गिरीश कुबेर एकटे का पडले?

0
699

गिरीश कुबेर एकटे का पडले?

लेखक, पत्रकार, विचारवंत वगैरे वगैरे असलेल्या गिरीश कुबेर यांच्यावर नाशिक मुक्कामी काल शाई फेकण्यात आली.. त्यांनी आपल्या पुस्तकात संभाजी महाराजांबददल काही आक्षेपार्ह मजकूर लिहिला.. त्यातून हा शाईफेकीचा प्रकार घडला असं सांगितलं जातं.. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक पुरस्कर्ता म्हणून मी या घटनेचा निषेध करतो..
घटना घडल्यानंतर साहित्य वर्तुळात अथवा माध्यम जगतात याची जी प्रतिक्रिया उमटणे अपेक्षित होते ती उमटली नाही.. याची दोन कारणं असू शकतात.. पहिलं म्हणजे संभाजी ब्रिगेडला घाबरून सगळ्यांचीच दातखीळ बसली असावी अथवा गिरीश कुबेर यांना एकदा अद्दल घडायलाच हवी होती या आनंदात सगळ्यांनी मौन धारण करणे योग्य मानले असावे.. कारण काहीही असो, हा विषय सर्वांनीच अनदेखा केला..

एक गोष्ट तर सर्वमान्य आहे की, आपण प्रवाहाच्या विरोधात चालणारे लेखक, पत्रकार आहोत असा अभास निर्माण करून कुबेर सातत्याने नव नवे वाद उभे करीत असतात.. शेतकरी, सामांन्य माणूस हे त्यांचे कायम लक्ष्य असते..चळवळीवर त्यांचा एवढा राग का समजत नाही.. कुठलीही चळवळ उभी करण्यासाठी किती लोकांना आपले आयुष्य खर्ची घालावे लागते हे वातानुकूलित दालनात बसून चिखलफेक करणारांना कधी कळणार नाही.. पत्रकारांच्या चळवळीबद्दल ही ते कायम गरळ ओकत असतात.. पत्रकार संरक्षण कायदा व्हावा यासाठी राज्यातील पत्रकार बारा वर्षे लढा देत असताना हे कायद्याच्या विरोधात सूर आळवत होते.. पण आपले वरिष्ठ शेखर गुप्ता यांनी कान पिरगळताच आपली भूमिका बाजूला ठेवत ते शेखर गुप्ता समवेत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले.. कायद्याला विरोध असेल तर आम्ही समजू शकतो.. विरोध किंवा समर्थनाचा सर्वांना अधिकार आहे.. पण आक्षेप याला की, स्वतःच्या स्वार्थासाठी कुबेर कायम डबलडोलकी भूमिका घेत आले आहेत. …काही दिवसांपुर्वी देखील पत्रकारांसाठी कायदा कश्याला हवा? असा प्रश्न उपस्थित करीत पुन्हा एकदा त्यांनी अग्रलेखातून गरळ ओकली होती.. गलेलठ्ठ पगार घेऊन संपादक म्हणून मिरवायचे आणि माध्यमांवरच चिखलफेक करायची हा कुबेर यांचा आवडता छंद आहे..”माध्यमाचे शुद्धीकरण झाले पाहिजे” या मताचे आम्ही देखील आहोत.. पण केवळ हा बदमाश, तो नालायक अशा शिव्या देऊन हे शुद्धीकरण होणार नाही.. त्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज असते.. कुबेरांनी तसे प्रयत्न कधी केले नाहीत.. कुबेर यांच्या लेखी पत्रकारिता बरबटलेली असेल , प्रवाहपतित झालेली असेल तर मित्रवर्य कुबेर अशा दूषित वातावरणात काय करीत आहेत? जेथे साधनशुचितेची कदर केली जाते असे अन्य एखादे क्षेत्र असेल तर कुबेर यांनी तिकडे मार्गस्थ व्हावे, कोणी रोखले आहे त्यांना? परंतु संपादक म्हणून सगळे लाभ उकळायचे, संपादक पदाचा उपयोग करून घेत राज्यसभेसाठी उंबरे झिजवायचे आणि हे क्षेत्र किती वाईट आहे म्हणून टाहो फोडायचा ही नीती कोणत्या नितीमत्तेत बसते? .पत्रकारिता क्षेत्र लाज वाटावी अशा थराला पोहचले असेल तर त्यात गिरीश कुबेर यांनीही योगदान दिलेले आहे.. कुबेर यांच्या नावावर विविध विक्रम नोंदविलेले आहेत . त्यात अग्रलेख मागे घेण्याचा कदाचित जागतिक विक्रम त्यांच्या नावावर आहे .. . ज्या लोकसत्ताच्या खुर्चीवर बसून हे कुबेर जगाला उपदेशाचे डोस पाजत असता त्या खुर्चीवर बसलेल्या त्यांच्या पुर्वसुरींनी तत्वासाठी खुर्चीचा त्याग केल्याची उदाहरणं आहेत.. आपली नोकरी टिकविण्यासाठी मराठी पत्रकारितेच्या २०० वर्षांच्या इतिहासात अग्रलेख मागे घेण्याची लाजिरवाणी कृती कोणी केलेली नाही.. माध्यमांना शिव्या घालताना अग्रलेख मागे घेण्याच्या कृत्याचे विश्लेषण करायचे मात्र कुबेर कटाक्षाने टाळतात..
गिरीश कुबेर यांनी समाजातील एकही घटक सोडला नाही.. त्यात त्यांनी समाजाच्या श्रद्धास्थानावर देखील आघात केले.. मी एकटा बरोबर आहे आणि अन्य सारे चुकीचे आहेत हा अहंकार संपादकाच्या ठायी असता कामा नये.. या अहंकारानेच गिरीश कुबेर यांना आज एकटे पाडले आहे..पत्रकार म्हणून नव्हे तर पुस्तकाचे लेखक म्हणून त्यांच्यावर हा हल्ला झालेला आहे.. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा हा हल्ला असल्याने मराठी साहित्यिक, विचारवंत..पत्रकार, पत्रकार संघटनांनी या विरोधात आकाशपाताळ एक करायला हवे होते.. पण असे झाले नाही.. सारेच चिडिचूप आहेत.. कोणीही फारशे त्यांच्या समर्थकांनार्थ समोर आलेले नाही..वाहिन्यांनी देखील काही क्षण बातम्या दाखविल्या आणि नंतर त्यांनी विषय बदलला.. कोणीच का आक़मक पणे कुबेर यांच्या पाठिशी ऊभे राहिले नाही? गिरीश कुबेर यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे..

एस.एम.देशमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here