मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न
पाटण येथे तालुका पत्रकार संघांच्या
अध्यक्षांचा मेळावा 24 जून रोजी
पुणे ः मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न राज्यातील 354 तालुक्यातील पत्रकार संघांच्या अध्यक्षांचा एक भव्य मेळावा आणि वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कारांचा वितरण सोहळा सातारा जिल्हयातील पाटण येथे रविवार दिनांक 24 जून 2018 रोजी आयोजित करण्यात आला आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या इतिहासात तालुका अध्यक्षांचा मेळावा प्रथमच होत आहे. ग्रामीण भागातील पत्रकारांना भेडसावणार्या विविध प्रश्नांवर मेळाव्यात सखोल चर्चा होऊन पुढील दिशा नक्की केली जाणार असल्याची माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
ग्रामीण भागातील पत्रकारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असले तरी त्यांच्या प्रश्नांकडं गांभीर्याने पाहिले जात नाही.पत्रकारांवरील सर्वाधिक हल्ले ग्रामीण भागातील पत्रकारांवर झाल्याचे उपलब्ध आकडेवारीवरून दिसते.तसेच पत्रकार एकजूट नसल्याने ग्रामीण फत्रकारांना विविध समस्यांना एकाकी तोंड द्यावे लागते.या सर्व प्रश्नांवर चर्चा होऊन प्रभावी उपाययोजना काय करता येतील यावर या मेळाव्यात सखोल चिंतन होणार आहे.तालुका अध्यक्षांचा हा मेळावा तालुक्याच्या ठिकाणीच व्हावा अशी परिषदेची कल्पना होती.पाटण तालुका पत्रकार संघानं या मेळाव्याचं यजमानपद स्वीकारण्याची तयारी दाखविल्यानंतर परिषदेने त्यास मान्यता दर्शवून 24 जून ही तारीख नक्की केली आहे.
हा मेळावा दोन सत्रात होईल.सकाळी दहा वाजता मेळाव्याचे उद्धघाटन होणार आहे.दुपारच्या सत्रात तालुका अध्यक्ष आपल्या भावना व्यक्त करतील.समारोपाच्या कार्यक्रमात विविध मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.या मेळाव्यात ‘ऑनलाईन मिडिया सेल’ची स्थापना करण्यात येणार आहे.युट्यूब चॅनल्स आणि वेबसाईट चालविणार्या पत्रकारांच्या प्रश्नावर देखील मेळाव्यात चर्चा केली जाणार आहे.मेळाव्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुखयमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना आमंत्रित करण्यात येत आहे.या शिवाय काही मान्यवर पत्रकारांचे मार्गदर्शनही लाभणार आहे.
पुरस्कार वितरण सोहळा
—————–
ग्रामीण भागात आदर्श कार्य करणार्या तालुका आणि जिल्हा संघाना गेल्या वर्षी पासून अनुक्रमे वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार दिले जात आहेत.2017 च्या या पुरस्कारांचे वितरण देखील या मेळाव्यात होणार आहे.2017 साठीचे हे पुरस्कार खालील तालुका पत्रकार संघांना यापूर्वीच जाहीर झालेले आहेत.
रंगाअण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार ः बीड जिल्हा पत्रकार संघ
वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ पुरस्कर
1) कोकण विभाग ः रोहा प्रेस क्लब ( रायगड जिल्हा)
2) पुणे विभाग ः पाटण तालुका पत्रकार संघ ( सातारा जिल्हा)
3) नाशिक विभाग ः अकोले तालुका पत्रकार संघ ( नगर जिल्हा )
4) अमरावती विभाग ः देऊळगाव राजा पत्रकार संघ ) बुलढाणा जिल्हा )
5) नागपूर विभाग ः कळमेश्वर तालुका पत्रकार संघ ( नागपूर जिल्हा )
6) औरंगाबाद विभाग ः भोकरदन तालुका पत्रकार संघ ( जालना जिल्हा )
7) लातूर विभाग ः उदगीर तालुका मराठी पत्रकार संघ ( लातूर जिल्हा )
8) कोल्हापूर विभाग ः आटपाडी तालुका पत्रकार संघ ( सांगली जिल्हा )
वरील तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकार्यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन परिषदेच्यावतीने कऱण्यात आले आङे.
मेळाव्यास उपस्थित राहणार्या तालुका पत्रकार संघांच्या पदाधिकार्यांची गैरसोय होऊ नये यासाठी आपण उपस्थित राहणार असल्याची आगाऊ माहिती परिषदेचे सरचिटणीस अनिल महाजन यांच्याकडं ९९२२९९९६७१ या क्रमांकावर किंवा पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर मोहिते यांच्या ९२२६९८४६६१ या क्रमांकावर कळवावी.नियोजनाच्यादृष्टीने ते आवस्यक आहे.मेळाव्यास उपस्थित राहणार्यांना 100 रूपये नोंदणी शुल्क भरावे लागेल.
पाटण हे शहर सातारा जिल्हयात कोयना धऱणार्या पायथ्याशी आहे.निसर्गाचा वरद्हस्त लाभलेला असा हा परिसर आहे.. पुणे- कोल्हापूर हाय वे ने सातारा किंवा कराड येथून पश्चिमेला पाटणला जाता येते.पावसाळ्याचे दिवस असले तरी पाटण शहरात दीड हजार लोक बसू शकतील असा मोठा हॉल उपलब्ध आहे.
मराठी पत्रकार परिषदेच्या इतिहासात तालुका पदाधिकार्यांचा असा मेळावा प्रथमच होत असल्यानं तालुका अध्यक्ष तसेच पदाधिकार्यांनी जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून आपली ताकद दाखवावी असे आवाहन परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,कार्याध्यक्ष गजानन नाईक,सरचिटणीस अनिल महाजन,कोषाध्यक्ष शरद पाबळे,पुणे विभागीय सचिव बापूसाहेब गोरे,सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे,पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर मोहिते यांनी एका प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
मेळाव्याच्या संदर्भात चर्चा कऱण्यासाठी पुणे येथे पाटण तालुका पत्रकार संघांच्या पदाधिकार्यांबरोबर चर्चा झाली.यावेळी परिषदेच्या पदाधिकार्यांसह पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष एम,जे शेलार,परिषद प्रतिनिधी प्रभाकर क्षीरसागर,हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील नाना जगताप,सुनील वाळुंज आदि उपस्थित होते.