कोणताही पत्रकार एकाकी नाही,
जिंतूरकर पत्रकारांनी प्रत्येक्ष कृतीतून दिला संदेश
दार्या असताना एखादया पत्रकाराचं अकाली निधन झालं तर त्याचं सारं कुटुंबच रस्त्यावर येतं.सार्या कुटुंबाची वाताहत झाल्याच्या घटना राज्यात अनेक ठिकाणी घडल्या आहेत.अशी अभागी कुटुबाला कोणीच वाली नसतो.त्यामुळं मराठी पत्रकार परिषदेने अशा पत्रकारांच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी राज्यव्यापी चळवळ सुरू केलेली आहे.गेल्या वर्षभरात 19 पत्रकारांना किंवा त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबाला मदत दिली गेली आहे.रायगड जिल्हयातील अमोल जंगम यांच्या कुटुंबाला अलिकडंच एक लाख रूपये दिले गेले आहेत.मात्र आम्हाला परभणी जिल्हयातील जिंतूर येथील आमच्या पत्रकार मित्रांचा उपक्रम अधिक स्वागतार्ह वाटतो.दिलेली रक्कम खर्च होते,मात्र संबंधित पत्रकाराच्या कुटुंबाला कायम स्वरूपी उत्पन्नाचं साधन मिळालं पाहिजे या जाणिवेतून जिंतूरच्या पत्रकारांनी एका पत्रकाराच्या कुटुंबाला मदत केली आहे.
जिंतूर तालुक्यातील भोगाव येथील ग्रामीण पत्रकार प्रसादराव देशमुख याचं अलिकडंच निधन झालं.स्वाभाविकपणे कुटुंब अडचणीत सापडलं.अशा वेळेस जिंतूरचे पत्रकार त्यांच्या मदतीला धावून गेले आणि भविष्यात त्यांना कोणासमोरही हात पसरण्याची वेळ येऊ नये यासाठी पिठाची गिरणी,मिर्ची-मसाला कांडप यंत्र देऊन कायमचा आधार देण्याचा स्तुत्य प्रयत्न केला आहे.सात्वनाच्या हजार वांझोटया शब्दांपेक्षा मदतीचा एक हात किती तरी मोठा असतो हा संदेश जिंतूरकर पत्रकारांनी जगासमोर ठेवला आहे.या पुर्वी देखील बोरी येथील एका पत्रकाराचे निधन झाले तेव्हा जिंतूरच्या पत्रकारांनी त्या पत्रकाराच्या कुटुंबालही अशीच मदत केली होती.जिंतूरमधील पत्रकार सर्वश्री विजय चोरडिया,प्रदीप काकोडकर,प्रेस क्लबचे अध्यक्ष शेहजाद पठाण,मंचक देशमुख,बालाजी शिंदे,राहुल वाव्हळे,सचिन रायपत्रीवार,रियाज चाऊस या सर्व पत्रकारांचे मनःपूर्वक अभिनंद आणि आभार.पत्रकार एकाकी नाही हा संदेश या मदतीतून नक्कीच गेला आहे.आपण सर्वजण याच जाणिवेतून परस्परांना मदतीची भूमिका घेऊ यात.(SM)