गुरूनाथ नाईकांच्या निमित्तानं…
ज्येष्ठ पत्रकारांना असंच वार्यावर सोडायचं का ?
ज्येष्ठ आणि वयोवृध्द पत्रकारांना महाराष्ट्र सरकारने तातडीने पेन्शन सुरू केली पाहिजे अशा मागणी आम्ही गेली वीस वर्षे का करीत आहोत याचं आणखी एक उदाहरण समोर आलं आहे.ज्येष्ठ आणि वयोवृध्द पत्रकार गुरूनाथ नाईक यांच्या आजच्या स्थितीबाबत काल मुकेश माचकर यांनी एक पोस्ट टाकली होती.ती वाचून कोणत्याही संवेदनशीलमनाच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.कारण गुरूनाथ नाईक हे जसे पत्रकार आहेत तसेच ते ज्येष्ठ साहित्यिकही आहेत.रहस्यकथा लेखक म्हणून त्यांचा नावलौकिक होता आणि माझी पिढी त्यांच्या रहस्यकथा वाचूनच मोठी झाली.त्यांच्या कथा आणि कांदबर्यांच्या अनेक आवृत्या निघाल्या पण त्याचा फायदा प्रकाशकांनाच झाला असे दिसते.कारण आज ते अत्यंत कफल्लक अवस्थेत अखेरचे दिवस मोजत आहेत.बारा वर्षांपूर्वी त्यांना मेंदुचा पक्षाघात झाल्यानंतर त्याना काही लिहिता आले नाही.केवळ लेखणी हेच उपजिविकेचं साधन असलेल्या गुरूनाथ नाईक यांच्या हातातून ते ही साधन नियतीनं काढून घेतल्यानं त्यांच्या उपजिविकेचाच प्रश्न निर्माण झाला.अगदी खाण्यापिण्याचे आणि ओषधोपचाराचेही वांदे झाले.गेली काही वर्षे ते अश्याच स्थितीत जगत आहेत.अगोदर ते लातूरला होते.त्यावेळेस त्यांची स्थिती लातूरचे पत्रकार जयप्रकाश दगडे यांनी मला कळविली तेव्हा सरकारच्या पत्रकार कल्याण निधीतून काही मदत मिळते का याचा प्रयत्न केला.नुकतंच त्याचंं ऑपरेशन झालं होतं.त्यामुळं त्यांचा अर्ज घेऊन मी माहिती आणि जनसंपर्कच्या वरिष्ठ अधिकार्यांना भेटलो तर मला उत्तर दिलं गेलं हा अर्ज डीआयओ मार्फत येऊ द्या.त्यावरून बरीच वादावादी झाल्यानंतर तो अर्ज स्वीकारला गेला.नंतर तो समितीसमोर आला आणि गुरूनाथ नाईक यांच्याकडं अधिस्वीकृती नाही या सबबीखाली केवळ पंधरा हजार रूपयांची भरघोष (?) मदत त्यांना देण्याचा निर्णय झाला.तो चेक परस्पर लातूरला गुरूनाथ नाईक यांच्याकडं पाठविला गेला.त्यानंतर त्यांच्या पत्नीचा मला फोन आला आणि त्यांनी सरकारनं पंधरा हजार रूपयांचाच चेक दिला असल्याचं सांगितलं.त्यावर मी माणूस पाठवितो तो चेक परत पाठवा मी मुख्यमंत्र्यांच्या हवाली करतो असं जेव्हा त्यांना सांगितलं तेव्हा त्यांनी तो कालच बॅकेत टाकला.घरी गॅस सिलेंडर नव्हतं असं सांगितलं.त्यानंतर आम्ही काही मित्रांनी थोडी फार मदत केली.जयप्रकाश दगडे यांनी त्यांच्या मुलाची महाविद्यालीयन फीस माफ होईल याची काळजी घेतली.त्यानंतर ते गोव्याला गेल्याचे कळले.नंतर त्यांचा संपर्क राहिला नाही.काल मुकेश माचकर यांच्या फेसबुक वॉलवर त्यांच्याबद्दलची माहिती वाचली आणि सरकार ज्येष्ठ पत्रकार आणि ज्येष्ठ साहित्यिकांबद्दल किती उदासिन आणि कृतघ्न आहे याची पुन्हा एकदा जाणीव झाली.
