महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन मिळावी यासाठी राज्यातील पत्रकार गेली वीस वर्षे पाठपुरावा करीत असले तरी सरकारला अजून पाझर फुटत नाही.मात्र आता सरकारच्या निर्णयाची वाट पहात न बसता पत्रकारांनाच स्वतःसाठी काही निर्णय घ्यावे लागणार आहेत.या दृष्टीने नागपूर श्रमिक पत्रकार संघाने जो उपक्रम सुरू केला आहे तो अनुकरनीय आणि अभिनंदनीय म्हणावा लागेल.परवा नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या विश्व्स्त मंडळाचे अध्यक्ष प्रदीप मैत्र शिर्डीत अधिस्वीकृती समितीच्या बैठकीच्या निमित्तानं भेटले.ते सांगत होते नागपूर श्रमिक पत्रकार संघ शहरातील 30-35 ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन देतो.श्रमिक पत्रकार संघाने मोठा निधी जमविला असून त्याच्या व्याजातून ज्येष्ठांना 2 हजार रूपये पेन्शन दिली जाते.तसेच सर्वच पत्रकारांना आरोग्यासाठी ,उपचारासाठी मोठी मदत केली जाते.पत्रकारांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठीही श्रमिक पत्रकार संघ विविध उपक्रम राबवत असतो.हे काम नक्कीच कौतुकास्पद असल्याने राज्यातील अन्य पत्रकार संघानेही असे उपक्रम राबविले पाहिजेत.मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न सर्व जिल्हा संघांना आवाहन आहे की,किमान आपआपल्या जिल्हा स्तरावर असा निधी जमा करून त्याच्या व्याजातून येणारी रक्कम जिल्हयातील गरजू पत्रकारांना दिली तर सरकारच्या निर्णयाची वाट पाहात बसण्याची गरज भासणार नाही.परिषद देखील असा प्रयत्न करणार आहे.नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी मित्रांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन-