हम खूष हुये..
कॉग्रेसला फुटला पत्रकारांच्या प्रेमाचा पान्हा..
राजनाथ सिंह यांना पत्र लिहून पत्रकारांना संरक्षण देण्याची केली मागणी..
महाराष्ट्रात पत्रकार फटके खात होते.’पत्रकार संरक्षण कायदा करा’ म्हणून आक्रोश करीत होते.त्यावेळेस ढिम्म असलेल्या कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना आज एकाएकी पत्रकांरांबद्दल पान्हा फुटला आहे.प्रदेश कॉग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी आज चक्क केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठवून ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई आणि रवीशकुमार यांना संरक्षण दिलं जावं अशी मागणी केली आहे.कॉग्रेसच्या मानसिकतेत झालेला हा सकारात्मक बदल स्वागतार्ह असला तरी त्याला राजकारणाचा नक्कीच वास येत आहे.अर्थात अशोक चव्हाण यांनी घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो.पक्ष सत्तेवर असो की,विरोधात पत्रकारांबद्दलची हीच संवेदना कायम असली पाहिजे एवढीच आमची इच्छा आहे.अशोकरावांची मागणी नक्कीच योग्य असली तरी या दोघांखेरीज देशातील अनेक पत्रकार आज भितीच्या सावटाखाली आहेत.त्यांना कायद्यानं संरक्षण दिलं पाहिजे.केवळ हल्लेच नव्हे तर अनेकांच्या नोकर्यावर टाच आणून त्याना रस्त्यावर आणले जात आहे.त्याचाही बंदोबस्त होण्याची गरज आहे.
राजदीप सरदेसाई असतील किंवा रवीशकुमार यांचे कार्यक्रम सर्वानाच आवडतात असं नाही.एक मोठा वर्ग आहे की,तो या पत्रकारांच्या भूमिकेवर सातत्यानं टीका करीत असतो,विरोध करतो.त्यांच्याविरोधात सोशल मिडियावर अत्यंत खालच्या पातळीवर मते व्यक्त केली जातात एवढंच नव्हे तर अनेकजण या पत्रकारांना शिव्या घालतात,जिवे मारण्याच्या धमक्या देतात.या पार्श्वभूमीवर त्यांना संरक्षण देण्याची गरज असल्याचे अशोकरावांचं म्हणणं आहे.
विरोधी विचारधारेच्या व्यक्तींवर केली जाणारी चिखलफेक आणि त्यांना दिल्या जाणार्या धमक्या याबद्दल अशोक चव्हाण यांनी चिंता व्यक्त केली आङे.नरेंद्र दाभोळकर.गोविंद पानसरे,एम.एन कलबुर्गी आणि आता गौरी लंकेश यांच्या झालेल्या हत्त्या म्हणजे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरचे थेट हल्ले आहेत.देशातील लोकांचं संरक्षण करणं हे लोकनियुक्त सरकारचं कर्तव्य असल्याचे अशोक चव्हाण यांनी राजनाथ सिंह यांच्या निदर्शनास आणून दिलं आहे.