“पत्रकार पॅकेजसाठी काम करतात,मालकाचे वेगळे,संपादकाचे वेगळे,वार्ताहराचे वेगळे पॅकेज असते”.असे आरोप नितीन गडकरी यांनी सरसकट सर्वच पत्रकारांवर केले आहेत.हे आरोप करताना त्यांनी कोणताही पुरावा दिलेला नाही.कोण पॅकेज देते, ? त्यानी आणि त्यांच्या पक्षाने कोणत्या पत्रकाराला किती पैसे दिले? हे त्यांनी सांगितलेले नाही.त्यांच्याकडे काही माहिती असेल तर त्यांनी पत्रकारांची,मालकांची नावं जाहीर करावीत. मात्र त्यांच्याकडे काही पुरावे नसतील तर त्यांनी आपले वक्तव्य मागे ध्यावे आणि पत्रकारांची दिलगीरी व्यक्त करावी अशी मागणी पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती करीत आहे.नितीन गडकरीनीं पत्रकार पैसे घेतात असे वक्तव्य करून तमाम पत्रकारितेलाच आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले आहे . हे आक्षेपार्ह आणि पत्रकारितसाठी धोकादायक आहे. गडकरी यांच्यासारख्या एका महत्वाच्या पदावरील नेत्याने अशा पध्दतीने वक्तव्य करावे हे खेदजनक आहे.