माणगावला गेल्यानंतर प्रकाश काटदरे यांना फोन करायचा आणि त्यांना आनंद भुवनमध्ये बोलावून अकेत्र चहा घ्यायचा,गप्पा मारायच्या. हा गेल्या पंधरा- वीस वर्षांचा रिवाज होता.काल प्रथमच काटदरे यांना फोन न करता त्यांच्या घरी जावं लागलं.शहराच्या एका कोपऱ्यात दोन-तीन खोल्याचं एक पतराचं घर आहे.तिथं काटदरे राहायचे.पत्रकार असल्यानं ग्रामपंचायतीला सागून घरापर्यतंचा रस्ता तर त्यांनी सिमेंटचा करून घेतला होता पण घराचा उडालेला रंग मात्र त्यांना कधी मारता आला नव्हता.हा रस्ता झाल्यानंतर काटदरे अनेकांना “पत्रकाराचा वट” कसा असतो ते सांगत असायचे.मला आठवतंय,हा रस्ता झाल्यानंतर त्यांनी माझ्याकडं फोटो आणि बातमी पाठविली होती.”पत्रकाराच्या प्रयत्नानं रस्ता झाला” असं हेडिंग देऊन मी ती बातमीही छापली होती.काल या पाच -सहा फुट रूंदीच्या रस्त्यावरून त्यांच्या घराकडं जाताना हे साारं आठवलं.काटदरे यांच्या घराकडं जातानाही एक अपराधीपणाची भावना मनात होती.काटदरे आजारी आहेत हेच मला आणि आमच्यापैकी अनेकांना कळलं नव्हतं.ज्यांना कळलं होतं त्यांनी इतरांना कळविलं नव्हतं.त्यामुळं काटदरेयांच्या आजाराशी मायलेकी दोघींच तश्या झुंजत होत्या.एकाकीपणे.आम्हाला हे कळलंच नाही.थेट काटदरे गेल्याची बातमीच अंगावर धडकली.ही अपराधी भावना घेऊनच आम्ही काटदरे यांच्या घरात पाऊल ठेवलं.घरी काटदरे यांच्या पत्नी आणि मुलगी अदिती दोघीच होत्या. पत्र्याचं घर.दहा बाय दहाचा हॉल.दोन-तीन खर्च्यावर आमच्या पैकी ज्याना बसता येईल ते बसले.सारेच अस्वस्थ होते.सुरूवात कशी आणि कोठून करायची हेच कळत नव्हतं.अश्या प्रसंगांना सामारं जाताना माझीही बोलती बंद होते.अदितीच्या आईनंच ही कोंडी फोडली आणि काटदरे यांचा आजार,झालेले उपचार याची माहिती दिली.मग सारेच थोडे मोकळे झाले.यानंतर अदितीच्या हाती आम्ही 65 हजारांचा चेक दिला.तो घेताना तिच्याआणि तिच्या आईच्या मनाची झालेली चलबिचल आम्हाला दिसत होती.प्रकाश काटदरे हे कमालीचे स्वाभिमानी पत्रकार.त्यांनी कधी कोणापुढं हात पसरलं नाहीत.जाहिरातीसाठीही कधी कुणाच नाकदुऱ्या काठल्या नाहीत..असं असताना आपल्यावर मदत घेण्याची वेळ येतेय याचं शल्य दोघींच्याही चेहऱ्यावर दिसत होतं. मात्र काटदरे आमच्या भावासारखे होते.रायगड प्रेस क्लब एक कुटुंब आहे आणि ते त्या कुटुंबाचे सदस्य होते त्यामुळं मनात कसलाही किंतू न आणता ही रक्कम स्वीकारा अशी विनंती आम्ही दोघी मायलेकींना केल्यानंतर त्या तयार झाल्या.अदितीनं चेक स्वीकारला आणि मग त्यांनी एवढा वेळ दाबून ठेवलेल्या अश्रूंना आवर घालता आला नाही दोघींचाही अश्रूंचा बांध फुटला.आमच्या डोळ्याच्या कडाही मग आपोआप आोल्या झाल्या.काही मिनिटं अशीच निःशब्द गेल्यानंतर “अदितीच्या शिक्षणाची सोय नागपूरच्या मैत्री परिवारचे चंदु पेडके आणि जनमंच संस्थेचे अनिल किलोर यानी क रण्याच मान्य केलं आहे.त्यामुळं ती पुण्यात राहील पण तुमचं काय?” असं मी अदितीच्या आईस विचारलं तेव्हा मी पनवेलच्या एका आश्रमात चौकशी केली आहे आणि तिथं माझी व्यवस्था होईल असं त्यांनी सांगितलं.हे सारं ऐकून अस्वस्थ झालो.यावर काय बोलणार?.आमचे फोन नंबर अदितीकडं देऊन आम्ही साऱ्यांनी दोघी माय-लेकींचा निरोप घेतला.
