राजकारण, अर्थकारण व आंतरराष्ट्रीय घडामोडींचे जाणकार, ज्येष्ठ पत्रकार व महाराष्ट्र टाइम्सचे माजी वरिष्ठ सहाय्यक संपादक सुहास फडके यांचं आज मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात अल्पशा आजारानं निधन झालं. ते ६४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना रंजना फडके व कन्या साहिली असा परिवार आहे. फडके यांच्या निधनाबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. नवोदित पत्रकारांना समजून घेणारं व त्यांना प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्त्व त्यांच्या रूपानं हरपल्याची भावना पत्रकारांमध्ये व्यक्त होत आहे.
सुहास फडके हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. हिंदुजा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज दुपारी दोन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. भांडुपमधील दातार कॉलनी येथील निवासस्थानी सायंकाळी पाच वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
फडके यांचा जन्म ६ मे १९५४ रोजी झाला. रुईया महाविद्यालयातून त्यांनी बीएची पदवी घेतली. त्यानंतर ते ‘ब्लिट्झ’ साप्ताहिकात रुजू झाले. तिथं काही वर्षे पत्रकारिता केल्यानंतर ते दीर्घकाळ महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत होते. क्रीडा पत्रकार म्हणून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर स्थानिक प्रतिनिधी म्हणूनही काम पाहिले. महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीतही त्यांनी काम केले. २००८ ते २०१२ या दरम्यान त्यांनी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या संपादकपदाची धुरा वाहिली होती.
मटावरून साभार