खासदार भावनाताई Thanx
सिंधुदुर्ग येथील बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठीचा उर्वरित निधी नुकताच उपलब्ध झाला. स्मारकाचे काम अंतिम टप्प्यात आहे.. सिंधुदुर्ग प्रमाणेच आता वाशिम जिल्ह्याचे पत्रकार भवन देखील पुर्णत्वास जात आहे ही आनंदाची, स्वागतार्ह गोष्ट आहे..
२२ वर्षापुर्वी वाशिम जिल्हा झाला.. अनेक इमारती उभ्या राहिल्या.. पत्रकार भवन नव्हते.. पत्रकार भवन झाले पाहिजे असा आग्रह मग जिल्हा पत्रकार संघाने धरला.. आरंभीच्या काळात सरकारने जागा आणि काही निधी दिला.. त्यातून काहीच होऊ शकत नव्हते.. मग गोपीकिसन बाजोरिया यांनी आपल्या आमदार फंडातून १५लाख रूपये दिले.. पत्रकार भवनाचा ढाचा उभा राहिला. तो निधी संपला.. पुन्हा काम रखडले.. सात आठ वर्षे हा ढाचा व्यवस्थेला वाकुल्या दाखवत उभा होता.. पत्रकार संघाने या काळात अनेक नेत्यांशी संपर्क साधला. मदतीची विनंती केली.. पदरी निराशाच आली.. अखेर जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष माधवराव अंभोरे आणि सरचिटणीस विश्वनाथ राऊत यांनी आपल्या सहकारयांसह खासदार भावनाताई गवळी यांची भेट घेऊन पत्रकार भवन पुर्णत्वास जाण्यासाठी आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त केली.. त्यानुसार भावना गवळी यांनी विशेष विकास निधीतून ४० लाख रूपयांची मदत दिली.. या निधीतून आता पत्रकार भवनाचे रखडलेले काम सुरू झाले आहे.. वॉल कंपाऊंड, खिडक्या, प्लास्टर, फलोरिंग, वायरिंग आदि कामे होत आहेत.. येत्या काही दिवसातच पत्रकार भवनाची एक सुसज्ज वास्तू उभी राहात आहे.. भावनाताई आम्ही आपले आभारी आहोत..
पत्रकार भवनासाठी निधी, जागा सरकारने दिलेल्या आहेत.. अपेक्षा अशी असते की, या वास्तूतून पत्रकारांना आपले काम व्यवस्थित पार पाडता यावे.. मात्र अनेक जिल्ह्यात काही भुजंगानी पत्रकार भवनाला विळखा घालून ही इमारत आपल्या बापजाद्यांची वास्तू आहे असे समजून त्याचा दुरूपयोग चालविलेला आहे.. अनेक जिल्ह्यात पत्रकार भवन हे पत्रकारांमधील वादाचे मुख्य कारण ठरलेले आहे..परिणामतः पत्रकार भवन या वास्तूला असलेले वलय आणि त्याचे पावित्र्यही संपुष्टात आले आहे… वाशिममध्ये असे होणार नाही आणि वाशिम मधील पत्रकार भवनाचा उपयोग चौथा स्तंभ अधिक भक्कम होण्यासाठी आणि वाशिम च्या विकासासाठी होईल अशी खात्री आणि अपेक्षा आहे..
एस.एम.देशमुख