अदितीकडे जाताना ” आम्ही 65 हजाराची मदत करतो आहोत म्हणजे फार मोठं काम करायला निघालो आहोत असा थोडा अहंकार मनात होताच होता,पण अदितीच्या घरातील वातावरण पहिल्यानंतर हा अहंकार आपोआप गळून पडला.फाटलेल्या आभाळाला 65 हजारांनी काही ठिगळ लागू शक णार नाही याची नम्र जाणीव झाली.आणि माझाच मला राग आला.अस्वस्थ मनानं आणि जड झालेल्या पायांनी आम्ही गाडीकडं आलो.गाडीत येईपर्यत कोणीच कोणाला काही बोललो नाहीत.जी अवस्था माझी झाली होती तीच संतोष ,मिलिंद,विकास,दादा दांडेकर ,कमलाकर,शोभना या सर्वांची झाली होती. ही अवस्था आहे पत्रकारांची.उठसुठ पत्रकारांना शिव्याची लाखोली वाहनाऱ्यांंंनी निष्टेनं,प्रामाणिकपणे पत्रकारिता करणाऱ्या पत्रकाराची खऱी स्थिती पाहायची असेल तर त्यांनी माणगावला जाऊन काटदरे कुटुंबाची नक्की भेट द्यावी.
निष्ठेनं,प्रामाणिकपणे,सचोटीनं आणि एक व्रत म्हणून गावाकडं पत्रकारिता करायची असेल तर त्याला आणि त्याच्या नंतर त्याच्या कुटुंबाला कोणत्या अग्निदिव्यातूनजावं लागतं हे काटदरे यांच्या घरी गेल्यावर पुन्हा एकदा कळलं.माणगावच्या डेपोचा प्रश्न असेल,माणगावमधील स्वच्छतेचा प्रश्न असेल,माणगाव तालुक्यातील भुमीपुत्रांचे प्रश्न असतील या सर्व प्रश्नांसाठी काटदरे यांनी आपली केवळ लेखणीच वापरली असं नाही तर ते अनेकदा रस्त्यावरही उतरले.मुंबई-गोवा महामार्गाच्या रूंदीकरणाचा आमचा लढा असेल,सेझ विरोधी आंदोलन असेल,पाण्यासाठीची लढाई असेल या साऱ्या आंदोलनात काटदरे मोठ्या आनंदानं सहभागी होत आणि दिली जाईल ती जबाबदारीही खंबीरपणे पार पाडत. गावासाठी झगडणाऱ्या या पत्रकाराला आणि त्याच्या कुटुंबाला मात्र गावाने वाऱ्यावर सोडलं आहे.गावातील एकही “भला” माणूस काटदरे यांंच्या कुटुंबाची हाल विचारण्यासाठी त्यांच्या घरी गेला नाही.हे सारं काटदरे एक प्रामाणिक पत्रकार होते म्हणून घडल आहे…हे वेगळे संगनेचे गरज नाही
एस एम देशमुख