गडही गेला आणि रायगडही…
सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांनी अलिबागमध्ये पत्रकार परिषद घेऊन ‘रायगडातही कॉग्रेस,शेकाप आणि राष्ट्रवादी’ अशी आघाडी होणार असल्याची घोषणा केली आणि त्याच्या दुसर्याच दिवशी कॉग्रेसचे नेेते रवींद्र पाटील वर्षावर धडकले.रवींद्र पाटील हे रामशेठ ठाकूर यांच्यासारखे ‘लोकनेते’ वगैरे नाहीत, त्यामुळं त्यांच्या जाण्यानं कॉग्रेसचे फार नुकसान होईल आणि येण्यानं भाजपचा फार लाभ होईल असं समजण्याचं कारण नाही.मुद्दा तो नाहीच, मुद्दा हा आहे की,रवींद्र पाटील यांच्यावर पक्षांतराची वेळ का आली ? रवींद्र पाटील हे जुने कॉग्रेस नेते.निष्ठावान.अंतुलेंच्या टीममधील शिलेदार.कॉग्रेसनं त्यांना मंत्री वगैरे केलं ..तरीही त्यांना पक्ष सोडावा वाटला असेल तर काँग्रेसचे काही तरी चुकतंय हे नक्की..गंमत अशीय की,काय चुकतंय? हे रायगडातील सामांन्यातल्या सामांन्य कार्यकर्त्याला कळतंय,पण ते मुंबईतल्या नेत्यांना समजत नाही किंवा समजून घेण्याची त्यांची तयारी नाही..
मुळात जिल्हयात कॉग्रेस जे राजकारण करीत आहे तेच मुळी जुन्या-जाणत्या कॉग्रेसजणांना मान्य नाही.सुनील तटकरे अगोदर कॉग्रेसमध्ये होते.ते शरद पवारांबरोबर राष्ट्रवादीत गेले.त्यांनी तोडता येईल तेव्हडी कॉग्रेस तोडली.मात्र कॉग्रेस संपली नाही.आजही कॉग्रेसकडं दीड लाख मतं हक्काची आहेत.जिल्हयात शेकाप हा कॉग्रेसचा परंपरागत शत्रू आहे.त्याच्या जोडीला राष्ट्रवादीही कॉगॅेसला नंबर एकचा शत्रू समजते.या दोन्ही पक्षांचे कधी दोन्ही बाजुंनी तर कधी एकत्रित हल्ले सहन करीत जिल्हयात कॉग्रेस टिकून राहिली.हे वास्तव आहे.कॉग्रेसचं हे बळ या पक्षाचा परंपरागत शत्रू असलेल्या शेकापला बरोबर ठाऊक आहे.म्हणून तर शेकापवाले राष्ट्रवादीला नव्हे तर कॉग्रेसला जास्त घाबरतात. जिल्हयात कॉग्रेसची अशी असंख्य घराणी आहेत की,जी कायम कॉग्रेसबरोबर आहेत.नेते आले गेले..पण ही घराणी आणि असंख्य कार्यकर्ते कॉग्रेसबरोबरच राहिले .त्यामुळंच रामशेठ ठाकूर भाजपमध्ये गेले तरी पनवेलमध्ये कॉग्रेस जिवंत राहिली.नंतर रामशेठ ठाकूर यांनी जंगजंग पछाडलं तरी त्याना पनवेलमधून कॉग्रसे संपविता आली नाही.कॉग्रेसची विचारधारा जिल्हयात खोलवर रूजलेली आहे हेच याचं कारण आहे.जिल्हयात आज कॉग्रेस जी विकलांग झाल्याचं दृश्य दिसतंय ते कॉग्रेस नेते सोडून गेल्यामुळं नक्कीच नाही तर राज्यातील कॉग्रेस नेत्यांच्या चुकीच्या धोरणांमुळं..गेल्या पंधरा-वीस वर्षातलं चित्र बघा..कॉग्रेस नेत्यांना स्वतःच्या पक्षापेक्षा रायगडातील शेकाप आणि राष्ट्रवादीचीच जास्त काळजी वाटत आलेली आहे.. कटू आहे पण वास्तव असंय की,रायगडात कॉग्रेस वाढावी असं कॉग्रेसच्या राज्यातील नेत्यांना वाटतच नाही.तसा जाणीवपूर्वक प्रयत्नही कधी झाला नाही.