चिरनेरचा उपेक्षित लढा
जंगल कायद्याच्या माध्यमातून ब्रिटिशांनी जंगलावर अवलंबून असणार्या आदिवासींच्या उपजिविकेच्या साधनांवरच बंदी घातली.त्याचे पडसाद देशभर उमटले.कायद्यास विरोध करण्यासाठी ठिकठिकाणी सत्याग्रह सुरू झाले.रायगड जिल्हयातील चिरनेर येथे 25 सप्टेंबर 1930 रोजी जंगल सत्याग्रह झाला.हजारो शेतकरी उरण तालुक्यातील अक्कादेवीच्या डोंगरावर जमा झाले.आंदोलनाच्या नेत्यांनी कायदेभंग करण्याची सूचना देताच हजारो शेतकरी जंगलाच्या दिशेने पळत सुटले.जंगलात पोहोचताच सागांच्या झाडावर कुर्हाडीने वार करायला त्यांनी सुरूवात केली.पोलिसांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला.. जमाव अटोक्यात येत नव्हता.राम डी.पाटील हे फौजदार तेथे उपस्थित होते.उर्मट असा हा पोलीस अधिकारी ..आपल्या सूचनांकडे कोणी लक्ष देत नाही असं दिसल्यावर त्याचं पित्त खवळळं..त्याने मामलेदार केशव जोशी यांच्याकडे आंदोलकांवर गोळीबार करण्याची परवानगी मागितली.केशव जोशी हे आंदोलकांचे सहानुभूतीदार होते.त्यांनी सनदशीर मार्गनंआं आंदोलन करणारया आदोलकांवर गोळीबार करण्यास विरोध दर्शविला.मामलेदार केशव जोशी आपल्याला परवानगी देत नाहीत असं दिसल्यावर फौजदारानं मामलेदारावरच गोळीबार करून त्यांना ठार मारले.हा प्रकार पाहून जमाव हिंसक बनला.त्याने फौजदाराकडील पिस्तुल काढून घेत त्याला बंदम चोप दिला.मग या जमावाला रोखण्यासाठी पोलिसांनी गोळीबार सुरू केला.या गोळीबारात नाग्या महाद्या कातकरी,रामा बामा कोळी,हसुराम बुधाजी घरत,धाकू गवत्या फोफरेकर,आनंद माया पाटील,परशुराम रामा पाटील,आलू बेमट्या म्हात्रे,रघुनाथ मोरेश्वर न्हावी,काशीनाथ कृष्णा पाटील हे ऩऊ आंदोलक हुतात्मा झाले.अगदी सर्वसामांन्य कुटुंबातील ही मुलं देशासाठी लढली आणि हुतात्मा झाली.या घटनेचे पडसाद तेव्हा देशभर उमटले..मात्र स्वातंत्र्योत्तर काळात या आंदोलनाची उपेक्षा झाली.चिरनेर येथे सरकारने अलिकडे हुतात्मा स्मारक उभारले असले तरी आणि दरवर्षी 25 सप्टेंबरला अभिवादन करण्याचे सोपस्कार होत असले तरी सरकारने या आंदोलनाच्या विशेष दखल घेतली नाही याची नक्कीच खंत आहे.25 सप्टेंबर हा दिवस किमान रायगडमध्ये तरी हुतात्मा स्मृती दिन म्हणून सरकारी पातळीवर साजरा केला जावा, शाळांमधून झेंडावंदन केले जावे, जंगल सत्याग्रहाच्या आठवणी सांगणारी भाषणं शाळांमधून व्हावीत अशी जनतेची मागणी आहे..आज रायगडमधील किती मुलांनको चिरनेरचा जंगल सत्याग्रह माहिती आहे याबद्दल मी साशंक आहे.. सर्व सामांन्य कुटुंबातील तरूणांनी स्वातंत्र्य लढ्यात दिलेले योगदान नव्या पिढीला खरं तर प्रेरणा देणारे आहे.. दुर्दैवानं कोणाला देणं घेणं नाही.. .आज चिरनेर जंगल सत्याग्रहाचा 91 वा हुतात्मा स्मृती दिन साजरा होत असताना तरी सरकार या संदर्भात काही निर्णय घेईल ही अपेक्षा..
एस.एम.देशमुख