मुंबई-गोवा हा 475 किलो मीटरचा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला होता.दररोज किमान दीड माणसाचे रक्त रस्त्यावर सांडायचे.संवेदना हरवलेल्या कोणत्याही राजकीय पक्षाला त्याचं काहीच वाटायचं नाही. मात्र संवेदनशील मनाच्या कोकणातील पत्रकारांना हे पहावयाचं नाही.एक दिवस रायगडमधील पत्रकारांनी निर्धार केला, मुंबई- गोवा महामार्गाच्या रंदीकरणासाठी लढायचं.मुंबई -गोवा महामार्गाचं चौपदरीकरण झाल्याशिवाय दररोज रस्तयावर होणारा रक्ताचा अभिषेक थांबणार नाही.हे दिसत होतं..त्यासाठी लेखणीची तलवार करून आणि थेट रस्तयावर उतरूनही लढा द्यायचा.निर्णय झाला आणि लढ्याची तारीखही नक्की झाली.2 ऑक्टोबर 2008 रोजी वडखळ नाका इथं पहिलं आंदोलन केलं गेलं. पत्रकार समाजाच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करतात हे चित्र रायगडवासियांसाठी अनोखं होतं.त्याची चर्चा जिल्हाभर झाली. त्यानंतर सलग चार वर्षे शांततेच्या मार्गानं आंदोलनं सुरू राहिलं. उपोषणं,घेराव,मानवी साखळी,लॉगमार्च,मशाल मोर्चा या सारखे साऱे फंडे अवलंबिले गेले.रायगडच्या पत्रकारांना नंतर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील पत्रकारांची साथ लाभली.आंदोलन कोकणात पसरलं.पत्रकार हे आंदोलन करीत होते तेव्हा कोकणातील सारेच राजकीय पक्ष गप्पगार होते.काही म्हणायचे, “खडकावर डोकं आपटून घ्यायचा हा प्रयत्नय” , ” काहीं बोलायचे आंदोलन करणं हे काय पत्रकाराचं काम आहे काय?” पण अशा कोणत्याही बडबडीकडं पत्रकारानी लक्ष दिलं नाही. .अंतिमतः सरकारला या लढ्याची दखल ध्यावी लागली.पळस्पे ते इंदापूर हा 84 किलो मीटरचा पहिला टप्पा मंजूर झाला.आता त्याचं काम 33 टक्के पूर्ण झालंय.मात्र पुढच्या टप्पयाबाबत काहीच हालचाल नाही.पुन्हा पत्रकारांनाच रस्तयवर उतरावं लागतंय.येत्या 25 जून रोजी पत्रकारांनी कशेडी घाट रोको आंदोलन जाहीर केलंय.तीनही जिल्हयातील किमान 200 पत्रकार आंदोलनात सहभागी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मुंबईत कोकणाचे जे पत्रकार आहेत ते देखील या आंदोलनात सहभागी होत आहेत.संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात पत्रकारांचा सहभाग मोठा होता.त्या लढ्यानंतर एवढा मोठा लढा मुंबई-गोवा महामार्गाच्या निमित्तानं पत्रकारानी प्रथमच लढला.एका विभागातील पत्रकार एकत्र येतात आणि स्वहित नव्हे तर जनहिताचा प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरतात हे चित्र संंयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यानंतर पहिल्यांदाच दिसलं.सलग पाच वर्षे हे आंदोलन सुरू आहे.रस्ता पूर्ण चौपदरी होईपर्यत ही लढाई थांबवायची नाही असा पत्रकारांचा निर्धार आहे.त्यासाठी पत्रकारांचे एक शिष्टमंडळ लवकरच नितीन गडकरी यांना भेटायला दिल्लीला देखील जाणार आहे.पत्रकारांनी लेखणी आणि रस्त्यावर उतरून चालविलेली ही लढाई नक्कीच पत्रकारितेला ” वेगळ्या वाटेवरून” नेणारी आहे.रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार,माजी अध्यक्ष संतोष पवार,मिलिंद अष्टीवकर,अभय आपटे,तसेच नागेश कुलकर्णी यांचं समर्थ नेतृत्व या लढयास लाभलं आहे त्याना तीनही जिल्हयातील पत्रकारांनी खंबीर साथ दिली.कोकणातील पत्रकारांचं हे कार्य केवळ कौतुकास्पद नाही तर त्यांना सलाम करावं असं आहे.
———————————————————————————————————————————————-
आपल्या भागात ,आपल्या विभागात एखादा पत्रकार किंवा एखादी पत्रकार संघटना किंवा अनेक पत्रकार सामाजिक बांधिलकी जपत काही वेगळा प्रयोग करीत असतील, वेगळ्या वाटेनं चालण्याचा प्रयत्न करीत असतील तर त्याची माहिती बातमीदारकडं पाठवा त्याला प्रसिध्दी दिली जाईल.आमचा पत्ता असा udyachabatmidar@gmail.com