• मुंबई : ज्येष्ठ पत्रकार ज्योर्तिमय डे यांच्या हत्येप्रकरणी मुख्य सूत्रधार छोटा राजनला शिक्षा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 2 मे रोजी या प्रकरणी अंतिम सुनावणी होणार आहे. तर जिग्ना वोरा हिच्यासंदर्भात देखील पुरावे निष्पन्न झाले आहेत. त्यामुळे छोटा राजन, जिग्ना वोरा आणि मारेकरी यांना नेमकी काय शिक्षा होणार याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

छोटा राजन आणि दाऊद इब्राहिम यांच्यातील गँगवारच्या वादात अनेकांचे बळी गेले आहेत. याच वादाचा बळी जे डेही ठरले होते. 11 जून 2011 साली मुंबईच्या पवईतील हिरानंदानी भागात जे डेंची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. यावेळेस, जे डेची हत्या ही छोटा राजन गँगमार्फत करण्यात आल्याचे समोर आले होते. तर, जे डेंच्या या हत्येमुळे संपूर्ण मीडिया विश्वात खळबळ माजली होती. या हत्येमध्ये महिला पत्रकार जिग्ना वोराचे नाव सुद्धा जोडले गेले होते.

या हत्येप्रकरणी 14 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये छोटा राजन आणि जिग्ना वोरा यांचा देखील समावेश आहे.

दरम्यान, गेली सात वर्ष सुरु असलेला हा खटला आता अंतिम टप्प्यात आला असून 2 मे रोजी या खटल्याची अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, पुरावे आणि साक्षीदारांच्या साक्षीनुसार, छोटा राजन हा जे डेंच्या हत्येचा कट रचणारा मुख्य सूत्रधार असून त्यानेच हत्येचा कट केल्याचे समोर आले आहे. तर, राजनच्या संभाषणात त्याने जिग्ना वोराचा देखील उल्लेख केला असून जिग्ना वोराच्या सीडीआर पुराव्यानुसार ती छोटा राजनच्या सातत्याने संपर्कात असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आता दोन्ही आरोपींना नेमकी काय शिक्षा होणार याकडेच सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

(Visited 81 time, 1 visit today)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here