आज सह्याद्री वाहिनीवर*

0
1704

*जलसंधारणाचा चार गाव पॅटर्न आज सह्याद्री वाहिनीवर*

मुंबई, ता. ६ : विविध प्रकारच्या गटा – तटाच्या राजकारणामुळे विकासाच्या मुद्द्यावर सुद्धा गावे एकत्रित येत नाहीत. पण सातारा जिल्ह्यातील तब्बल चार गावांतील सामान्य लोकांनी एकत्र येऊन जलसंधारणाची आदर्शवत चळवळ उभारली आहे. लोकांच्या एकीमुळे ही चार गावे आता दुष्काळमुक्त झाली आहेत. जलसंधारणाचा हा `चार गाव पॅटर्न` सोमवारी (ता. ७) रात्री ७.३० वाजता दुरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील जनता दरबार या मालिकेत प्रक्षेपित होणार आहे.

सातारा जिल्ह्यातील पांढरवाडी, गोडसेवाडी, कोळेवाडी व दिवडी (ता. माण) या चार गावांनी अवघ्या १८ महिन्यांच्या अथक परिश्रमातून दुष्काळमुक्ती साधली आहे. तब्बल ६० छोटे मोठे तलाव, २० किलोमीटर लांबीची सलग समतल चर (डीप सीसीटी), ओढा खोलीकरण रूंदीकरण अशी ४५ लाखांची कामे गावक-यांनी लोकसहभागातून केली. राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या पार्श्वभूमीवर गावक-यांनी ही लोकचळवळ उभारली. विशेष म्हणजे, राज्य सरकारच्या जलयुक्त शिवार अभियानात पहिल्या वर्षी अधिकृत समावेश नसतानाही गावक-यांनी ही चळवळ स्वतःहूनच हाती घेतली. गावांनी केलेली किमया पाहून राज्य सरकारने आता दुस-या वर्षी या गावांचा समावेश जलयुक्त शिवार अभियानात केला आहे. एवढेच नव्हे तर गेल्या वर्षी सुमारे १७ सिमेंट बंधारेही शासनाने या गावांसाठी मंजूर केले आहेत. त्यापैकी १० बंधा-यांची कामे पूर्ण झाली आहेत.

अभिनेते सयाजी शिंदे यांनीही या गावांमध्ये आपले योगदान दिले आहे. पोकलेन, जेसीबीच्या माध्यमातून सयाजी शिंदे यांनी गावांना मदत केली. महत्वाचे म्हणजे तब्बल २५ लाख रुपये खर्चून शिंदे यांनी ५० एकर जागेत सह्याद्री देवराई या उपक्रमाअंतर्गत व्यापक वृक्षारोपण केले आहे.

नोकरीनिमित्त मुंबई, पुणे, आर्मी अथवा परदेशात असलेल्या अनेक नोकरदारांनी आपल्या गावाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी जमा केला. गावांतील शेतकरी, मजूर यांनीही आपापल्या परीने निधी दिला.

वरूणराजाच्या कृपादृष्टीमुळे यंदा या चार गावांत चांगला पाऊस झाला. त्यामुळे नव्याने उभारलेल्या सर्व तलाव, बंधारे काटोकाट भरले. ओढ्यांमध्ये पाणी साचले. डीप सीसीटीमुळे जमिनीमध्ये पाणी मुरले. परिणामी जमिनीतील पाण्याची पातळी वाढली आहे. कधीही न भरणा-या विहिरींमध्ये काटोकाट पाणी आहे.

सह्याद्री वाहिनीवर २५ मिनिटांच्या कार्यक्रमात सोमवारी (ता. ७) रात्री ७.३० वाजता चार गावांची यशोगाथा दाखविली जाणार आहे. हा कार्यक्रम शनिवारी (ता. १२) सकाळी ८ वाजता पुनप्रेक्षपित होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here