे हार-तुरे स्वीकारायचे आणि त्यांचेच वाभाडे काढायचे..पुन्हा जे मनाला येईल ते बोलून निघून जायचं…प्रमुख वक्त्यांचं भाषण ऐकण्यासाठी थांबलं पाहिजे एवढी सभ्यता देखील ही मंडळी पाळत नाही..माझं राज्यातील सर्वच पत्रकार संघांना सांगणं आहे की,ज्या नेत्यांना कार्यक्रम होईस्तोवर बसायला वेळ नाही त्यांना कार्यक्रमाला बोलावू नये.निमंत्रण देतानाच तुम्ही समारंभ पूर्ण होईपर्यंत बसणार असाल तरच या अन्यथा नाही आलात तरी चालेल असं सांगितलं गेलं पाहिजे.रीजकीय नेत्यांच्या कार्यक़मास त्यांची कंटाळवाणी भाषणं एेकणयाचा आपल्याला कितीही कंटाळा आला तरी आपण शेवटपर्यंत त्यांच्या कार्यक़मांना थांबतो ना? मग आपल्या कारयक़मात या नेत्यांना कसली घाई असते..? एक नेता कार्यक्रम सोडून निघून गेला की,त्याचे बगलबच्चे उठून जातात.कार्यक्रम विस्कळीत होतो.चुळबुळ सुरू होते..पत्रकार मेहनत घेऊन कार्यक्रम करतात.. त्याचं अप़ुप स्थानिक नेत्यांना नसेल तर अशा नेत्यांना बोलावण्यात काही अर्थ नसतो..खरं तर जतचा कार्यक्रम दिनराज वाघमारे आणि परिषदेचे नेते शिवराज काटकर आणि त्यांच्या सहकार्यांनी अत्यंत मेहनत घेऊन केला.आखीर-रेखीव असा हा सोहळा होता.पत्रकार मित्रांनी त्यासाठी घेतलेली मेहनत पदोपदी दिसत होती.700-800 लोकांना निमंत्रित करणं,विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्यांचं कौतूक करणंआणि त्यांनी येणं हे सारं सोपं नव्हतं काही राजकारण्यांना त्याचं काही देणं-घेणं नव्हतं असं दिसत होतं.कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच श्री. जगताप यांचं “आवरा-आवरा” सुरू होतं.त्यामुळं जतच्या विकासाच्या प्रश्नावर जी व्यापक चर्चा होणं मला अपेक्षित होतं ती झालीच नाही.जतच्या विकासाच्या गाडा नेत्यांच्या उदासिनतेच्या दलदलीत अडकला आहे हे जे मला सांगितलं गेलं होतं ते नेत्यांच्या अशा वागण्यातून मला पटलं होतं.त्यामुळच मी” नेते उदासिन असतील तर पत्रकारांनीच आता पुढं येऊन जतच्या विकासासाठी कंबर कसली पाहिजे” असं आवाहन केलं.तेव्हा लोकांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं.कोकणात मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाबाबत राजकारणी उदासिन असल्याचे जेव्हा पत्रकारांच्या लक्षात आले तेव्हा त्यांनी हा विषय हाती घेऊन एल्गार पुकारला आणि त्यात कोकणातले पत्रकार यशस्वी झाले.जत पट्टयातील पत्रकारांना देखील अशीच भूमिका घेऊन पत्रकारिता करावी लागेल.विकासाच्या बाबतीत ही सारी मंडळी आपआपल्या वर्तमानपत्रातून लिखाण तर करीतच असते परंतू त्यानं विषय मार्गी लागत नसेल तर पत्रकारांनी रस्त्यावर उतरून आणि लोकांना बरोबर घेऊन विषय मुंबईच्या वेशिवर टांगला पाहिजे.आजच आमचे गंगाखेडचे पत्रकार तेथील काही विकास प्रश्नासाठी धरणे आंदोलनं करीत आहेत.जतमध्ये असं झालं तर विकासाची गंगा सर्वदूर यायला वेळ लागणार नाही..राजकारणी निष्क्रीय असतील तर हे काम पत्रकारांना करावेच लागेत..मग” हे काय पत्रकारांचे काम आहे काय”? असा साळसूद प्रश्न कोणी विचारला तरी त्याची पर्वा करण्याची गरज नाही..जतच्या सर्व पत्रकार मित्रांना मनापासून धन्यवाद.. त्यांनी मला एक वर्षाच्या विजनवासातून बाहेर काढत एका चांगल्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची संधी दिली..पुनश्च सर्वांचे आभार. *एस एम*