गुरूनाथ नाईक सध्या पणजी येथे वास्तव्य करून आहेत.गोवा सरकारचे उपकार यासाठी मानावे लागतील की,त्यांना राहण्यासाठी गोवा सरकारनं घर दिलं आहे.त्यासाठी त्यांना महिन्याचे हजार रूपये भाडे द्यावे लागते.या घराबरोबरच गोवा सरकार त्यांना तीन हजार रूपये पेन्शन देते.मात्र वीज,पाणी,आणि इतर खर्च मिळणार्या रक्कमेत शक्य होत नाही अशी माहिती त्यांच्या पत्नी गीता नाईक यांनी दिली.त्यांचा मुलगा सध्या लातूरमध्ये पार्ट टाइम नोकरी करून एमएससी करतोय.स्वतः गुरूनाथ नाईक हे छातीत संसर्ग झाल्यानं रूग्णालायात दाखल होते.त्यांना गुरूवारी घरी सोडण्यात आलं.आजार आणि उपचार सुरू असल्यानं या कुटुंबाची प्रचंढ ओढातान सुरू आहे.सध्या नाईक 79 वर्षांचे असून त्यांच्या उपचाराचा खर्च दरमहा चार ते साडेचार हजार एवढा आहे.त्यांच्या पत्नीचं वयही 62 असून त्याही आजारी असतात.एक विवाहित मुलगी आहे.पण तिची आर्थिक स्थितीही फार चांगली नसल्यानं ती देखील मदत करू शकत नाही.अशा स्थितीत गुरूनाथ नाईक यांच्या साहित्यावर प्रेम करणार्या तसेच प्रत्येक पत्रकाराचं कर्तव्य आहे की,या कुटुंबाला शक्य असेल तेवढी मदत केली पाहिजे.गुरूनाथ नाईक यांच्या पत्नी गीता नाईक यांनी महाराष्ट्र सरकारनं मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.मला नाही वाटत की,महाराष्ट्र सरकार काही मदत करील.माहिती आणि जनसंपर्कमध्ये अत्यंत जाड कातडीेचे अधिकारी बसलेले असल्यानं त्यांना अशा गोष्टीत रस नसतो.त्यामुळं गुरूनाथ नाईक यांच्याकडं अधिस्वीकृती नाही,त्यांना एकदा पंधरा हजारांची मदत केलेली असल्याने पुन्हा करता येणार नाही,किंवा आता ते राज्याबाहेर म्हणजे गोव्याला आहेत अशी कारणं सांगून त्याना मदत करणं कसं अशक्य आहे ते पटवून देतील.आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की,त्यांनी विशेष बाब म्हणून या कुटुंबाला मदत केली पाहिजे.कारण पत्रकार असोत किंवा साहित्यिक असोत आयुष्यभर लेखणीच्या माध्यमातून समाजाची सेवा करीत असतात.त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांची काळजी घेणे हे सरकारचे आणि समाजाचे कर्तव्य आहे असं मला वाटतं.समाजाच्या पत्रकारांकडून ढीगभर अपेक्षा असतात,त्या असायलाही हरकत नाही मात्र जेव्हा पत्रकार अडचणीत असतो तेव्हा मग समाजानेही त्याच्या पाठिशी उभे राहिले पाहिजे एवढीच आमची अपेक्षा असते.आज ते होताना दिसत नाही.पत्रकार अडचणीत असतो तेव्हा समाज हाताची घडी बांधून तमाश्या बघत असतो.अनेकदा हे दिसून आलंय.गुरूनाथ नाईकांसारख्यांच्या बाबतीत तरी समाजानं थोडी कृतज्ञता बाळगली पाहिजे असं वाटतं.
गुरूनाथ नाईक यांच्या सारख्या शंभऱ संपादक,ज्येष्ठ पत्रकारांची नावं मी सांगू शकेल की,त्यांना आज मदतीची गरज आहे.मात्र आमदारांची पेन्शन दोन मिनिटात वाढविणार्या सरकारला पत्रकार पेन्शनची मागणी वीस वर्षे झाली तरी मान्य करावी वाटत नाही.गोव्यासह देशातील सोळा राज्यांमध्ये पत्रकारांना पेन्शन दिली जाते.महाराष्ट्रात पत्रकार पेन्शन सुरू करण्याचं आश्वासन भाजपनं आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे.मात्र अजूनही या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही.त्यानंतरही आम्ही जेव्हा जेव्हा मुख्यमंत्र्यांना भेटलो तेव्हा तेव्हा त्यांनी पत्रकार पेन्शन सुरू करण्याचं आश्वासन दिलं आहे.अजून हे आश्वासन प्रत्यक्षात येत नाही.म्हणून गुरूनाथ नाईक यांच्यासारखी अवस्था अनेक पत्रकारांची झाली आहे.सरकारनं आता फार अंत न बघता तातडीने पत्रकार पेन्शन योजना सुरू करावी अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे.गुरूनाथ नाईक यांना जास्तीत जास्त पत्रकारांनी मदत करावी असे आवाहन मराठी पत्रकार परिषद करीत आहे.मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आम्ही अकरा हजार रूपयांची मदत त्यांच्या खात्यात जमा करीत आहोत.
त्यांचा खाते क्रमाक
स्टेट बँक ऑफ इंडिया
खाते क्रमांक 31180667793
आयएफएससी SBIN
0005554
SMDESHMUKH