हिंगोली येथील कॉग्रेसचे तरूण,तडफदार खासदार राजीव सातव यांनी आज ‘संरक्षण कायदा केंद्र सरकारने लागू करावा’ अशी जोरदार मागणी आज लोकसभेत केली आहे.24 तारखेलाच त्यांनी याबाबतची 377 नियमानुसार नोटीस दिलेली होती त्यानुसार त्यांनी आज सभागृहात हा विषय उपस्थित करून देशाचे लक्ष पत्रकारांच्या जिव्हाळ्याच्या या प्रश्नाकडं वेधलं आहे.पत्रकारांवर होणार्या हल्ल्याबद्दल चिंता व्यक्त करीत राजीव सातव म्हणाले, ‘देशातील पत्रकार आज विविध प्रश्नांनी त्रस्त आहेत.पत्रकारांवर सातत्यानं होत असलेल्या हल्ल्यामुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे.यातून पत्रकारांची सुटका करण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा देशभर लागू करण्याची गरज आहे.गेल्या एक वर्षात देशभऱात 1000 च्या वरती पत्रकारांवर ह्ल्ले झाले आहेत.उत्तर प्रदेश,मध्य प्रदेश,बिहार,छत्तीसगढ ,पश्चिम बंगाल,महाराष्ट्र आणि अन्य काही राज्यात पत्रकारांच्या हत्त्या देखील झालेल्या आहेत.लोकशाहीचे प्रहरी म्हणून कार्य करणार्या पत्रकारांना जोपर्यंत कायदेशीर संरक्षण मिळत नाही तोपर्यंत परिपक्व लोकशाहीची आपण कल्पना करून शकत नाही.पत्रकारांवरील हल्ले वाढत असतील तर निःपक्ष,भयमुक्त,आणि स्वतंत्र मिडियाची कल्पना आपण करू शकत नाही.त्यामुळे सरकारला माझी विनंती आहे की, देशभरातील पत्रकारांच्या हितासाठी पत्रकार सुरक्षा कानून तयार करून पत्रकारांना कायदेशीर संरक्षण द्यावे.असे झाले तर पत्रकार निडर होऊन सत्य आणि वस्तुनिष्ठ बातमी लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रोत्साहित होतील .
राजीव सातव यांनी पत्रकारांसाठी संरक्षण कायद्याचा विषय लोकसभेत उपस्थित करून प्रथमच या प्रश्नाला वाचा फोडली आहे.त्याबद्दल मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्यावतीने आम्ही राजीव सातव यांना मनापासून धन्यवाद देत आहोत.
पत्रकार संरक्षण कायदा महाराष्ट्र सरकारने केला असला तरी हा कायदा केंद्र सरकारने करावा अशी मागणी मराठी पत्रकार परिषद करीत आहेत.त्यासाठी वेगवेगळ्या पातळ्यावर परिषदेचे प्रयत्न सुरू आहेत.खा.सातव यांनी हा प्रश्न लोकसभेत उपस्थित केल्याने परिषदेच्या मागणीला बळ मिळाले आहे.सातव यांच्या मागणीवर सरकार पुढील आठवडयात निवेदन करील अशी अपेक्षा आहे.–