ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत आणि टाइम्स ऑफ इंडियाचे सल्लागार संपादक दिलीप पाडगावकर यांचं आज पुण्यातील रुबी रुग्णालयात निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने पत्रकारितेतील एक चतुरस्र व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे.
दिलीप पाडगावकर हे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होते. १८ नोव्हेंबर रोजी त्यांना पुणे येथील रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार घेत असताना आज त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि दुपारी सव्वाबाराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
दिलीप पाडगावकर यांनी वयाच्या २४ व्या वर्षी पत्रकारितेला सुरुवात केली. १९६८ मध्ये मानवता या विषयात पॅरिसमध्ये डॉक्टरेट मिळवली. त्यानंतर ते टाइम्स ऑफ इंडियात पॅरिस प्रतिनिधी म्हणून रुजू झाले. टाइम्समध्ये १९८८ मध्ये संपादकपदाची धुरा हाती घेण्याआधी त्यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीरित्या पार पाडल्या. १९८८ नंतर सहा वर्षे ते टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक होते. दरम्यान १९७८ ते १९८६ अशी आठ वर्षे त्यांनी पॅरिस आणि बँकॉकमध्ये युनेस्कोसाठी काम केले.
ध्येयवादी पत्रकार गेला- एस.एम.देशमुख
दिलीप पाडगावकर यांच्या निधनाने जुन्या पिढीतील एक ध्येयवादी पत्रकार आपल्यातून निघून गेला असल्याचे मत मराठी पत्रकार परिषदेचे अद्यक्ष एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे.दिलीप पाडगावकर यांचे आज निधन झाले.त्यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया देताना देशमुख म्हणाले,आज माध्यमांबद्दल अनेक प्रवाद व्यक्त होत असताना दिलीप पाडगावकर ध्येयवादी पत्रकारांना आपला आदर्श वाटायचे.त्यांची आज गरज असताना ते आपल्याला सोडून निघून गेले आहेत.एका मराठी माणसाने इंग्रजीत आपला माध्यमात आपला ठसा उमटविला.ते टाइम्स ऑफ इंडियाचे संपादकही झाले याचा सार्थ अभिमानही प्रत्येक पत्रकाराला आहे.त्यांच्या निधनाबद्दल मराठी पत्रकार परिषद तसेच पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीतर्फे भावपूर्ण श्रध्दांजली.-