उलटपक्षी राज्यातील नेत्यांनी कॉग्रेस कायम कधी शेकापच्या तर कधी कधी राष्ट्रवादीच्या दावणीला बांधली. शेकाप असेल किंवा राष्ट्रवादी या पक्षांनी अनेकदा राजकीय कोलांटउडया मारल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं..प्रसंगानुरूप जातीयवादी पक्षांशी देखील चुबाचुंबी केली..पण जेव्हा कॉग्रेसची जवळीक साधायची वेळ आली तेव्हा समविचारी आणि धर्मनिरपेक्ष पक्ष या दोन शब्दांची मोहिनी कॉग्रेसवर टाकली आणि या दोन शब्दांनी रायगड कॉग्रेसचं सारं वाटोळं करून टाकलं. आजही परिस्थिती बदललेली नाही.कधी काळी कॉग्रेसचा बालेकिल्ला असलेला रायगड आता कॉग्रेसने राष्ट्रवादीला जवळपास आंदण देऊन टाकला आहे.लोकसभा असेल विधानसभा असेल किंवा अगदी जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील राष्ट्रवादी देईल तो तुकडा घेऊन कॉग्रेसला गप्प बसण्याची वारंवार वेळ आलेली आहे.त्यामुळंच जवळपास सार्या सत्तास्थानावरून कॉग्रेस उखडली गेली आहे.
लोकसभेचं चित्र पाहिलं तर दिसेल की,आलटून पालटून आठ वेळा कॉग्रेसनं कुलाब्यातून विजय संपादन केलेला आहे.2009 मध्ये जेव्हा अंतुलेंचा पराभव झाला तेव्हा त्यांनी मित्र पक्षाच्या नावाने बराच त्रागा केला होता.टकमक टोकाची वगैरे भाषा त्यांनी वापरली होती.’मित्रांनी’ शब्द देऊनही मदत केली नाही असा अंतुलेंचा आक्षेप होता.तरीही 2014 मध्ये कॉग्रेसनं पुन्हा लोटांगण घालत आपली मतं राष्ट्रवादीच्या आणि पर्यायानं सुनील तटकरे यांच्या पारडयात टाकली .2019 मध्ये पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती होणार आहे.गंमत अशी की,रायगडसाठी साधा दावा करायलाही कॉग्रेस नेत्यांची तयारी नाही किंवा तशी मानसिकता नाही . बरं या बदल्यात कॉग्रेसला काय मिळणार आहे ? भोपळा . सुनील तटकरे आणि जयंत पाटील या तगडया नेत्यांशी दोनहात करीत महाडमध्ये माणिक जगताप,अलिबागमध्ये मधुशेठ ठाकूर आणि पेणमध्ये रवींद्र पाटील यांनी कॉग्रेस जिवंत ठेवली . मात्र या तीन पैकी अलिबाग आणि पेणमध्ये शेकापचे विद्यमान आमदार असल्यानं नेते काहीही बोलत असले तरी या दोन जागा ते आघाडीतील मित्रांना म्हणजे कॉग्रेसला कधीच सोडणार नाहीत.पनवेलच्या जागेचाही प्रश्नच नाही.म्हणजे तीन जागा गेल्या..रोहा आणि कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत.तेथेही राष्ट्रवादी आपल्या जागेवर पाणी सोडणार नाही.कारण कॉग्रेसला जिल्हयात आपला पक्ष वाढवायचा नसला तरी राष्ट्रवादीला पक्ष वाढवायचा आहे.त्यामुळं या दोन्ही जागांबद्दल राष्ट्रवादी तडजोड करणार नाहीच.त्यामुळं शिल्लक राहतो तो केवळ महाड. .ही जागा कॉग्रेसला सोडली जाईल पण माणिक जगताप यांच्यासाठी दोन्ही ‘मित्र’ किती निष्ठेनं काम करतील याबद्दल स्वतः माणिक जगताप आणि जनताही साशंक आहे.