बिहार प्रेस बिलाच्या विरोधात
तुरूंगात गेलेल्या पत्रकारांचा टणला सत्कार
बिहारच्या जगन्नाथ मिश्र सरकारनं माध्यमांची मुस्कटदाबी करणारं विधेयक विधानसभेत मंजूर केलं त्या घटनेला पुढील महिन्यात 36 वर्षे पूर्ण होत आहेत.जुलै 1982 ची घटना होती.या विधेयकाचा उल्लेख तेव्हा ‘बिहारचे काळे विधेयक’ असा केला गेला.विधेयक संमत झाल्यानंतर आणि त्यातील वृत्तपत्र स्वातत्र्यांचा गळा घोटणार्या तरतुदी समोर आल्यानंतर देशभर या विधेयकास विरोध सुरू झाला.
महाराष्ट्रात सर्व प्रथम मराठी पत्रकार परिषदेनं आवाज उठविला. विधेयकाला विरोध करण्यासाठी सोलापूर येथे आंदोलन करण्याचा निर्णय परिषदेनं घेतला.बंदीहुकूम मोडून परिषदेने मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा 80 पत्रकारांना अटक करून त्यांना औरंगाबादच्या हर्सुल तुरूंगात ठेवण्यात आलं.परिषदेच्या या आंदोलनाची तेव्हा देशभऱ चर्चा झाली.नॅशनल मिडियानं त्याची दखल घेतली.हे आंदोलन परिषदेच्या इतिहासातील सोनेरी पान समजलं जातं.या आंदोलनात ज्यांनी तुरूंगवास भोगला आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचं रक्षण केलं अशा पत्रकारांपैकी थोडेच पत्रकार आज हयात आहेत.जे हयात आहेत ते देखील थकलेले आहेत.मात्र 35 वर्षानंतरही परिषदेसाठी त्यांनी दिलेलं योगदान परिषद विसरलेली नाही.त्यामुळं या लढ्यात ज्यांनी तुरूंगवास भोगला अशा 5 पत्रकारांचा प्रातिनिधीक सन्मान येत्या रविवारी मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका अध्यक्षांच्या मेळाव्यात करण्यात येणार आहे.समारोप कार्यक्रमात मानपत्र,शाल,श्रीफळ देऊन या मान्यवर पत्रकारांना गौरविण्यात येणार आहे.ज्या पाच पत्रकारांचा सन्मान होत आहे त्यामध्ये बाळासाहेब बडवे ( पंढरपूर ) सुरेश शहा (कुर्डुवाडी) दिलीप पाठक नारीकर ( उस्मानाबाद ) शशिकांत नारकर ( पांगरी,सोलापूर ) नवीन सोष्टे ( नागोठणेे,रायगड ) यांचा समावेश आहे.ही सारे पत्रकार प्रथम पासून परिषदेशी जोडले गेलेले आहेत.आजही त्यांची परिषदेवर केवळ निष्ठाच नाही तर परिषदेला वेळपरत्वे ते मदतही करीत असतात.महाराष्ट्रात तीन तीन पिढ्या परिषदेबरोबर असलेली अनेक पत्रकार घराणी आहेत त्याचा परिषदेला केवळ अभिमानच नाही तर ती परिषदेची खरी ताकद आहे.( एस.एम.)