देशमुख बंधुंचा पाणीदार स्वभाव, एस.एम.चा गावात मुक्काम, जन्मभुमी देवडी गावाला दुष्काळमुक्त करण्याचा आटापिटा….
माणुस कितीही आपल्या ठिकाणी मोठा असला तरीही त्याच्या अंगी जन्मभुमीची आगळीवेगळी ओढ असते. आपल्या गावासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे अशा प्रकारची धारणा अलीकडच्या नविन पिढीत लुप्त होत असली तरी जुन्या पिढीतली माणसं गावाला कधी विसरू शकत नाहीत. महाराष्ट्राच्या पत्रकार क्षेत्रात स्वकर्तृत्वाने क्षितीजावर जावुन बसलेले जेष्ठ पत्रकार एस.एम.देशमुख यांच्या अंगी नेहमीच सामाजिक जबाबदारीचं भान असतं. लोकांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे अशी भुमिका घेताना देवडी ता.माजलगाव जि.बीड या आपल्या गावात पडलेल्या दुष्काळावर मात करण्यासाठी त्यांनी आडी बंधारा प्रकल्प उभारण्याचं काम हाती घेतले आहे. सकाळ रिलीफ फंड पुणे व समस्त ग्रामस्थ देत 7सकाळी वडी यांचा या कामात पुढाकार शिवाय एस.एम.यांचे बंधु दिलीप देशमुख यांचंही योगदान आणि पुढाकार या कामात नोंद घेण्यासारखा आहे. गावानजीकच्या नदीवर बंधारा उभारण्याचं काम जोमात सुरू असुन कायमचा दुष्काळ हाटवुन गावाला सुजलाम सुफलाम बनवण्याच्या प्रयत्नाला लागलेल्या एस.एम.देशमुखांनी गेल्या पंधरा दिवसापासुन गावात मुक्काम ठोकलेला आहे. पत्रकारांनी सामाजिक प्रश्नावर हात घातला तर काय होवु शकते? याचं हे मुर्त उदाहरण म्हणावे लागेल.
पत्रकारितेच्या क्षेत्रात अनेक पत्रकार असे आहेत आणि होवुन गेलेत की ज्यांनी आपल्या लेखणीचं पावित्र्य टिकवुन ठेवलेले आहे. त्यापैकीच एक एस.एम.देशमुख राज्यातील आदर्श पत्रकार असं म्हटलं तर चुकीचं वाटणार नाही. संपुर्ण आयुष्य चांगली पत्रकारिता करताना त्यांनी आपल्या लेखणीतुन वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित वर्गांना न्याय मिळवुन दिला.एवढंच नव्हे तर पत्रकारांच्या प्रश्नावर संघर्ष लढा उभा करून सरकारलाही नमते व्हावे लागले अशा प्रकारची ताकद निर्माण केली. पत्रकार संरक्षण कायदा असो किंवा लेखणीच्या विरोधात अनेक घटना असो. या साऱ्या प्रसंगांत नेतृत्व करणारा पत्रकारांचा कैवारी अशा प्रकारची त्यांची ओळख आहे.एस.एम. यांनी आपल्या लेखणीला उपजिविकेचं साधन न बनविता सामाजिक बांधिलकी आणि जनहितार्थ लेखणी कशी चालवावी? याचा आदर्श दाखवुन दिला.आपली लेखणी धनदांडगे पुढारी आणि भांडव्ालदार लोकांच्या विरूद्ध नेहमीच त्यांनी चालविली. प्रामाणिकपणाचा त्रास त्यांना सहन करावा लागला.मात्र तत्वाशी तडजोड त्यांनी कधीच केली नाही. सत्ताधाऱ्यांच्या चुकांना माफ न करणारा पत्रकार ही त्यांची ओळख. राज्यात पत्रकार बंधुंवर संकट आले की तिथे एस.एम.आले हे समीकरण होवुन बसले आहे. त्यांनी दिलेले लढे, काढलेले मोर्चे, उभा केलेले आंदोलन त्यामुळे तरी पत्रकार काय असतो?हे महाराष्ट्रातील लोकांना माहित होवुन गेले. त्यांचा स्वभाव अवलिया आहे. गोरगरीबांसाठी आणि आपल्या जन्मभुमीसाठी त्यांची धडपड नेहमीची असते. त्यांचे बंधु दिलीप देशमुख हे सद्या पुणे विभागात धर्मादाय आयुक्त पदावर काम करतात. ते पण एक प्रामाणिक आणि न्याय देणारा अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रातल्या मोठ्यामोठ्या न्यायालयात त्यांनी न्यायाधिश म्हणुन त्यांनी काम पाहिलेले आहे. दोन्हीही बंधु आपआपल्या ठिकाणी फार मोठ्या ताकदीचे आहेत. पण कुठल्याही प्रकारचा त्यांना गर्व नाही. देवडी या आपल्या जन्मभुमी असलेल्या गावासाठी काही तरी करावं ही धारणा एस.