महाड येथील ऐतिहासिक चवदार तळे येथे 20 मार्च 2018 रोजी होणाऱ्या क्रांतीदिनाच्या वर्धापन दिन कार्यक्रमासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाने सतर्कता बाळगून सर्व आवश्यक सुविधांची सज्जता ठेवावी असे निर्देश रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज महाड येथे दिले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, बहुउद्देशीय सभागृह महाड येथे आयोजित क्रांतीदिना निमित्त पूर्व तयारीबाबतच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी राज्याचे गृह(ग्रामीण), वित्त व नियोजन विभागाचे राज्यमंत्री तथा सिंधुदर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दिपक केसरकर, आमदार भरतशेठ गोगावले, जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, विविध शासकीय विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री.चव्हाण म्हणाले की, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळे येथे 20 मार्च 1927 रोजी सुरु केलेल्या सामाजिक क्रांतीदिनाच्या कार्यक्रमासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक येथे असतात. त्यांना कोणतीही व्यवस्था अपुरी नसावी याची काळजी प्रशासनाने घ्यावी. तसेच वीर रेल्वे स्थानकामध्ये 20 मार्चच्या कार्यक्रमासाठी येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षात घेऊन जादा बसेसची व्यवस्था एस.टी.महामंडळानी करावी असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या कार्यक्रमासाठी जे.जे.रुग्णालय मुंबई येथील वैद्यकीय पथक महाडला पाठविण्याची व्यवस्था करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले.