उस्मानाबादचे पत्रकार सुनील ढेपे यांच्यावर हल्ला झाल्यानंतर आणि त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाल्यापासून पत्रकारांच्या स्वभावाचे वेगवेगळे कंगोरे बघायला,अनुभवायला मिळाले.काही पत्रकार मित्र खरोखऱच प्रामाणिकपणे ढेपेना मदत करीत होते,आहेत.काही केवळ कोरडी सहानुभूती व्यक्त करीत होते.काही ग्रुपवरून सल्ले देत होते,काही हात झटकून मला काही देणे -घेणे नाही अशा अविर्भावात वागत होते,अन काहींनी चक्क सुनील ढेपेंच्या बदनामीची मोहिम उघडली होती.ढेपे किती वाईट माणूस आहे हे भासविणारी एक पोस्ट विविध ग्रुपवर फिरविली जात होती.माझ्या व्यक्तीगत व्हॉटसअॅपवर किमान पंधरा जणांनी ही पोस्ट टाकून मला सूचक इशारा दिला होता.या पोस्टमधील एकच गोष्ट खरी आहे की,सुनील ढेपेंनी आपल्या लेखणीतून अनेकांना शत्रू करून ठेवलेले आहे.बाकी सारं छुट आहे,सांगीव,ऐकीव आहे.ही पोस्ट टाकून बुध्दीभेद करण्याचा प्रयत्न झाला .मला काही फोन आले,कुठे चुकीच्या माणसाचं समर्थन करण्यात वेळ घालवता असा सल्ला दिला गेला.माझ्याकडं एकच उत्तर होतं,सुनील ढेपे चुकीचा असेल तर त्याच्यावर जे चुकीचे ,खोटे गुन्हे दाखल केले आहेत त्याचं काय? चुकीचे गुन्हे,चुकीची कलमं लावली गेलीत म्हणून तरी सार्यांनी आवाज बुलंद केला पाहिजे असं माझं संबंधित मित्रांना सांगणं होतं. ही पोस्ट टाकण्यामागचा उद्देश खरे-खोट ठरविण्याचा नव्हताच.ढेपेला समर्थन मिळू नये,सहानुभूती मिळू नये असा तो उद्देश होता.तो सफल झाला .ढेपेवर गुन्हे दाखल झाल्याने आपल्याविरोधात ढेपेने लिहिलेल्या बातमीचा परस्पर वचपा निघाल्याचा आनंद काही जणांना होत आहे हे या पोस्टमधून उघड दिसत आहे ..सुनील ढेपेंशी माझेही अनेक बाबतीत मतभेद होते,आहेत.ते असलेच पाहिजेत.परंतू सुनील ढेपेंच्या चुका दाखवून त्याला सुळावर लटकविण्याची ही वेळ नाही असे मला वाटते.मुळात या सर्वातला धोका आपण लक्षात घेतला पाहिजे.हा विषय सुनील ढेपे किंवा कोणा व्यक्तिविशेष पुरता मर्यादित नाहीच.ज्या पध्दतीनं सुनील ढेपेंना टॅ्रप टाकून लटकवले आहे ती पध्दत कोणाच्याही बाबतीत अवलंबिली जावू शकते.जातही आहे.अनेकांना याची कल्पना नसेल की,गेल्या सहा महिन्यात किमान 22 पत्रकारांवर विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत.विनयभंगापासून खंडणी,अॅट्रॉसिटी,फसवणूक असे गंभीर स्वरूपाचे हे गुन्हे आहेत.ही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची कार्यशैली झालेली आहे.बदमाश्यंच्या एक गोष्ट लक्षात आलेली आहे की,पत्रकारांवर हल्ले केले तर पत्रकाराला समाजाची सहानुभूती मिळते,हल्ला करूनही समाज,पत्रकार त्याच्या पाठिशी उभे राहतात आणि त्यामुळे हल्ल्े झाल्यानंतरही पत्रकार नव्या जोमाने कामाला लागतात.त्यातून पत्रकाराला अद्यल घडविण्याचा आपले उद्देश काही साध्य होत नाहीत .त्यामुळे गुन्हेगारांनी,राजकीय मंडळींनी पत्रकारांचा आवाज बंद कऱण्याची नवी कार्यशैली शोधून काढली आहे.त्यानुसार पत्रकारांवर खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे आणि पत्रकाराला कायमसाठी आयुष्यातून उठवायचे.गुन्हेगारी प्रवृत्तीच्या या मोहिमेत पोलिसांची त्यांना साथ मिळत असते.कारण एकही पत्रकार असा नसेल की कधी ना कधी त्याला पोलिसांशी पंगा घ्यावा लागलेला नसेल.अशी एखादी तक्रार आली ( बर्याचदा पोलीसच अशी तक्रार द्यायला लावतात ) की पोलिस मागचे हिशोब वसूल करतात.रूढ होत चाललेला हा पायंडा मोडायचा असेल तर सुनील ढेपेंचे दोष काढत बसण्यापेक्षा अशा वेळी सर्वांनी सुनील ढेपेंच्या पाठिशी उभे राहण्याची गरज आहे.नाही तर आज सुनील ढेपे उद्या आणखी कोणी .हे चालतच राहणार आहे.यामध्ये काठावर बसून गंमत पाहणारे,मिटक्या मारणारेही कधी सुटणार नाहीत हे नक्की.काळ सोकावत जाणं हे सर्वासाठीच धोकादायक आहे.
सुनील ढेेपेंनी चूक काय केली ? एक बातमी दिली.मटकाकिंगच्या विरोधात बातमी दिली.त्यानंतर सहा-आठ महिला आणि काही पुरूष ढेपेंच्या ऑफिसमध्ये गेले .तेथे ढेपेला मारहाण केली.नंतर तेथून ढेपेंच्या अगोदर ही सारी मंडळी पोलीस ठाण्यात पोहोचली.पोलीस ढेपेच्या काार्यलयात आले.त्याला उचलले.हे भयंकर आहे..सुनील ढेपेंवर गुन्हे दाखल करताना जी कलमे लावली आहेत ती सुनील ढेपेंना आयुष्यातून उठवायचंच या इर्षेतूून लावलेली आहेत हे स्पष्टच दिसतंय.376 हे कलम बलात्काराशी संबंधित आहे.354 हे कलम विनयभंगाशी संबंधित आहे.323 हे कलम मारहाणीशी संबंधित आहे.504 शांतता भंग करणे या साऱखी कलमे लावली गेली आहेत.शिवाय अनुसुचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याचे कलमही लावले गेलेेले आहे.खरं तर चौकशी करूनच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता.या प्रकरणात असं काहीही झालेलं दिसत नाही..ही सारी कलमं अजामिनपात्र आणि एखादया माणसाला कायमसाठी आयुष्यातून उठविण्यासाठी पुरेशी आहेत.हे हत्त्यार यशस्वी होतंय असं दिसलं की,मग हे कोणत्याही पत्रकाराच्या विरोधात वापरले जावू शकते हे वास्तव आपण लक्षात घेणार नसू तर येणारा काळ पत्रकारांसाठी खरोखऱच कठीण आहे.त्यामुळेच मागचे हिशोब चुकते करीत बसण्यापेक्षा अशा वेळेस सर्वांनी केवळ पत्रकार या एकाच भूमिकेतून एकत्र आले पाहिजे अशी सर्वांना नम्र विनंती आहे. फाटे फोडत बसण्यापेक्षा सुनील ढेपेंना सर्वतोपरी मदत करणे आजची गरज आहे असे वाटते.यातून आपल्या एकीचे दर्शन तर घडेलच शिवाय पुन्हा खोटे गुन्हे दाखल कऱण्याचं धाडस कोणी करणार नाही.(ज्या पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले आहेत पण अशा गुन्हयातून ज्यांची निर्दोष मुक्तता झालेली आहे अशा पत्रकारांना संबंधितं खोटे गुन्हे दाखल करणार्या बदमाशांच्या विरोधात अब्रुनुकसानीचे खटले भरण्यास आम्ही सांगितले आहे.त्यासाठीची कायदेशीर आणि आर्थिक मदत मराठी पत्रकार परिषद करणार आहे.शेवटी अशा प्रकारांना कुठे तरी चाप लावला पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटतं.)
सुनील ढेपे प्रकरणात आता पुढं काय ? असा प्रश्न आहे.कायदेशीर लढाई लढणं हा आता एकमेव मार्ग आहे.ती आपण सुरू केलेली आहे.ही लढाई दीर्घकालीन आहे हे जरी खरं असलं तरी त्याला इलाज नाही.ती लढावी लागेल.स्थानिक पातळीवर एक प्रतिकात्मक आंदोलन कऱण्याचा मानस होता पण स्थानिक पातळीवर या कल्पनेला फारसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.स्थानिक राग-लोभ अशा वेळेस तीव्रपणे सामोरे येताना दिसतात.हे चित्र सर्वत्र असते.काही जण आपल्याच मानसाच्या चुका दाखवत राहतात तर काही जण फिर्यादी किती रास्त आहे हे सांगत राहतो.यातून आपसाताली मतभेद समाजाला ,पोलिसांना दिसतात आणि मग सारेच आपली पोथी ओळखतात.उस्मानाबादमध्ये हेच दिसतंय.ही सारी परिस्थिती बदलली पाहिजे म्हणून मी आणि माझी संघटना सुनील ढेपेंबरोबर आहोत.आम्ही पत्रकारांना मदत करताना,त्यांच्या अडचणी समजून घेताना कोण कुठल्या संघटनेचा,पेपरचा,भागातला याचा कधी विचार केला नाही.पत्रकार एवढीच ओळख समजून त्याला मदत केली आहे.सुनील ढेपेंच्या बाबतीत आमची हीच भूमिका आहे.तो आमच्या संघटनेचा नाही,माझा नातेवाईक नाही.तो पत्रकार आहे अन आज त्याच्यावर अन्याय होतोय असं मला प्रामाणिकपणे वाटतं म्हणून आम्ही त्यांच्या सोबत आहोत.आपणासर्वांना माझी नम्र विनंती आहे की,आपणही हीच भूमिका घेऊन ज्या ज्या पध्दतीनं सुनील ढेपेंना मदत करता येईल त्या त्या पध्दतीनं करावी आणि पुन्हा कोणी असे खोटे गुन्हे दाखल करू शकणार नाही एवढी भक्कम एकजूट दाखवावी ही पुनश्च विनंती.
( एस.एम.देशमुख )
सर वाचताना अंगावर काटा येतोय. पत्रकारच पत्रकाराचा दुश्मन झाला आहे