जनार्दन’ का जादू चल गया!
उपसरपंचपदी अनिल पाटील
अलिबाग – कुरुळ ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने शेकापला जोरदार हादरा देत आपला उपसरपंच बसवला. शेकापचे दोन उमेदवार फोडण्याची जादू ऍड.जनार्दन पाटील यांनी शुक्रवारी केली. त्यामुळे शेकापच्या उर्वरित पाच उमेदवारांनी निवडणुकीकडे पाठ फिरवली.
राष्ट्रवादीचे जिल्हा चिटणीस ऍड. जर्नादन पाटील यांना धोबीपछाड देण्यासाठी शेकापने कुरुळ ग्रामपंचायत अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. शेकाप नेते आमदार जयंत पाटील यांनी या ग्रामपंचायतीकडे लक्ष दिले होते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत शेकाप ७ तर राष्ट्रवादीचे ६ उमेदवार निवडून आले होते.
राष्ट्रवादीचे पदाधिकारी असलेले ऍड. जनार्दन पाटील कुरुळचे रहिवासी आहेत. त्यांना त्यांच्याच गावात तोंडघशी पाडण्याची शेकापची योजना होती. मात्र जनार्दन पाटील यांनी ही कसलेल्या जादुगाराप्रमाणे करामत दाखवत शेकापलाच तोंडावर आपटले. अनिल वसंत पाटील आणि सुनिता नारायण पाटील या शेकापच्या दोन उमेदवारांना फोडून कुरुळ ग्रामपंचायतीवर त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा झेंडा फडकवला.
कुरुळ ग्रामपंचायत सरपंच एसटीसाठी राखीव आहे. मात्र या प्रवर्गातील उमेदवारच नसल्यामुळे सरपंचपद रिक्त आहे. तर उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे अनिल पाटील निवडून आले.
कुरुळच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. अनिल पाटील आणि सुनिता पाटील या दोन उमेदवारांनी गावच्या भवितव्याच विचार करुन जे सहकार्य केले त्याबद्दल त्यांचेही खुप आभारी आहोत. कुरुळसाठी बरेच काही करायचे होते; मात्र सत्ता नसल्यामुळे ते शक्य होत नव्हते. आता मात्र गावचा विकास कोणी राखु शकणार नाही.
– ऍड. जनार्दन पाटील,
जिल्हा चिटणीस- राष्ट्रवादी