पत्रकार संरक्षण कायदा,पत्रकार पेन्शनची मागणी राज्यातील पत्रकार गेल्या वीस वर्षांपासून करीत असताना आणि या संदर्भात भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात आश्‍वासन दिलेलं असताना त्याकडं कानाडोळा करणारे सरकार आणि त्यांचे मंत्री पत्रकारांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमास उपस्थित राहून मुळ मुद्याला बगल देत घोषणांचा पाऊस पाडत असतात.महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात असाच घोषणांचा पाऊस पाडला.’जो जे वांछिल तो ते लाहो’ अशा स्वरूपाच्या या घोषणांची जबाबदारी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र समाजातील दानशूर व्यक्तीवर लोटली आहे.चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूरकर पत्रकारांसमोर केलेल्या घोषणा काय आहेत ते पहा.

कोल्हापूर : पत्रकारांचे जीवन धकाधकीचे झाले आहे. त्यामुळे पत्रकारांना विमा संरक्षण लागू करण्यासाठी प्रत्येकाच्या नावे 4 हजार 500 रुपयांची एकरकमी ठेव ठेऊन त्यातून येणाऱ्या व्याजातून विम्याचे हप्ते भरण्यात येतील, त्यासाठी लोकप्रतिनिधी आणि दानशूर व्यक्ती यांनी पुढे येऊन सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

कोल्हापूर प्रेस क्लबच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन आणि बोधचिन्हाचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज करण्यात आले. समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्रीमंत शाहु छत्रपती महाराज हे होते. यावेळी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते प्रेस क्लबच्या डायरीचे प्रकाशन करण्यात आले. या समारंभास महापौर हसीना फरास, खासदार धनंजय महाडिक, खासदार राजू शेट्टी, आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदिप नरके, आमदार डॉ.सुजित मिणचेकर, माजी मंत्री प्रकाश आवाडे, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, पोलीस अधिक्षक महादेव तांबडे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक सुहेल शर्मा, उपमहापौर अर्जून माने अदि मान्यवर उपस्थित होते.

कोल्हापुरातील पत्रकारांचे जीवन सुखी आणि सुरक्षीत व्हावे यासाठी दरवर्षी 330 रुपये प्रिमियम असलेल्या पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजनेचा एकरक्कमी प्रिमिअम भरुन त्यांना विमा संरक्षण देण्यासाठी सर्वच लोकप्रतिनिधींनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन करुन पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, याबरोबरच दरमहा 210 प्रिमियम असलेली अटल पेन्शन योजनेचा 1 लाख 5 हजाराचा प्रिमियम एक रक्कमी भरल्यास त्यांना 60 वर्षानंतर दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळू शकेल त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला व त्यानंतर मुलांना आर्थिक लाभ मिळेल. मात्र आशा या क्रांतिकारक योजनांचा लाभ पत्रकारांना मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि दानशुरांनी पुढे येण्याची गजर असल्याचेही ते म्हणाले.

कोल्हापूर प्रेस क्लब कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी झाल्याने पत्रकारांची आणि पदाधिकारी तसेच लोकप्रतिनिधींची सोय झाली आहे. ही जागा उपलब्ध करुन दिल्याबद्दल महापालिकेस पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ध्यन्यवाद दिले. ते म्हणाले पत्रकारांसाठी हौसिंग सोसायटी तसेच शासनाची पेन्शन योजना राबविण्याबाबत शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

याप्रसंगी बोलताना श्रीमंत शाहु छत्रपती महाराज म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून समाजविकासात आणि लोकशिक्षणात पत्रिकारितेचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. कोल्हापुरातील जयंती नाल्यासह अन्य नाल्यांच्या शुद्धीकरणाची विशेष मोहिम शासन आणि महापालिकेने हाती घेऊन पंचगंगा प्रदूषण रोखून कोल्हापूरवासीयांना स्वच्छ पाणी देण्याबाबत आवश्यक उपाययोजना करावी, अशी सूचनाही त्यांनी केली.

याप्रसंगी महापौर हसीना फरास यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि कोल्हापूर प्रेस क्लबला शुभेच्छा दिल्या.

कोल्हापूर प्रेस क्लबचे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले 23 वर्षाची परंपरा असलेल्या प्रेस क्लबला आज स्वत:चे कार्यालय उपलब्ध झाले आहे. यामुळे कोल्हापुरातील पत्रकारांची तर सोय होईलच याबरोबरच पत्रकार परिषदा घेणाऱ्या सर्वांना एकाछताखाली पत्रकार परिषदा घेता येतील, ही खऱ्या अर्थाने सोय झाली आहे. कोल्हापुरातील पत्रकारांनी आजपर्यंत जागल्याची भूमिका सक्षमपणे पार पाडली असून यापुढेही सामाजिक बांधिकीच्या जाणीवेतून गरजवंत संस्था, समाजातील उपेक्षित घटक, आणि सामाजिक प्रश्नांना न्याय यासाठी खंबीर भूमिका घेतली आहे, असे सांगून त्यांनी प्रेस क्लबच्या भविष्यातील विविध उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समीर देशपांडे यांनी केले तर कोल्हापूर प्रेस क्लबचे उपाध्यक्ष संतोष पाटील यांनी आभार मानले.

या समारंभास मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका,अधिकारी, विविध वृत्तपत्रांचे सन्मानिय संपादक, कार्यकारी संपादक, निवासी संपादक, प्रतिनिधी तसेच इलेक्ट्रॉनिक माध्यमाचे प्रतिनिधी कॅमेरामन, छायाचित्रकार यांच्यासह कोल्हापूर प्रेस क्लबचे सर्व कारकारीणी सदस्य, जेष्ठ पत्रकार नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here