हिंदुस्थान टाइम्स, इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्रांतील त्यांची संपादकीय कारकीर्द गाजली होती. नागरिकांच्या अधिकारांसाठी सातत्याने उभा ठाकणारा पत्रकार अशी त्यांची ओळख होती. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना, १९६६ ते १९६९ या कालावधीत वर्गिस हे त्यांचे माहिती सल्लागार होते. मात्र पुढे इंदिरा यांनी आणीबाणी लादल्यानंतर वर्गिस यांनी आपली लेखणी त्यांच्याविरोधात परजली होती. वर्गिस यांनी त्यांच्या पत्रकारीतेच्या प्रदीर्घ कारकीर्दीत अनेक पुस्तके लिहिली. अगदी अखेरपर्यंत त्यांचे पुस्तकांवर काम सुरूच होते.