एम.यांची नेहमीच असते. धरणाच्या बॅकवॉटरवर गाव आहे.पण या गावाला पाण्याचा सोर्स दुसरा कुठलाही नाही.जमिनी सुपिक आहेत.पण पुर्वीपासुनच गावात सिंचन कमी आहे. त्यामुळे दुष्काळात पाण्यासाठी वणवण या गावाला फिरावे लागते. याची चिंता अनेक दिवसापासुन एस.एम.ना होती. त्यामुळे या बंधुंनी दुष्काळावर मात करण्यासाठी एक उपक्रम हाती घेतला.सकाळ रिलीफ फंड, पुणे यांच्या सौजन्याने आडी बंधारा प्रकल्प नदीवर उभा करण्याचं काम हाती घेतलं. वडिल माणिकराव यांची अनेक वर्षापासुनची संकल्पना आणि इच्छा होती. कारण त्यांनी या गावात एकेकाळी सरपंच पदावरही काम पाहिलेलं आहे. आपल्या वडिलांचं स्वप्न साकार करण्याचं काम जेव्हा मुलाकडुन होतं तेव्हा खरं समाधान आई-वडिलांना मिळतं आणि या बंधुंनी ते करून दाखवलं. या गावातील ग्रामस्थ या उपक्रमात मोठ्या प्रमाणावर सहकार्य करीत आहेत. गावाला सुजलाम सुफलाम बनवण्याचा हा प्रयोग असुन बंधारा पुर्ण झाल्यानंतर गावातील कायमचा दुष्काळ फिटल्याशिवाय राहणार नाही. मोठ्या मोठ्या मशिनरी या ठिकाणी कार्यरत असुन काम जोरात सुरू आहे. स्वत: एस.एम.साईडवर तळ ठोकुन बसलेले आहेत. इच्छाशक्ती किती प्रबळ असते?खरं पाहता आजकाल पाच मिनिट वेळ फुकटचा कुणी कुठे देत नाही?मात्र स्वत: एस.एम.निवडणुकीच्या धामधुमीत, रखरखत्या उन्हात या प्रकल्पाच्या कामाची देखरेख करत आहेत. मागच्या महिन्यात याच बंधुंनी परिसरात अनेक गावात अपंग मुलांना सायकलीचं वाटप केलं होतं. चांगलं काम करण्यासाठी माणसाचं मन पाणीदार स्वभावाचं असायला हवं. त्यातही एक पत्रकार सकारात्मक स्वरूपाचा असेल तर त्याच्या लेखणीच्या आणि कृतीच्या माध्यमातुन समाजात चांगले उपक्रम घडुन जातात याचं उदाहरण म्हणजे एस.एम.नं हाती घेतलेला हा बंधारा प्रकल्प होय. केवळ गप्पा नव्हे किंवा केवळ ठोकुन द्यायच्या म्हणुन बातम्या ठोकुन देणे नव्हे. प्रत्यक्ष देवडी गावात आज जरी जावुन आलं तरी या ठिकाणी बंधारा उभारणीची काम जोमानं सुरू असल्याचे निदर्शनास येते. एकीकडे सरकार दुष्काळ निवारण्यासाठी करोडो रूपये खर्च करते तर दुसरीकडे याच उपक्रमासाठी अशा सामाजिक जबाबदारीने काम करणाऱ्या संघटना किंवा सकाळ रिलीफ फंड सारखे समुह पुढे आल्यानंतर ग्रामीण भागात काय बदल होवुन जातात?याचं हे उदाहरण आहे.भांडवलदारांच्या कळपात न जाता गोरगरीबांच्या समुहात राहुन संघर्ष आणि त्यागाने सत्यासाठी लढणारा एक पत्रकार म्हणुन त्यांच्याकडे पाहिल्या जाते. आजची पत्रकारिता आिण त्यावर होत असलेले आरोप यातुन एस.एम. सारखा चेहरा या क्षेत्राला आदर्श घेण्यासारखा आहे.आपल्या जन्मभुमीसाठी सामाजिक बांधिलकी ओळखुन समर्पित जीवन भाव दाखवुन एस.एम.नं हाती घेतलेलं कार्य अतिशय चांगलं असुन दिलीप देशमुख यांचंही गावात कौतुक होत आहे. आपल्या अधिपत्याखाली असलेल्या जनसंपर्कातुन लोकांच्यासाठी काही चांगलं काम करता येत असेल तर करण्याचा हा त्यांचा संकल्प परोपकारी आणि कल्याणकारी आहे हे मात्र नक्की.ग्रामस्थ आणि परिसरातुन देशमुख बंधुंचं कौतुक होत आहे. दुष्काळावर मात आणि पाण्याच्या शोधात होत असलेला प्रयत्न यापेक्षा पुण्याचं काम कोणतं नाही हे मात्र नक्की.
-राम कुलकर्णी