शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील वाद आता नळावरील वादासारखे अत्यंत खालच्या पातळीवर आले आहेत.राज ठाकरे य़ांनी टाळी द्यायच्या ऐवजी फोन का केला नाही असं पुण्याच्या सभेत विचारलं.त्यावर बाळासाहेबांच्या पाठित खंजीर खुपसणाऱ्याला मी कशाला फोन करू अशा अर्थाचे उत्तर उध्दव ठाकरे यांनी दिले.राज ठाकरे त्याच्यापुढे जात आज डोंबिवली येथील सभेत चांगलेच घसरले.बाळासाहेबांना उध्दवच्या घरात तेलकट आलू वडे दिले जायचे इथं पासून बाळासाहेब जे सूप पित होते ते माझ्याघरून जात होते इथं पर्यत काय वाट्टेल ते बोलले.उध्दव आजारी असताना बाळासाहेबांनी मला फोन केला,मी हॉस्पिटलमध्ये गेलो,तिथं दिवसभर बसलो.नंतर मी गाडी चालवत असताना माझ्या बाजुला बसला तेव्हा त्याला नाही वाटलं की,मी खंजीर खूपसला म्हणून.शिवाय बाळासाहेब मला फोन करून बोलवायचे त्यांना नाही कधी वाटले खंजीर खुपसला म्हणून ते याला वाटते.अशी भाषा वापरली.उध्दव आणि राज हे दोन्ही नेते महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी करतात.हे दोन्ही नेते आता आपली व्यक्तीगत धुनी सार्वजनिक ठिकाणी धुआयला लागलीत.यानं महाराष्ट्राचं कोणतं कल्याण होणार आहे कोण जाणे.मनसे असो अथवा शिवसैनिक असो दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांसाठी बाळासाहेब हे दैवत आहे.आज या दैवताचं नाव घेत जी चिखलफेक सुूरू आहे ती इतिहासातील मराठ्यांची राज्ये कशामुळे गेली याचं स्मरण करून देणारी आहे.