कोकणात जाईपर्यंत मला गटारीचं “महत्व” माहिती नव्हतं.. गटारीच्या दुसरया दिवशी श्रावण सुरू होतो.. श्रावणात अनेक जण शाकाहारी होतात.. म्हणजे मच्छी, मटण, चिकण बंद असतं .. काही जण दारूला देखील हात लावत नाहीत.. या सर्व गोष्टींचा महिनाभर त्याग करायचा तर मग शेवटच्या दिवशी भरपूर खाऊन- पिऊन घ्यायला हवंच ना.? .मग पार्ट्यांचं आयोजन होतं.. अशा पार्टयातून गटारीला किती कोंबड्या फस्त होत असतील आणि किती बाटल्या रित्या होत असतील हा संशोधनाचा विषय होऊ शकतो.. अलिबागला असताना पंधरा-पंधरा दिवस अगोदर गटारीचं नियोजन करणारे मी पाहिले आहेत..
गटारींची माझी आठवण वेदनादायक आहे.. माझ्याबरोबर काम करणारया एका डीटीपी ऑपरेटरचा मुलगा गटारी अमावस्येच्या रात्री मोटरसायकलवरून सुसाट जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर पाठीमागून आदळला.. मोटर साईकल चक्काचूर झाली.. मुलगाही जागीच ठार झाला. मी ऑफिसमध्येच होतो आणि ऑफिस जवळच हा अपघात झाल्याने आम्ही धावत गेलो.. मुलाला उचलून हॉस्पिटलमध्ये नेले.. मुलगा गेलेला होता.. ही बातमी आम्ही आमच्या डीटीपी ऑपरेटर मित्राला जेव्हा सांगितली तेव्हा त्यांचा आक्रोश काळीच फाडणारा होता.. मित्राला आवरणं कठीण झालं होतं.. एकुलता एक मुलगा.. त्याचंही लग्न झालेलं.. पण तोच गेल्यानं सारं कुटुंबं रस्त्यावर आलं..ती आठवण, तो प्रसंग, तो आक्रोश हटकून दर गटारीला मला आठवतो.. मन अस्वस्थ होऊन जातं..आपला तरूण मुलगा अशा पध्दतीनं गेल्याचं दु:ख भयंकर असतं.. ही वेळ आपल्या पालकांवर येणार नाही याची काळजी गटारी साजरी करताना प्रत्येकानं घ्यावी एवढीच अपेक्षा आणि विनंती देखील…