ज्येष्ठ पत्रकार सुधाकर अनवलीकर यांचे सोमवारी पार्किसन्सच्या आजाराने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, कन्या, सून व जावई असा परिवार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’चे पुणे प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) सायंकाळी पुण्यात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली.
अनवलीकर यांचा जन्म पंढरपूर येथे झाला. त्यांचे शिक्षण व पत्रकारितेतील बहुतांशी कारकीर्द पुण्यात झाली. १९५७ ते १९६३ या काळात त्यांनी सकाळमध्ये पत्रकारिता केली. त्यानंतरचे एक वर्ष ते ब्रिटिश इन्फॉर्मेशन सर्व्हीसमध्ये होते. १९६४ मध्ये ते ‘महाराष्ट्र टाइम्स’मध्ये दाखल झाले. १९९७ मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी ३३ वर्षांत विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. मुंबई येथून प्रसिद्ध होणाऱ्या ‘महाराष्ट्र टाइम्स’चे पुण्यातील प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम पाहिले.