अलिबाग,दि.30 : रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद व नगरपरिषदेच्या मिळून 2922 शाळांमध्ये 15 ऑगस्ट रोजी इयत्ता 1 ली ते 4 थीच्या सर्व विद्यार्थ्यांकरीता चावडी वाचन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनाकरीता भाषा, गणित आणि विज्ञान या विषयातील मूलभूत क्षमतांचा विकास केल्यास पुढील अध्ययन अध्यापनाची गती वाढण्यास मदत होते. आदिवासी, ग्रामीण, शहरी आणि वंचित व दुर्बल घटकातील मुलांना विकासामध्ये संधीची समानता प्राप्त करुन देण्यासाठी गुणात्मक दर्जेदार शिक्षण मिळणे आवश्यक आहे, या करिता या चावडी वाचन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या चावडी वाचन कार्यक्रमाची पूर्वतयारी करीता जिल्हास्तरांवर सर्व गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांची बैठक आयोजित करण्यात येणार असून पंचायत समिती स्तरावर गटविकास अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली सर्व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व ग्रामपंचायतचे सर्व सरपंच व गटशिक्षणाधिकारी यांचेमार्फत सर्व मुख्याध्यापकांची बैठक घेऊन सदर कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येणार आहे.दि.15 ऑगस्ट तसेच 2 ऑक्टोंबर, 2015 व 3 जानेवारी, 2016 रोजी हा चावडी वाचनाचा कार्यक्रम पालक व उपस्थितांसमोर प्रत्यक्ष शाळास्तरावर सकाळी 8 ते 11 किंवा सर्वांच्या सोयीनुसार सुमारे 3 तास कालावधीसाठी राबविण्यात येणार आहे.
उल्लेखनिय चावडी वाचन
राज्याचा चावडी वाचन हा कार्यक्रम केंद्र पातळीवरही उल्लेखनिय ठरला आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी विचारात घेऊन अध्ययन अध्यापन प्रक्रिया प्रभावी करता येईल. या कार्यक्रमामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांस त्यांचे कौशल्य सादर करण्यास संधी मिळणार आहे. तसेच शिक्षकांना अध्ययन-अध्यापनात सुधारणा करण्यास वाव मिळून पालकांना त्यांच्या पाल्याच्या प्रगतीची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. चावडी वाचन या कार्यक्रमाची अंमलबजावणी सन 2013-14 पासून सुरू असून 2015-16 मध्येही याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात येणार आहे.
या वर्षीसाठी जिल्हा परिषदेच्या 2837 तर नगरपालिकांच्या 85 अशा एकूण 2922 शाळांमध्ये हा कार्यक्रम होईल. या चावडी वाचन कार्यक्रमास पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, विषय समित्यांचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समितीचे सभापती व सदस्य, जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, तहसिलदार, जिल्हा परिषदेचे अधिकारी व इतर विभागाच्या अधिकारी यांना आमंत्रित करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग यांनी एका प्रसिध्दीपत्रकान्वये दिली आहे.