तहसिलदारांना झालंय तरी काय?

0
1073

*कडेगाव तहसिलदारांची हुकूमशाही..

राज्यातील अनेक तहसिलदारांना झालंय काय हेच कळत नाही.. आपल्या विरोधात बातम्या आल्या की, ते भडकतात आणि हातातील अधिकाराचा गैरवापर करीत पत्रकारांवर गुन्हे तरी दाखल करतात, पोलिसांना हाताशी धरून पत्रकारांना अटक करायला भाग पाडतात किंवा नोटिसा पाठवून कायदेशीर ससेमिरा त्यांच्या मागे लावतात.. अलिकडे बीड, नांदेड, वाशिम आदि जिल्ह्यात अशा घडल्या आहेत आज सांगली जिल्ह्य़ातील कडेगाव येथे असाच प्रकार घडला असून तहसिलदारांच्या अरेरावीचा विरोधात सारे पत्रकार एकवटले आहे
परिषदेचे राज्य उपाध्यक्ष काटकर आणि सांगली जिल्हाध्यक्ष जालंदर हुलवान यांनी आमच्याकडे जी माहिती पाठविली आहे ती अशी..

कडेगाव महसूल प्रशासनाच्या कारभारातील चुका दाखवल्याने कडेगावच्या तहसीलदारांचा संताप अनावर होतो आहे आणि त्यातून पत्रकारांना नोटिसा निघत आहेत. आपण लिहिलेल्या बातमीचा पुरावा द्या अन्यथा एकतर्फी कारवाई करेन असा हुकुमशाही कारभार कडेगाव मध्ये सुरु आहे. याचा सांगली जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि मराठी पत्रकार परिषद मुंबई यांच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत. कडेगाव तहसीलदारांनी अशी नोटीस कोणत्या अधिकाराने काढली, जिल्हाधिकारी किंवा प्रांत यांनी त्यांना तशी परवानगी दिली आहे किंवा बातमीची दखल घेऊन प्रांत, जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी सुरु करुन तहसीलदारांना त्यावर नेमले आहे का? याविषयी जाणून घेऊन लवकरच जिल्हाधिकारी चौधरी यांच्याकडे तक्रार करण्यात येणार आहे. यापूर्वी एका पत्रकाराने वाळू विषयी बातमी दिली तेव्हाही अशीच दबावाची नोटीस देण्यात आली. सदरच्या पत्रकाराने रात्री दोन वाजता येरळा पात्रात थांबून पुरावे गोळा करून दिले मात्र त्यानुसार तहसीलदारांनी कारवाई केली नाही यावरून आपल्या कारभारविरुद्ध बातमी आली तर पत्रकाराला दबावात घेण्यासाठी हे होत आहे हेच स्पष्ट होते. त्यामुळे आम्ही याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना भेटून करणार आहोत. कडेगाव तहसीलदारांच्या दडपशाहीचा धिक्कार

(Visited 97 time, 1 visit today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here