ज्येष्ठ पत्रकार आणि सामजिक कार्यकर्त्या गौरी लंकेश यांची बेंगळुरूत निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. चार हल्लेखोरांनी घरात घुसून गौरी यांच्यावर जवळून गोळ्या झाडल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, गौरी यांच्यावर हल्ला करणारे कोण होते आणि कोणत्या कारणासाठी त्यांची हत्या करण्यात आली याबाबत अद्याप कोणतीच माहिती पुढे येऊ शकलेली नाही.
गौरी लंकेश (५५) यांचं राजराजेश्वरी भागात घर असून तिथेच त्यांच्यावर रात्री ८ च्या सुमारास हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर अगदी जवळून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. गोळ्या वर्मी लागल्याने त्या जागीच कोसळल्या व त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले असून त्यांच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
गौरी लंकेश या साप्ताहिक ‘लंकेश पत्रिका’च्या संपादिका होत्या. विविध वर्तमानपत्रांमध्ये त्या स्तंभलेखनही करायच्या. न्यूज चॅनेल्सवर प्राइम टाइममध्ये होणाऱ्या विविध चर्चेच्या कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असायचा.
दरम्यान, गौरी यांचे भाऊ इंद्रजीत यांनी याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेने तीव्र शब्दात निषेध केला असून मारेकर्यांचा शोधून काढण्याची मागणी केली आहे.
( बातमी महाराष्ट्र टाइम्सच्या सौजन्याने )