माणिक जगताप हे कॉग्रेसचे तगडे नेते आहेत.लोकसंग्रह असलेले आणि सुनील तटकरे आणि जयंत पाटील यांच्या कुटील डावपेचांची चांगली माहिती असलेले नेते आहेत.त्यामुळं तटकरेंना माणिकराव वाढलेले चालत नाहीत.हे अनेकदा दिसून आलंय.अशा स्थितीत कॉग्रेसमध्ये राहायचे म्हणजे सडत पडायचे अशी भावना रवींद्र पाटील आणि अन्य नेत्यांची झाली असेल तर दोष त्यांना देता येत नाही.सत्तेेशिवाय राजकारण करता येत नाही आणि इथं सत्ताच मिळू दिली जाणार नसेल तर कॉग्रेसमध्ये कोण नेता राहणार ? हा प्रश्न आहे.रवींद्र पाटील यांच्या राजीनाम्याची ही सारी पार्श्वभूमी आहे.तयारी आहे पण आपल्या हक्काच्या पेणमध्येही लढता येणार नसेल तर अशा स्थितीत फार काळ गप्प बसणे कोणत्याच नेत्याला शक्य नसते.रवींद्र पाटील यांनी जवळपास वर्षभर प्रतिक्षा केली पण अंतिमतः त्यांना निर्णय घ्यावा लागला.
मागच्या आठवडयात प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण अलिबागला आले तेव्हा हे वास्तव कॉग्रेसच्या नेत्यांनी त्यांच्या कानी घातले.त्यावर ‘स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेतले जातील’ असे आश्वासन देऊन ही स्थानिक नेत्यांना वार्यावर सोडले जात आहे असेच दिसते.कॉग्रेसचा स्थानिक एकही नेता उपस्थित नसताना सुनील तटकरे आणि जयंत पाटील पत्रकार परिषद घेतात आणि रायगडातही आघाडी असेल अशी घोषणा करतात याचा अर्थ काय घ्यायचा ? .’स्थानिक नेत्यांशी आम्हाला देणं-घेणं नाही,वरचे कॉग्रेस नेते आम्ही खिश्यात घातलेत’ हेच या नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन सूचवायचे होते.तो संदेश त्यांनी दिला आहे.त्यामुळं मावळ नाही,रायगडही नाही केवळ महाडचा चतकोर वाटा घेऊन कॉग्रेसवाल्यांना आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सुनील तटकरे झिंदाबादच्या घोषणा द्याव्या लागणार आहेत.जुन्या-जाणत्या कॉग्रेसवाल्यांसाठी हे सारं क्लेशदायक आहे..कारण ज्यांच्याशी अनेक वर्षे संघर्ष केला त्यांच्याच जयजयकाराच्या घोषणा द्यायची वेळ येणार असेल तर ते नक्कीच सुखद नाही.पण कॉग्रेसच्या राज्यस्तरीय नेत्यांनाच रायगडात कॉग्रेस वाढावी किमान जगावी असं वाटत नसेल तर बिचारे हे जुने कॉग्रेसवाले तरी काय करणार ? ते हतबल आहेत..कॉग्रेसची दैना त्यांना पाहवत नाही..नेते आपली सोय लावून घेतात.पण विचारांवर श्रध्दा असलेली कार्यकर्ती मंडळी पळापळ करूही शकत नाही.एखादा रूग्ण अंतिम घटकामोजत असताना डॉक्टर जसे त्यांना घरी घेऊन जा चा सल्ला देतात आणि पेशन्ट घरी आल्यानंतर घरचेही जसे रूग्णाच्या हे राम म्हणण्याची वाट बघतात तशी अवस्था कॉग्रेसची झाली आहे.राज्य कॉग्रेसनं वेळीच ही स्थिती सुधारली नाही तर रवीद्र पाटलांबरोबरच इतरही काही नेते अन्य सुरक्षित निवारा शोधतील. हे नक्की..
एस एम देशमुख