पक्षी वाचवा या उपक्रमांतर्गत खोपोलीतील काही नागरिकांनीआपल्या सोसायटीच्या आवारात पक्ष्यांसाठी पाणपोई सुरू केली असल्याने सकाळ-संध्याकाळ या पाणपोईंवर पक्ष्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळतो आहे.
रायगड जिल्हयात सर्वत्र पाणी टंचाई जाणवायला लागली आहे.डोक्यावर हंडे घेऊन पाण्यासाठी महिलांनी पायपीट करावी लागत असताना पशु-पक्ष्यांची अवस्था केविलवाणी झाली असल्यास नवल नाही.खोपोलीतील काही पक्षी मित्रांनी यावर उपाय शोधला असून आपल्या सोसायटीच्या परिसरात ,गच्चीवर पक्ष्यांसाठी पाणपोया सुरू केल्या आहेत.यामुळे पाणी पिण्यासाठी चिमण्या,कावळे,कबुतरं यांसह वेगवेगळे पक्षी सोसायटी परिसरात तसेच गच्चीवर जमायला लागले आहेत.पाण्याबरोबरच पक्ष्यांसाठी खाद्यान्नही ठेवले जात असल्याने सकाळ-संध्याकाळ पक्ष्यांचा मेळावा लागताना दिसतो आहे.सायंकाळच्या वेळेस अनेक नागरिकही पक्षी निरिक्षणासाठी अशा सोसायट्यांच्या आसपास जमू लागले आहेत.हा उपक्रम आता वर्षभर राबविण्यात येणार आहे अशी माहिती पक्षी मित्रांनी दिली.