ग्रामीण पत्रकारांचे प्रश्न आणि आपण सारे…
इंदापुरात झाली व्यापक चर्चा..
‘ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न’ हा व्यापक चर्चेचा,चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे.कोणतंही संरक्षण नाही,अधिस्वीकृती नाही,आणि आर्थिक आघाडीवर आनंदी आनंद असलेली ही मंडळी अत्यंत कठीण आणि पूर्णपणे प्रतिकूल परिस्थितीत पत्रकारिता करीत असते.माध्यमांत असतानाही या मंडळींचा आवाज ना ते ज्या वर्तमानपत्रांसाठी कामं करतात त्या पत्रांपर्यंत पोहोचतो ना सरकार पर्यंत.ग्रामीण भागातील मुक्त पत्रकारांचे प्रश्न हाताळताना पत्रकार संघटनांची हतबलता देखील दिसून आलेली आहे.दुदैर्वानं समाजाला पत्रकारांच्या या प्रश्नांची फारशी जाणीव नाही.असली तरी समाज ती दाखवत नाही.पत्रकारांकडून हजार अपेक्षा करणारा समाज पत्रकारांसाठी काही करण्याची वेळ येेते तेव्हा हात आखडता घेतो हे अऩेकदा दिसून आलेलं आहे.एवढंच कश्याला एखादया पत्रकारावर जेव्हा हल्ला होतो तेव्हा समाजाचा एकही घटक पुढे येऊन त्या हल्ल्याचा निषेध करणारं पत्रकही काढायला तयार नसतो.त्यामुळं ग्रामीण पत्रकारांची अवस्था एकाकी पडल्यासारखी झालेली आहे.अशा स्थितीत ं पुढील काळात व्यक्तीगत किंवा संघटनात्मक मतभेद,हेवेदावे,रागलोभ सोडून सर्व पत्रकारांना एकत्र यावं लागेल आणि स्वतःच स्वतःसाठी काही कवच-कुंडले शोधावी लागतील.या अंगानं आज इंदापूरनजिक जक्शन येथे चांगली चर्चा झाली.स्थानिक पत्रकारांनी आज पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकारांच्या सत्काराचं आयोजन केलं होतं.इंदापूरचे आजी-माजी आमदार म्हणजे दत्तात्रय भरणे आणि हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.या दोघांसमोर पत्रकारांनी मोकळेपणानं आपल्या समस्या मांडल्या.लगेच काही हाती लागेल असं नाही पण सातत्यानं लोकप्रतिनिधींसमोर हे प्रश्न मांडावे लागतील.त्यादृष्टीने महाराष्ट्रात प्रयत्न होताना दिसताहेत.ग्रामीण भागातील पत्रकारांच्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा व्हावी यासाठी लवकरच राज्यातील परिषदेशी जोडल्या गेलेल्या 354 तालुका पत्रकार संघांच्या अध्यक्षांचा एक मेळावा घेण्याचं नियोजन सुरू आहे.मुंबईच्या वेशीवर नवी मुंबईत तो व्हावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत.साधारतः फेब्रुवारीच्या दुसर्या आठवडयात हा मेळावा होऊ शकेल.ग्रामीण पत्रकारांच्या प्रश्नांशी आता सर्वशक्तीनिशी भिडल्याशिवाय मार्ग नाही.
इंदापूरमध्ये सर्व तरूण पत्रकार सकारात्मक भूमिका घेऊन काम करताना दिसले.परिसरातील समस्यांची चांगली जाण असलेली ही टीम सातत्यानं लोकांचे प्रश्न मांडतांना दिसते आहे.मराठी पत्रकार परिषदेला नक्कीच आनंद आहे की,राज्यभर अशा तरूण आणि ध्येयवादी पत्रकारांची फळी परिषदेला तयार करता आली..परिषदेने उभ्या केलेल्या चळवळीबद्दलची या तरूण पत्रकारांची आत्मियता आणि आपलेपणा मलाही नवी उमेद देणारा ठरला . 250 किलो मिटर स्वतः गाडी चालवत गेल्यानंतरही आजचा दिवस आनंदात गेला..परतताना तो सत्कारणी लागल्याची जाणीव आनंद व्दिगुणीत करीत होती.इंदापूर परिसरातील पत्रकार मित्रांनो धन्यवाद.सोबत जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष सुनील जगताप,उपाध्यक्ष एम.जी.शेलार,सुनील वाळूंज हे मित्र होते.