आम आदमी पक्षा’चे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्यावरील हल्ला ही एका दृष्टीने पक्षासाठी खूषखबर ठरते आहे. केजरीवाल यांच्यावर जेव्हा-जेव्हा हल्ला होतो तेव्हा पक्षाच्या निधीत (पार्टी फंड) भरघोस वाढ होताना दिसून येते. केजरीवाल यांच्यावर आतापर्यंत झालेल्या चार ते पाच हल्ल्यानंतर पक्षाला मिळणाऱ्या निधीत कमालीची वाढ झाली आहे. मंगळवारी केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर पक्षाच्या निधीमध्ये २९ लाखांऐवजी ८५ लाखांची वाढ झाली.
पक्ष निधीच्या वाढीनंतर आम आदमी पक्षाला आता पर्यंत १११ देशातून ८६,६४९ लोकांनी फक्त २४.५३ कोटी दानात दिले आहेत. याआधी पक्षाने लोकसभा निवडणुकीआधी १०० कोटी निधी जमविण्याचे लक्ष्य ठेवले होते. मागील दोन महिन्यांमध्ये केजरीवाल यांच्यावर देशभरामध्ये शाई, अंडी, श्रीमुखात भडकावणे अशाप्रकारचे हल्ले करण्यात आले आहेत.
२८ मार्चला केजरीवाल यांच्यावर हरियाणा मध्ये हल्ला करण्यात आला होता. त्यादिवशी पक्षाला ३९ लाखांऐवजी ४२ लाख निधी मिळाला, तर दोन दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यानंतर त्यादिवशी ३५.१३ लाखांऐवजी ऑनलाइन १.३५ कोटी निधी मिळाला. तर २५ मार्चला जेव्हा अंडी आणि शाई केजरीवाल यांच्यावर फेकण्यात आली त्यावेळेस १९ लाखाऐवजी पक्षाला ४८ लाखाची कमाई झाली.
पक्षातील नेत्यांच्या माहितीनुसार, केजरीवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या दिवशी पक्षाच्या वेबसाईटवर देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकमध्ये वाढ झाली होती. मात्र तरीही मिळत असलेला निधी पुरेसा नसल्याने पक्षातील नेत्यांच्या चेहऱ्यावर चिंता दिसून येत आहे.(म.टावरून साभार )